21)बोलले इतुके मज श्रीराम
ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar
शेवटीं करितां नम्र प्रणाम
बोलले इतुके मज श्रीराम-
"अयोध्येस तूं परत सुमंता
कुशल आमुचें कथुनी तांतां
पदवंदन करि माझ्याकरिंता
तातचरण ते वंदनीय रे, शततीर्थांचें धाम"
"अंतःपुरिं त्या दोघी माता
अतीव दुःखी असतिल सूता
धीर देई त्या धरुनी शांतता
सौख्य आमुचे सांगुन त्यांच्या शोका देई विराम"
"सांग माउली कौसल्येसी
सुखांत सीता सुत वनवासी
पूजित जा तूं नित् अग्निशीं
तुझिया श्रवणीं सदा असावा मुनिवरघोषित साम"
"वडिलपणाची जाणिव सोडुनि
सवतींशीं करि वर्तन जननी
मग्न पतीच्या रहा पूजनीं
तव हृदयाविन त्या जिवासी अन्य नसे विश्राम"
"राजधर्म तूं आठव आई
अभिषिक्तातें गुण वय नाहीं
दे भरतासी मान प्रत्यहीं
पढव सुमंता, विनयाने हें, सांगुन माझे नाम"
"सांग जाउनी कुमार भरता
हो युवराजा, स्वीकर सत्ता
प्रजाजनांवर ठेवी ममता
भोग सुखाचा अखंड घेई, मनिं राही निष्काम"
"छत्र शिरावर तुझ्या पित्याचें
पाळच वत्सा, वचन तयांचें
सार्थक कर त्या वृद्धपणाचें
राज्य नीतिनें करुन वाढवी रघुवंशाचें नाम"
"काय सांगणे तुज धीमंता,
उदारधी तूं सर्व जाणता
पुत्रवियोगिनि माझी माता
तुझ्या वर्तनें तिला भासवी भरत तोच श्रीराम"
बोलत बोलत ते गहिंवरले
कमलनयनिं त्या आसूं भरलें
करुण दृश्य तें अजुन न सरले -
गंगातीरीं-सौमित्रीसह-उभे जानकी-राम