बिनभितीची शाळा
हिडू ओढे, धुंडू ओहळ
झाडावरचे काढू मोहळ
चिडत्या, डसत्या मधमाशांशी
जरा सामना करू
बघू बंगला या मुंग्यांचा
सूर ऐकूया त्या भुंग्यांचा
फुलाफुलांचे रंग दाखवित
फिरते फुलपाखरू
बिनभितीची उघडी शाळा
लाखो इथले गुरू
झाडे, वेली, पशू, पाखरे
यांशी गोष्ट करू
भल्या सकाळी उन्हात न्हाऊ
ऐन दुपारी पर्ह्यात पोहू
सायंकाळी मोजू चांदण्या
गणती त्यांची करू
कसा जोंधळा रानी रुजतो?
उंदिरमामा कोठे निजतो ?
खबदाडीतील खजिना त्याचा
फस्त खाऊनी करू
सुग्रण बांधी उलटा वाडा
पाण्यावरती चाले घोडा
मासोळीसम बिनपायांचे
बेडकीचे लेकरू
हलवू झाडे चिटबोरांची
पिसे शोधुया वनी मोरांची
माळावरची बिळे चला रे
काठीने पोखरू
गदिमा गौरव | Special Quotes
कविवर्य बा.भ.बोरकर:
आदिकवी वाल्मीकीने आपल्या स्वतंत्र सौंदर्यदृष्टीने विधात्याच्या सूक्ष्म आणि स्थूल सृष्टीतून नेमके सौंदर्य टिपून काढून त्यातून आपली रामकथा रचली.त्याचप्रमाणे कविश्री माडगूळकरांनी वाल्मीकीच्या काव्यसृष्टीतले वेचीव सौंदर्य आपल्या स्चयंभू प्रतिभेने बिनचूकपणे निवडले आहे.गीतरामायणातली काही गीते रामायणासारखीच चिरंजीव होऊन राहतील आणि त्याचबरोबरच माडगूळकरांचे -माझ्या बंधुतुल्य मित्राचे-नाव देखील.