ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar
गेल्या वर्षीच उन्हाळ्यात
माळ्याला बजावले होते मी
हे आवळ्याचे झाड काढून टाक
पुरते वठून गेले आहे हे
याला फळ येईल कुठून?
माळ्याने मुक्याचे सोंग घेतले
ऐकले न ऐकले, असे केले.
वठलेल्या रेघोट्या तश्याच राहिल्या
काही काळ भेलकांडे खात,
आभाळाच्या
अंगावर.
मेहनती माळ्याने शोधून काढला
त्या रुग्णाईत झाडाच्या खोडातला किडा
भिरुड.
झाड तोडले नाही त्याने
भिरुड पकडला,
मारुन टाकला.
एवढे वयस्क झाड
रोपासारखे पोसले त्याने
सालभर.
मुळशी माती नवी घातली
पाणी ओतले.
खते दिली
आणि नवल-
या शरदागमी पाहतो आहे तो,
अावळीचे सावळे हिरवेपण
परत विस्तारले आहे,
भरला आहे.
डहाळी डहाळीवर
पानाआड लटकली आहेत फळे
आवळे,
कुमारिकांचे कोवळे स्तनच
अवतरले आहेत जणु,
पुढच्या पिढ्यांना
पाजण्यासाठी
मी पाहतो आहे हा सोहळा
याचि उदयानी,याची डोळा
तळहातीचा आवळा.