ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar
देव पुंडलीक झाले, ब्रम्ह भक्तीचे भेटले
आला राऊळी चढून, चोखामेळ्याचा पाषाण
देव उतरले खालीं, जिव-शिव भेटी झाली
हरी,हरीजन धाले, भेद यातींचे संपले
आता नुरे यातिगोत, धर्म एक भागवत
मोक्षमार्गाची माउली, चंद्रभागा संतोषली
तीर्थी नाहताती संगे, शुद्ध-मळीणांची अंगें
सानें समत्व बाहिंले, श्रेष्ठ
सानपणा ल्याले
भीवरेच्या वाळुवंटीं, झाली वैष्णवांची दाटी
ज्ञनियांची ज्ञानेश्वरी, नाचे अज्ञनांभीतरीं
शुद्द समता वर्तली, मूढ अहंता खंडिली
जन थोरले सानुले, एक्या पंगतीं जेवले
सर्वांभूती रंगे देव, देई कवित्वासी खेंव
दृष्य पाहिले आगळे, माझे दिपले गा डोळे!