गदिमा नवनित
  • लबाड जोडी इमले माड्या, गुणवतांना मात्र झोपडया
    पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणीहार
मराठी युनिकोड फॉन्ट
गीतरामायण शब्द | GeetRamayan Lyrics
  •  
  • Box-C-29
  • 28)सूड घे त्याचा लंकापति
  • Sood Ghe Tyacha Lankapati
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •  

    विरूप झाली शूर्पणखा, ही दाशरथीची कृति
    सूड घे त्याचा लंकापति

    कसलें करिसी राज्य रावणा, कसलें जनपालन ?
    श्रीरामानें पूर्ण जिंकिले तुझें दंडका-वन
    सत्‍तांधा, तुज नाहीं तरिही कर्तव्याची स्मृति

    वीस लोचनें उघडुनि बघ या शूर्पणखेची दशा
    श्रीरामाच्या पराक्रमानें कंपित दाही दिशा
    तुझे गुप्तचर येउन नच का वार्ता सांगति ?

    जनस्थानिं त्या कहर उडाला, मेले खरदूषण
    सहस्र चौदा राक्षस मेले हें का तुज भूषण ?
    देवासम तो सुपूज्य ठरला जनस्थानिंचा यति

    तुझ्याच राज्यीं तुझ्याहुनीही पूज्य जाहला नर
    सचिवासंगे बैस येथ तूं स्वस्थ जोडुनी कर
    जाळुन टाकिल तव सिंहासन उद्यां तयाची द्युति

    सुदर्शनासह व्यर्थ झेलले छातीवर तूं शर
    व्यर्थ मर्दिले देव, उचलिले सामर्थ्ये डोंगर
    तूंच काय तो धर्मोच्छेदक अजिंक्य सेनापति ?

    तूंच काय रे कुबेर जिंकुन पुष्पक नेलें घरीं ?
    तूंच काय तो, वारिली ज्यानें तक्षकनृपसुंदरी ?
    तूंच काय तो भय मृत्यूचें लव नाहीं ज्याप्रति ?

    ऐक सांगतें पुन्हां तुला त्या श्रीरामाची कथा
    बाण मारता करांत त्याच्या चमके विद्युल्लता
    शस्त्रनिपुणता बघून त्याची गुंग होतस मति

    तो रूपानें रेखीव, श्यामल, भूमीवरती स्मर
    त्याच्यासंगे जनककन्यका रतीहुनी सुंदर
    तुलाच साजुन दिसेल ऐसी मोहक ती युवति

    तिला पळवुनी घेउन यावें तुजसाठीं सत्वर
    याचसाठिं मी गेलें होतें त्यांच्या कुटिरावर
    श्रवणनासिका तोडुन त्यांनी विटंबिलें मज किती !

    जा, सत्वर जा, ठार मार ते बंधू दोघेजण
    हसली मज ती जनककन्यका, येइ तिज घेउन
    माझ्यासम ते तव सत्तेची विटंबिती आकृति


गदिमा गौरव | Special Quotes
  • प्रा.रा.ग.जाधव
    माडगूळकरांनी सात आठशे वर्षांची विविध रुपरसांची परंपरा आधुनिक संस्कारांनी पुन्हा सजीव केली आहे.चैत्रबन म्हणजे या पुराण्या काव्यपरंपरेचे एक कलाप्रदर्शनच आहे.
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems