उंबरठ्यासह ओलांडुनिया मातेची माया
नको रे जाउं रामराया
शतनवसांनीं येउन पोटीं
सुखविलेंस का दुःखासाठीं ?
प्राण मागतो निरोप, रडते कासाविस काया
कशी मूढ ती सवत कैकयी
तीही मजसम अबला, आई
आज्ञा देइल का भरता ती कांतारीं जाया ?
तृप्त होउं दे तिचीं लोचनें
भरत भोगुं दे राज्य सुखानें
वनीं धाडिते तुजसि कशास्तव वैरिण ती वाया ?
सांगुं नये तें आज सांगतें
मजहुन ह्यांना ती आवडते
आजवरी मी कुणां न कथिल्या मूक यातना या
तिच्या नयनिंच्या अंगारांनीं
जळतच जगलें मुला, जीवनीं
तुझिया राज्यीं इच्छित होतें अंतिं तरी छाया
अधर्म सांगूं कसा बालका
तुष्ट ठेव तूं तुझिया जनका
माग अनुज्ञा मात्र जननितें कांतारीं न्याया
तुझ्यावांचुनी राहुं कशी मी ?
वियोग रामा, सांहु कशी मी ?
जमदग्नीसम तात तुझें कां कथिति न माराया
तुझ्या करें दे मरणच मजसी
हो राजा वा हो वनवासी
देहावांचुन फिरेन मग मी मागोवा घ्याया
गदिमा गौरव | Special Quotes
कविवर्य बा.भ.बोरकर:
आदिकवी वाल्मीकीने आपल्या स्वतंत्र सौंदर्यदृष्टीने विधात्याच्या सूक्ष्म आणि स्थूल सृष्टीतून नेमके सौंदर्य टिपून काढून त्यातून आपली रामकथा रचली.त्याचप्रमाणे कविश्री माडगूळकरांनी वाल्मीकीच्या काव्यसृष्टीतले वेचीव सौंदर्य आपल्या स्चयंभू प्रतिभेने बिनचूकपणे निवडले आहे.गीतरामायणातली काही गीते रामायणासारखीच चिरंजीव होऊन राहतील आणि त्याचबरोबरच माडगूळकरांचे -माझ्या बंधुतुल्य मित्राचे-नाव देखील.