श्याम राम हा धर्मपरायण
हा चक्रायुध श्रीनारायण
जगदोत्पादक त्रिभुवनजीवन
मानवी रामरूप ल्याला
हा उत्पत्ति-स्थिति-लयकारक
पद्मनाभ हा त्रिभुवनतारक
शरण्य एकच खलसंहारक
आसरा हाच ब्रह्मगोलां
वत्सलांछना धरुनी वक्षीं
संतसज्जनां हा नित रक्षी
हा सत्याच्या सदैव पक्षीं
जाणतो हाच एक याला
हा श्री विष्णू, कमला सीता
स्वयें जाणता असुन, नेणता
युद्ध करी हें जगताकरितां
दाखवी अतुल रामलीला
गदिमा गौरव | Special Quotes
कविवर्य बा.भ.बोरकर:
आदिकवी वाल्मीकीने आपल्या स्वतंत्र सौंदर्यदृष्टीने विधात्याच्या सूक्ष्म आणि स्थूल सृष्टीतून नेमके सौंदर्य टिपून काढून त्यातून आपली रामकथा रचली.त्याचप्रमाणे कविश्री माडगूळकरांनी वाल्मीकीच्या काव्यसृष्टीतले वेचीव सौंदर्य आपल्या स्चयंभू प्रतिभेने बिनचूकपणे निवडले आहे.गीतरामायणातली काही गीते रामायणासारखीच चिरंजीव होऊन राहतील आणि त्याचबरोबरच माडगूळकरांचे -माझ्या बंधुतुल्य मित्राचे-नाव देखील.