गदिमा नवनित
  • चंद्र भारल्या जीवाला,नाही कशाचीच चाड
    मला कशाला मोजता,मी तो भारलेले झाड
मराठी युनिकोड फॉन्ट
गीतरामायण शब्द | GeetRamayan Lyrics
  •  
  • Box-C-29
  • 04)उदास कां तूं ?
  • Udas Ka Tu?
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •  

    उदास कां तूं ? आवर वेडे, नयनांतिल पाणी
    लाडके, कौसल्ये राणी

    वसंत आला, तरूतरूवर आली नव पालवी
    मनांत माझ्या उमलुन आली तशीच आशा नवी
    कानीं माझ्या घुमूं लागली सादाविण वाणी

    ती वाणी मज म्हणे, "दशरथा, अश्वमेध तूं करी
    चार बोबडे वेद रांगतिल तुझ्या धर्मरत घरी."
    विचार माझा मला जागवी, आलें हें ध्यानीं

    निमंत्रिला मी सुमंत मंत्री आज्ञा त्याला दिली -
    "वसिष्ठ, काश्यप, जाबालींना घेउन ये या स्थली.
    इष्ट काय तें मला सांगतिल गुरुजन ते ज्ञानी"

    आले गुरुजन, मनांतलें मी सारें त्यां कथिले
    मीच माझिया मनास त्यांच्या साक्षीनें मथिलें
    नवनीतासम तोंच बोलले स्‍निग्धमधुर कोणी

    "तुझे मनोरथ पूर्ण व्हायचे", मनोदेवता वदे,
    "याच मुहूर्ती सोड अश्व तूं, सत्वर तो जाउं दे"
    "मान्य" - म्हणालों - "गुर्वाज्ञा" मी, कर जुळले दोन्ही

    अंग देशिंचा ऋष्यश्रुंग मी घेउन येतों स्वतः
    त्याच्या करवी करणे आहे इष्टीसह सांगता
    धूमासह ही भारुन जावो नगरी मंत्रांनीं

    सरयूतीरीं यज्ञ करूं गे, मुक्त करांनी दान करूं
    शेवटचा हा यत्न करूं गे, अंती अवभृत स्‍नान करूं
    ईप्सित तें तो देइल अग्‍नी, अनंत हातांनीं


गदिमा गौरव | Special Quotes
  • कविवर्य कुसुमाग्रज (गदिमा गेले तेव्हा)
    महाराष्ट्र सरस्वतीचा लाडका पुत्र काळाने हिरावुन नेला.माडगूळकरांच्या निधनाने मराठी साहित्यातील उत्तम संस्कार मावळला.आणि एक सुंदर संगीत हरपले.विविध रसांवर विलक्षण प्रभुत्व करणारा त्यांच्या सारखा कवी अलीकडच्या काळांत झाला नाही.गीतरामायणाने माडगूळकर चिरंजीव झाले पण मराठीतील विविध रसांचे आणि कवितेतील अपूर्व चैतन्य गेले.
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems