गदिमा नवनित
  • सार्‍या जगासाठी द्यावा गुरुदेवा एक वर
    जीव जीव सुखी व्हावा,स्वर्ग यावा पृथ्वीवर!
मराठी युनिकोड फॉन्ट
गदिमांच्या कविता | Gadima Poems
  • वि.वा शिरवाडकर:
    माडगूळकरांची कविता मराठी मातीतून उगवलेली,अस्सल मराठी रुपाची,कलदार शैलीची आणि कसदार आशयाची आहे.शब्दांच्या आणि छंदाच्या राज्यातील तर ते स्वामीच होते.
  • Box-C-28
  • जत्रेच्या रात्री
  • Jatrechya Ratri
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •  

    दुणावून लय स्वरांत चढत्या शिरते सुरते गडी,
    सुरावट भाषेहुन रांगडी.
    डफदिमड्यांची गरम जाहली कडाडुनी कातडी,
    पुढे ये सोंगाड्या सौंगडी.
    शीळ चढवुनी केली त्याने कल्लोळावर कडी,
    उडवीली सुरत्यांची वावडी.
    झरझरा उतरली वाद्यांची तों लय,
    पोंचला शिगेला श्रोत्यांचा विस्मय.
    वाजले चाळ अन् तालावर थक् थय,
    कंबर लचकत येइ छोकरी छेलाटी गुलछडी
    अंगलट भुवईसम वाकडी.
    झडल्या टाळ्या,शिट्या,आरोळ्या, वर चवल्यांच्या झडी,
    स्वीकारी मुजर्‍्यासह फांकडी.
    हिरवे पातळ,हिरवी चोळी,वरी चमकते खडी,
    छातीवर मोत्यांची दुल्लडी.
    नथणीखाली हलूं लागली अधरांची लालडी,
    वाहिली रसरंगा दोथडी.
    कुणि गालावरच्या खळींत बसले दडून,
    कुणि ओठ चाविले आपुलेच कडकडून,
    कुणि पदरामागिल करवंदे घे खुडून.
    खमिजावरि तों कुणीं ठसविली तिच्या चोळीची खडी
    कुणीतरी कातरली कांकडी.
    स्वप्न समोरी, स्वप्न अंतरी,रतले,भुलले गडी,
    चालली घडीमागुती घडी.
    नाहिं उमगलें घुसल्या केव्हां जत्रेच्या झुंबडी,
    बाजुची कनात हो उघडी.
    मधेंच आली मधीं चांदणी शुक्राची चोंबडी,
    रेकली वेड्यापरि कोंबडी.
    जाहले पुसट तो वेळूंवरचे दिवे,
    ती इष्कबाजिची ज्योतही मालवे.
    जागींच राहिले बसुन जनांचे थवे,
    कशी संपली रात कळेना इतक्यांतच तोकडी,
    रिचवितां ताडीच्या कावडी.


गदिमा गौरव | Special Quotes
  • लेखक पु.भा.भावे:
    वास्तवतेतील गूढत्व व साधुत्व पाहावयासही माणसापाशी एक दृष्टी असावी लागते.माडगूळकरांचे पाशी ही दुर्मिळ दृष्टी आहे.ते नुसते आकाशाकडे पाहत नाहींत तर आकाशतत्त्वाकडे पाहतात.ह्या तात्त्विक दृष्टीनेच त्यांना आशयसंपन्न कथाचित्रे काढण्याचे सामर्थ्य दिले-अगदी दिवाकर कृष्णांपासून चालत आलेली चांगल्या कथांची परंपरा आज श्री.माडगूळकर चालवीत आहेत.
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems