गदिमा नवनित
  • दैव जाणिले कुणी,लवांकुशाचा हलवी पाळणा
    वनी वाल्मिकी मुनी,दैव जाणिले कुणी?
मराठी युनिकोड फॉन्ट
गदिमांच्या कविता | Gadima Poems
  • वि.वा शिरवाडकर:
    माडगूळकरांची कविता मराठी मातीतून उगवलेली,अस्सल मराठी रुपाची,कलदार शैलीची आणि कसदार आशयाची आहे.शब्दांच्या आणि छंदाच्या राज्यातील तर ते स्वामीच होते.
  • Box-C-28
  • घे तसला अवतार
  • Ghe Tasala Avatar
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •  

    शारदे, घे तसला अवतार !
    अज्ञानाचे वारुळ फुटलें
    शांतीसंगे ज्ञान प्रगटलें
    तुझ्या स्वरुपीं विलीन झालेँ
    वाल्मीकीच्या वाणीचा मग देवावर अधिकार!

    आप्तवधाला अर्जुन भ्याला
    रथाखालतीं स्तब्ध राहिला
    गीतावचनें पाजुन त्याला
    पार्थिव देहातुनी फुलविला कृष्णें खदिरांगार!

    संन्याशाचा पोर भिकारी
    धरणे धरितां तुझिया दारीं
    पावलीस त्या शब्दसुंदरी
    महिषमुखानें ज्ञानदेव तो घडवी वेदोच्चार!

    सज्जनगडाचा समर्थ योगी
    राज्य रंगवी भगव्या रंगी
    समूर्त झालें शौर्य विरागी
    कुबड्यांमधुनी जन्म घेति मग खंजिर कैक हजार!

    कोंडाण्याच्या कडकेपारीं
    मालुसर्‍याची मर्द वैखरी
    वीररसाच्या झाडुन फैरी
    घरभेद्यांवर करी क्रांतिचा तेजोमय संस्कार!

    प्राणपणाने लढा लढविला
    गड वसईचा नाहीं पडला
    वीर चिमाजी पुरता चिडला
    शब्दासरशीं त्याच्या झाले कैक फिरंगी ठार!

    साम्राज्याचा उमदा नोकर
    भानावर ये पाहुन संगर
    गोळ्या झाडित अधिकार्‍यावर
    मंगल पांडे गर्जत सुटला वेडा जयजयकार!

    अजाण भेसुर,भयाण प्रांती
    विनायकाच्या जिव्हेवरती
    नाचलीस तूं करित झंकृती
    अवध्य मी या मूक गायनें भरलें कारागार!

    चला चालते व्हा रे येथुन!
    आर्त महात्मा सांगे गर्जुन
    त्या सादाने घुमले त्रिभुवन
    क्षणाक्षणाला घडव अम्हांला असले साक्षात्कार!


गदिमा गौरव | Special Quotes
  • कविवर्य बा.भ.बोरकर:
    आदिकवी वाल्मीकीने आपल्या स्वतंत्र सौंदर्यदृष्टीने विधात्याच्या सूक्ष्म आणि स्थूल सृष्टीतून नेमके सौंदर्य टिपून काढून त्यातून आपली रामकथा रचली.त्याचप्रमाणे कविश्री माडगूळकरांनी वाल्मीकीच्या काव्यसृष्टीतले वेचीव सौंदर्य आपल्या स्चयंभू प्रतिभेने बिनचूकपणे निवडले आहे.गीतरामायणातली काही गीते रामायणासारखीच चिरंजीव होऊन राहतील आणि त्याचबरोबरच माडगूळकरांचे -माझ्या बंधुतुल्य मित्राचे-नाव देखील.
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems