वि.वा शिरवाडकर: माडगूळकरांची कविता मराठी मातीतून उगवलेली,अस्सल मराठी रुपाची,कलदार शैलीची आणि कसदार आशयाची आहे.शब्दांच्या आणि छंदाच्या राज्यातील तर ते स्वामीच होते.
Box-C-28
मेघदूत
Meghadoot
ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar
जा घेउन संदेश!
मेघा,जा घेउन संदेश!
उल्लंघुनिया सरिता,सागर,नानापरिचे देश
रणांगणावर असतिल जेथे
रणमर्दांची विजयी प्रेते
गगनपथाने जाउन तेथे
प्राणसख्याच्या कलेवराचा निरखुन बघ आवेश
हाडपेर ते थेट मराठी
हास्य अजुनही असेल ओठी
शवे शत्रुचीं असतिल निकटी
अंगावरती
असेल अजुनी सेनापतिचा वेष
अर्धविलग त्या ओठांवरती
जलबंदूचे सिंचून मोती
राजहंस तो जागव अंती
आण उद्यांच्या सेनापतिला जनकाचा आदेश
डोळ्यांमधली तप्त आंसवे
थांबच देत्ये गड्या तुजसवें
पुढे न आतां मला बोलवे
सांग गर्भिणी खुशाल आहे पोटीचा सेनेश
ज्योतीसाठी जगेल समई
भिजविल तिजला रुधिरस्नेही
वाढत जाइल ज्योत प्रत्यही
नकाच ठेवूं आस मागची,इतुके कुशल विशेष
गदिमा गौरव | Special Quotes
पु.भा.भावे
'मंतरलेल दिवस' वाचून झाले,मस्ती अजून आहे.यातल्या व्यक्ती,स्थळं,उगीचच पुनः पुन्हा डोळ्यांसमोर येतात.अस्वस्थ करतात.चांगलं काही वाचल्यानंतर हे असंच होतं.तीच त्यांच्या सामर्थ्याची पावती.शब्दाशब्दात सातारी मातीचा कस आहे.दुसरे काही बिघडले तरी माडगूळकरांचे आत्मकथनपर लिहिणे कधीही बिघडत नाही !.