वि.वा शिरवाडकर: माडगूळकरांची कविता मराठी मातीतून उगवलेली,अस्सल मराठी रुपाची,कलदार शैलीची आणि कसदार आशयाची आहे.शब्दांच्या आणि छंदाच्या राज्यातील तर ते स्वामीच होते.
Box-C-28
शपथ
Shapath
ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar
श्रावणांतल्या त्या रातीची शपथ घालितें तुला
नकोस टाकुन जाउं जिवलगा अशी एकटी मला
अर्ध्या रातीं रंगत होतीं गाणीं गावांतली
फेर धरुनिया णाचत होत्या बारा घरच्या मुली
बंद कवाडाआड,तुझ्या मी उरिं माथा टेकिला
श्रावणांतल्या त्या रातीची शपथ घालितें तुला!
त्या रातीची
ऊब लोंकरी,ओलावा चंदनी
खिडकीमधुनी बघूं लागली न्हालेली चांदणी
बोल लावुनी तिला झणी मीं सरपडदा ओढिला
श्रावणांतल्या त्या रातीची शपथ घालितें तुला!
झिम्मा फुगडी खेळुं लागला वारा धारांसवें
दबला माझा श्वास,मोकळीं तृप्तीचीं आंसवें
अदेय त्याचा दिला लाडक्या नजराणा मी तुला
श्रावणांतल्या त्या रातीची शपथ घालितें तुला!
सरला श्रावण हिरवी गादी चालवितो भादवा
कितीही लुटला तरी वाटतो लाभ तुझा मज नवा
नको पेटवूं विरहानें हा सौख्याचा बंगला
श्रावणांतल्या त्या रातीची शपथ घालितें तुला!
गदिमा गौरव | Special Quotes
पु.भा.भावे
'मंतरलेल दिवस' वाचून झाले,मस्ती अजून आहे.यातल्या व्यक्ती,स्थळं,उगीचच पुनः पुन्हा डोळ्यांसमोर येतात.अस्वस्थ करतात.चांगलं काही वाचल्यानंतर हे असंच होतं.तीच त्यांच्या सामर्थ्याची पावती.शब्दाशब्दात सातारी मातीचा कस आहे.दुसरे काही बिघडले तरी माडगूळकरांचे आत्मकथनपर लिहिणे कधीही बिघडत नाही !.