गदिमा नवनित
  • अंत उन्नतीचा पतनीं होइ या जगांत
    सर्व संग्रहाचा वत्सा, नाश हाच अंत
मराठी युनिकोड फॉन्ट
गीतरामायण शब्द | GeetRamayan Lyrics
  •  
  • Box-C-29
  • 14)मोडुं नका वचनास
  • Modu Naka Vachnas
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •  

    मोडुं नका वचनास-नाथा-मोडुं नका वचनास
    भरतालागी द्या सिंहासन, रामासी वनवास

    नलगे सांत्वन, नको कळवळा
    शब्द दिले ते आधी पाळा
    आजोळाहुन परत बोलवा, झणिं माझ्या भरतास

    सुतस्‍नेहानें हो‍उन वेडे
    कां घेतां हे आढेवेढे ?
    वचनभंग का शोभुन दिसतो, रघुवंशज वीरास ?

    दंडकवनिं त्या लढतां शंबर
    इंद्रासाठीं घडलें संगर
    रथास तुमच्या कुणी घातला, निजबाहूंचा आंस ?

    नाथ रणीं त्या विजयी झाले
    स्मरतें काते काय बोलले ? -
    "दिधले वर तुज दोन लाडके, सांग आपुली आस"

    नारिसुलभ मी चतुरपणानें
    अजुन रक्षिलीं अपुली वचनें
    आज मागतें वर ते दोन्ही, साधुनिया समयास

    एक वराने द्या मज आंदण
    भरतासाठीं हें सिंहासन
    दुजा वरानें चवदा वर्षें रामाला वनवास

    पक्षपात करि प्रेमच तुमचें
    उणें अधिक ना यांत व्हायचें
    थोर मुखानें दिलेत वर मग, आतां कां निःश्वास ?

    प्रासादांतुन रामा काढा
    वा वंशाची रीती मोडा
    धन्यताच वा मिळवा देवा, जागुनि निज शब्दांस

    खोटी मूर्च्छा, खोटे आंसूं
    ऐश्वर्याचा राम पिपासू
    तृप्त करावा त्यास हाच कीं आपणांसि हव्यास

    व्योम कोसळो, भंगो धरणी
    पुन्हां पुन्हां कां ही मनधरणी ?
    वर-लाभाविण मी न घ्यायची, शेवटचाहि श्वास


गदिमा गौरव | Special Quotes
  • लेखक पु.भा.भावे:
    वास्तवतेतील गूढत्व व साधुत्व पाहावयासही माणसापाशी एक दृष्टी असावी लागते.माडगूळकरांचे पाशी ही दुर्मिळ दृष्टी आहे.ते नुसते आकाशाकडे पाहत नाहींत तर आकाशतत्त्वाकडे पाहतात.ह्या तात्त्विक दृष्टीनेच त्यांना आशयसंपन्न कथाचित्रे काढण्याचे सामर्थ्य दिले-अगदी दिवाकर कृष्णांपासून चालत आलेली चांगल्या कथांची परंपरा आज श्री.माडगूळकर चालवीत आहेत.
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems