गीतरामायण शब्द | GeetRamayan Lyrics
50)किति यत्नें मी पुन्हा पाहिली तूंते
Kiti Yatne Me Tula Pahili tute
ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar
किती यत्नें मी पुन्हां पाहिली तूंते
लीनते, चारुते, सीते
संपलें भयानक युद्ध
दंडिला पुरा अपराध
मावळला आतां क्रोध
मी केलें जें, उचित नृपातें होतें
घेतले रणीं मी प्राण
नाशिला रिपू, अवमान
उंचावे फिरुनी मान
तव भाग्यानें वानर
ठरले जेते
शब्दांची झाली पूर्ती
निष्कलंक झाली कीर्ति
पाहिली प्रियेची मूर्ति
मी शौर्यानें वांकविलें दैवातें
तुजसाठीं सागर तरला
तो कृतार्थ वानर झाला
सुग्रीव यशःश्री ल्याला
सुरललनाही गाती मंगल गीतें
हें तुझ्यामुळें गे झालें
तुजसाठी नाहीं केलें
मी कलंक माझे धुतले
गतलौकिक गे लाभे रघुवंशातें
जो रुग्णाइत नेत्रांचा
दीपोत्सव त्यातें कैचा ?
मनि संशय अपघाताचा
मी विश्वासूं केवि तुझ्यावर कांते ?
तो रावण कामी कपटी
तूं वसलिस त्याच्या निकटीं
नयनांसह पापी भृकुटी
मज वदवेना स्पष्ट याहुनी भलतें
मी केलें निजकार्यासी
दशदिशा मोकळ्या तुजसी
नच माग अनुज्ञा मजसी
सखि, सरलें तें दोघांमधलें नातें