सांवळा ग रामचंद्र
माझ्या मांडीवर न्हातो
अष्टगंधांचा सुवास
निळ्या कमळांना येतो
सांवळा ग रामचंद्र
माझ्या हातांनीं जेवतो
उरलेल्या घासांसाठीं
थवा राघूंचा थांबतो
सांवळा ग रामचंद्र
रत्नमंचकीं झोंपतो
त्याला पाहतां लाजून
चंद्र आभाळीं लोपतो
सांवळा ग रामचंद्र
चार भावात खेळतो
हीरकांच्या मेळाव्यांत
नीलमणी उजळतो
सांवळा ग रामचंद्र
करी भावंडांसी प्रीत
थोरथोरांनी शिकावी
बाळाची या बाळरीत
सांवळा ग रामचंद्र
त्याचे अनुज हे तीन
माझ्या भाग्याच्या श्लोकाचे
चार अखंड चरण
सांवळा ग रामचंद्र
करी बोबडे भाषण
त्याशी करितां संवाद
झालों बोबडे आपण
सांवळा ग रामचंद्र
करी बोबडे हें घर
वेद म्हणतां विप्रांचे
येती बोबडे उच्चार
सांवळा ग रामचंद्र
चंद्र नभींचा मागतो
रात जागवितो बाई
सारा प्रासाद जागतो
सांवळा ग रामचंद्र
उद्यां होईल तरुण
मग पुरता वर्षेल
देवकृपेचा वरुण
गदिमा गौरव | Special Quotes
कविवर्य बा.भ.बोरकर:
आदिकवी वाल्मीकीने आपल्या स्वतंत्र सौंदर्यदृष्टीने विधात्याच्या सूक्ष्म आणि स्थूल सृष्टीतून नेमके सौंदर्य टिपून काढून त्यातून आपली रामकथा रचली.त्याचप्रमाणे कविश्री माडगूळकरांनी वाल्मीकीच्या काव्यसृष्टीतले वेचीव सौंदर्य आपल्या स्चयंभू प्रतिभेने बिनचूकपणे निवडले आहे.गीतरामायणातली काही गीते रामायणासारखीच चिरंजीव होऊन राहतील आणि त्याचबरोबरच माडगूळकरांचे -माझ्या बंधुतुल्य मित्राचे-नाव देखील.