ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar
त्या बकाल शहरी सकाळ कसली सागूं?
लागली भराभर रहदारी पण रांगूं,
उघडल्या लबाड्या,सुरु जाहल्या पेढया,
चालती पाउलें,सुरु विजेच्या गाडया.
सरपटत निघावी सांदीमधुनी गोम
गर्दीत चालली तशी अजागळ ट्राम,
खडखडत आपुले सहस्त्र फिरते पाय
ती वळणावरती वळत वाकडी होय.
वेगास अचानक आली कसली
सुस्ती,
बुचबुचे भोंवतीं ओंगळवाणी वस्ती.
अप्सरा रात्रिच्या मजल्यावर वा खाली
मिरविती कालच्या रंगामधली लाली.
थांबली ट्राम,हो काहीतरि अपघात
कुणि रती चमकली वरी घांसतां दांत
कुणि केस उसकितां चकित बोलती झाली:
हा,मुके जनावर मेले ट्रामेखाली!
त्या जनावराच्या मरणी कुठलें लक्ष?
औत्सुक्य चोरटें अवघ्या नयनीं दक्ष
टकमका पाहती वखवखलेले नेत्र
हे असेल दिसले काल कसे रे पात्र?
ट्रामेत त्या की बसलो होतो मीही
लाखांत एक मी,कुणी वेगळा नाही.
मी खिडकीमधुनी निरखित होतो राण्या
शृंगार शिळा तो,उसकटलेल्या वेण्या
ते चुरगटलेल,उदालेले वेष,
ते पलंग,गिरदया,संसाराचे नाश;
ती आत टांगली उभी नागडी चित्रे,
थुंकल्या विड्यांनी रंगविलेले पत्रे;
ती कुरुपतेतिल क्षुद्र बेगडी कांती,
पडुनिया गिलावा भकासलेल्या भिंती;
ती विटंबनेतिल आनंदाची नीति,
ती दिडकीसाठी रंगविलेली प्रीती!
-हालली ट्रा, तो पुढे जराशी झाली
अन डोळ्यांपुढती नवीच खिडकी आली.
पाहिलें दृश्य ते पुन्हा सांगवत नाही
रोमांच तरारुन काट भरला देही
सुस्नात एकली तरुण त्यातली पोर
नेसली पांढरे,लाल कपाठी कोर
ये हळदीकुंकू गेउनिया तबकात
खिडकीस पूजुनी तिने जोडिले हात.
हा पूजा-विधिचा अघोर की अपमान!
ती खिडकी का कधि होइल पूजास्थान?
दे अन्न तयाची करितो मानव पूजा!
कानांत ओरडे विचार माझा माझ्या.
चालली ट्राम अन् क्षणांत आला वेग,
मेंदूत राहिली जळत वांकडी रेघ
विझवील काय ती कुण्या कवीचे ज्ञान?
हे असेच का हो जन्मे पूजास्थान?