एक कोल्हा बहु भुकेला
फार होता कावला
एक तुकडा परि न त्याला
खावयासी गावला
एक कोल्हा बहु भुकेला ......
बापड्याने जंगलाचा
भाग सारा धुंडला
भर दुपारी तो बिचारा
दीनवाणा हिडला
शेवटाला थकून गेला
सावलीला थांबला
एक तुकडा......
एक
कोल्हा
बहु भुकेला...
उंच होते झाड त्याला
उंच शेंडा कोवळा
बसून वरती खाऊ खाई
एक काळा कावळा
चोचीमध्ये मांस धरून
चाखी तो, तो मासला
एक तुकडा.....
मारुनिया हाक त्यासी
गोड कोल्हा बोलला
एक गाणे गा मजेने
साद तुमचा चांगला
कोकीळेचे आप्त तुम्ही
घरीच त्यांच्या वाढला
एक तुकडा....
मूर्ख वेड्या कावळ्याने
रागदारी मांडिली
चोचीमधली चीज त्याच्या
त्वरित खाली सांडली
धावला कोल्हा सुखाने
घास त्याने जेविला
एक कोल्हा बहु....
गदिमा गौरव | Special Quotes
पु.ल.देशपांडे:
महाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर तर माडगूळकरांचे अनंत उपकार आहेत.इतर काहीही देण्यार्या माणसापेक्षा समाजाला गाणे देणार्या माणसाचे उपकार फार मोठे असतात.'Song has the longest life' अशी एक म्हण आहे.एक गाणे माणसांच्या पिढ्यानुपिढ्या बांधून ठेवते. एवढेच कशाला?.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे?.मराठी नाट्यसृष्टीत जी कामगिरी कै.देवलांनी केली,त्याच तोलामोलाचे कार्य माडगूळकर यांनी मराठी चित्रसृष्टीत केले आहे...म्हणूनच आम्ही सर्व माडगूळकर कलावंशाचे वारसदार ('Madgulkar Boys') आहोत,हे सांगायला मला अभिमान वाटतो.