गदिमा नवनित
  • चंदनी चितेत जळला चंदन,
    सुगंधे भरुन मर्त्यलोक!.
मराठी युनिकोड फॉन्ट
गीतरामायण शब्द | GeetRamayan Lyrics
  •  
  • Box-C-29
  • 12)स्वयंवर झाले सीतेचे
  • Swayamvar Zale Seeteche
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •  

    आकाशाशीं जडलें नातें धरणीमातेचें
    स्वयंवर झालें सीतेचे

    श्रीरामांनी सहज उचलिलें धनू शंकराचें
    पूर्ण जाहले जनकनृपाच्या हेतु अंतरींचे
    उभे ठाकलें भाग्य सांवळें समोर दुहितेचें

    मुग्ध जानकी दुरुन न्याहळी राम धनुर्धारी
    नयनांमाजी एकवटुनिया निजशक्ति सारी
    फुलुं लागलें फूल हळुं हळू गालीं लज्जेचें

    उंचावुनिया जरा पापण्या पाहत ती राही
    तडिताघातापरी भयंकर नाद तोंच होई
    श्रीरामांनीं केले तुकडे दोन धनुष्याचे

    अंधारुनिया आले डोळे, बावरले राजे
    मुक्त हासतां, भूमीकन्या मनोमनीं लाजे
    तृप्त जाहले सचिंत लोचन क्षणांत जनकाचे

    हात जोडुनी म्हणे नृपति तो विश्वामित्रासी
    "आज जानकी अर्पियली मी दशरथ-पुत्रासी"
    आनंदाने मिटले डोळे तृप्त मैथिलीचे

    पित्राज्ञानें उठे हळुं ती मंत्रमुग्ध बाला
    अधिर चाल ती, अधिर तीहुनी हातींची माला
    गौरवर्ण ते चरण गांठती मंदिर सौख्याचें

    नीलाकाशीं जशी भरावी उषःप्रभा लाल
    तसेंच भरले रामांगी मधु नूपुरस्वरताल
    सभामंडपी मीलन झालें माया-ब्रम्हाचे

    झुकले थोडे राम, जानकी घाली वरमाला
    गगनामाजीं देव करांनी करिती करताला
    त्यांच्या कानीं गजर पोंचले मंगल वाद्यांचे

    अंश विष्णुचा राम, धरेची दुहिता ती सीता
    गंधर्वांचे सूर लागले जयगीता गातां
    आकाशाशीं जडलें नातें ऐसे धरणीचें


गदिमा गौरव | Special Quotes
  • ग.दि.माडगूळकर(यवतमाळ,साहित्य संमेलनातील भाषणातून)
    गीत गायले जाते एवढया अपराधासाठी त्याच्या अंगावरची कवित्वाची भूषणे काढून कशासाठी घ्यायची? काव्यहीन गीते लिहिली जातात,तशी काव्यहीन कविताही पुष्कळ असते.पण छंदात रचलेली एखादी कविता कोणी तालस्वरावर गायली तर तिच्यातील कवित्व नाहीसे झाले असे कसे? माझ्यासारख्या एकाद्या कविला काव्य स्फुरते तेच छंदासह....
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems