55)मज सांग लक्ष्मणा,जाउं कुठे ?
Maj Sang Laxmana Jau Kuthe
ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar
मज सांग लक्ष्मणा, जाउं कुठें ?
पतिचरण पुन्हां मी पाहूं कुठें ?
कठोर झाली जेथें करुणा
गिळी तमिस्त्रा जेथे अरुणा
पावक जिंके जेथें वरुणा
जें शाश्वत त्याचा देंठ तुटे
व्यर्थ शिणविलें माता जनका
मी नच जाया, नवे कन्यका
निकषच मानीं कासें कनका
सिद्धीच तपाला आज विटे
अग्नी ठरला असत्यवक्ता
नास्तिक ठरवी देवच भक्ता
पतिव्रता मी तरि परित्यक्ता
पदतळी धरित्री कंप सुटे
प्राण तनुंतून उडूं पाहती
अवयव कां मग भार वाहती ?
बाहतसे मज श्रीभागीरथी
अडखळें अंतिचा विपळ कुठें ?
सरले जीवन, सरली सीता
पुनर्जात मी आतां माता
जगेन रघुकुल-दीपाकरितां
फल धरीं रूप हें, सुमन मिटें
वनांत विजनी मरुभूमीवर
वाढवीन मी हा वंशांकुर
सुखांत नांदो राजा रघुवर
जानकी जनांतुन आज उठे
जाइ देवरा, नगरा मागुती
शरसे माझे स्वर मज रुपती
पती न राघव, केवळ नृपती
बोलतां पुन्हा ही जीभ थटे
इथुन वंदिते मी मातांना
प्रणामपोंच्वि रघुनाथांना
आशिर्वच तुज घे जातांना
आणखी ओठिं ना शब्द फुटे
श्रीराम.. श्रीराम.. श्रीराम..