16)रामाविण राज्यपदी कोण बैसतो ?
Ramavin Rajyapadi Kon Baisato
ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar
रामाविण राज्यपदीं कोण बैसतो ?
घेउनियां खड्ग करीं, मीच पाहतो
श्रीरामा, तूं समर्थ
मोहजालिं फससि व्यर्थ
पाप्यांचे पाप तुला उघड सांगतो
वरहि नव्हे, वचन नव्हे
कैकयिला राज्य हवें
विषयधुंद राजा तर तिजसि मानतो
वांच्छिति जे पुत्रघात
ते कसले मायतात ?
तुज दिधला शब्द कसा नृपति मोडतो
लंपट तो विषयिं दंग
तुजसि करी वचनभंग
भार्येचा हट्ट मात्र निमुट पाळितो
वर दिधलें कैकयीस
आठवले या मितीस
आजवरी नृपति कधीं बोलला न तो
मत्त मतंगजापरी
दैव तुझें चाल करी
श्रीरामा, मीच त्यास दोर लावितो
बैस तूंच राज्यपदीं
आड कोण येइ मधीं ?
येउं देत, कंठस्नान त्यास घालितो
येउं देत तिन्ही लोक
घालिन मी त्यांस धाक
पाहूं देच वृद्ध पिता काय योजितो
शत शतके पाळ धरा
श्रीरामा, चापधरा
रक्षणासि पाठीं मी सिद्ध राहतों
येइल त्या करिन सजा
बंधू नच, दास तुझा
मातु:श्री कौसल्येशपथ सांगतो