ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar
तुझी माझी राजधानी
सौख्यशांतीचें नगर,
माझा प्रकाश दाहक,
तुझी चंद्राची नजर.
तुझा माझा राजवाडा,
वर सोन्याचे मिनार,
माझें पाषाणाचे मन.
तुझी दानत उदार.
तुझा माझा रत्नकोष
भरे कुबेरभांडार,
माझे प्रखर हीरक,
तुझे पैलू हळूवार.
तुझी माझी गजशाला,
इंद्र हेवा करी वर.
माझा देह दाणगट,
तुझी चाल दमदार.
तुझी माझी फुलबाग
समाधानाचे उद्यान,
माझा स्वभाव ग्रीष्माचा,
तुझा श्रीमंत श्राचण.
तुझी माझी राजवट,
प्रजा नांदते सुखांत.
माझा अवखळ राग,
तुझे दयामय हात.
तुझे माझे सिंहासन,
प्रभा फांको सभोंवार
वर किर्तीची कमान,
खालीं पुरुषार्थ चार.