मुद्रिका अचुक मी ओळखिली ही त्यांची
मज सांग अवस्था दूता, रघुनाथांची
हातांत धनू तें, अक्षय भाता पृष्ठीं
विरहांत काय ते राघव झाले कष्टी ?
कां श्यामल वलयें नयनतळीं चिंतांचीं ?
बसलेत काय ते लावुन कर कर्मातें ?
विसरलेत काय ते
दुःखें निजधर्मातें ?
करितात अजुन ना कर्तव्यें नृपतीचीं ?
सोडिले नाहिं ना अजुन तयांनीं धीरा ?
का शौर्याचाही विसर पडे त्या वीरा ?
साह्यार्थ असति ना सैन्यें सन्मित्रांची ?
इच्छिती विजय ना त्यांचा अवघे राजे ?
का लोकप्रीतिला मुकले प्रियकर माझे ?
विसरले थोरवी काय प्रभू यत्नांची ?
का मलाच विसरुन गेले माझे स्वामी ?
मी दैवगतीने पिचतां परक्या धामीं
का स्मृती तयांना छळिते या सीतेची ?
करतील स्वयें ना नाथ मुक्तता माझी ?
धाडील भरत ना सैन्य, पदाती, वाजी ?
कळतसे त्यांस का वार्ता रघुनगरीची ?
का विपत्कालिं ये मोह तयांच्या चित्तीं ?
पुसटली नाहिं ना सीतेवरची प्रीती ?
करतील मुक्तता कधिं ते वैदेहीची ?
त्या स्वर्णघडीची होइन का मी साक्षी ?
कधिं रामबाण का घुसेल रावणवक्षीं ?
वळतील पाउलें कधीं इथें नाथांचीं ?
जोंवरी तयांचें कुशल ऐकतें कानीं
तोंवरी सजिव मी असेन तैशा स्थानीं
जन्मांत कधीं का होइल भेट तयांची ?
गदिमा गौरव | Special Quotes
कविवर्य बा.भ.बोरकर:
आदिकवी वाल्मीकीने आपल्या स्वतंत्र सौंदर्यदृष्टीने विधात्याच्या सूक्ष्म आणि स्थूल सृष्टीतून नेमके सौंदर्य टिपून काढून त्यातून आपली रामकथा रचली.त्याचप्रमाणे कविश्री माडगूळकरांनी वाल्मीकीच्या काव्यसृष्टीतले वेचीव सौंदर्य आपल्या स्चयंभू प्रतिभेने बिनचूकपणे निवडले आहे.गीतरामायणातली काही गीते रामायणासारखीच चिरंजीव होऊन राहतील आणि त्याचबरोबरच माडगूळकरांचे -माझ्या बंधुतुल्य मित्राचे-नाव देखील.