गदिमा नवनित
  • दैवजात दु:खें भरतां दोष ना कुणाचा
    पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा
मराठी युनिकोड फॉन्ट
गीतरामायण शब्द | GeetRamayan Lyrics
  •  
  • Box-C-29
  • 23)मात न तूं वैरिणी
  • Maata Na Tu Vairini
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •  

    माता न तूं, वैरिणी

    अश्वपतीची नव्हेस कन्या, नव्हेस माझी माय
    धर्मात्म्यांच्या वंशी कृत्या निपजे, नांदे काय?
    वध नाथाचा करील मूढे, पतिव्रता का कुणी?

    शाखेसह तूं वृक्ष तोडिला, फळां इच्छिसी वाढ
    आत्मघातकी ज्ञानाचे या गातील भाट पवाड
    स्वीकारिन मी राज्य तुझ्यास्तव, किर्ती होईल दुणी

    वनांत भ्रात्या धाडिलेंस तूं, स्वर्गि धाडिले तात
    श्रीरामांते वल्कल देतां कां नच जळले हात?
    उभी न राही पळभर येथें, काळें कर जा वनीं

    निराधार हा भरत पोरका, कुठें आसरा आज? निपुत्रिके, तूं मिरव लेवुनी वैधव्याचा साज
    पडो न छाया तुझी पापिणी, सदनीं, सिहासनीं

    तुला पाहतां तृषार्त होते या खड्गाची धार
    श्रीरामांची माय परि तूं, कसा करूं मी वार?
    कुपुत्र म्हणतिल मला कैकयी, माता दोघीजणी

    कसा शांतवूं शब्दानें मी कौसल्येचा शोक
    सुमित्रेस त्या उदासवाणे गमतिल तिन्ही लोक
    कुठल्या वचनें नगरजनांची करुं मी समजावणी?

    वनाहुनीही उजाड झालें रामाविण हें धाम
    वनांत हिंडुन धुंडुन आणिन परत प्रभू श्रीराम
    नका आडवे येउं आतां कुणी माझिया पणीं

    चला सुमंता, द्या सेनेला एक आपुल्या हांक
    श्रीरामाला शोधण्यास्तव निघोत नजरा लाख
    अभिषेकास्तव घ्या सांगातीं वेदजाणते मुनी

    असेल तेथें श्रीरामाचा मुकुट अर्पिणें त्यास
    हाच एकला ध्यास, येथुनी हीच एकली आस
    कालरात्रसी रहा इथें तूं आक्रंदत विजनीं


गदिमा गौरव | Special Quotes
  • कविवर्य बा.भ.बोरकर:
    आदिकवी वाल्मीकीने आपल्या स्वतंत्र सौंदर्यदृष्टीने विधात्याच्या सूक्ष्म आणि स्थूल सृष्टीतून नेमके सौंदर्य टिपून काढून त्यातून आपली रामकथा रचली.त्याचप्रमाणे कविश्री माडगूळकरांनी वाल्मीकीच्या काव्यसृष्टीतले वेचीव सौंदर्य आपल्या स्चयंभू प्रतिभेने बिनचूकपणे निवडले आहे.गीतरामायणातली काही गीते रामायणासारखीच चिरंजीव होऊन राहतील आणि त्याचबरोबरच माडगूळकरांचे -माझ्या बंधुतुल्य मित्राचे-नाव देखील.
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems