ताई रडू नको बाई, रडू मला दाटते
तुझे आसू माझ्या गाली, ओघळती वाटते!
नीज माझ्या मांडीवरी गातो तुला मी अंगाई
डहाळीची दोन फुले माझी तुझी एक आई
मीट पाहू डोळे ओले कापरे की ओठ ते
ताई रडू नको बाई, रडू मला दाटते
किती किती
दिवसांनी तुझी माझी झाली भेट
जन्म झाल्यापासूनिया पहातो मी गे तुझी वाट
पुन्हा पुन्हा का ग डोळा पाणी तुझ्या साठते
ताई रडू नको बाई, रडू मला दाटते !
देतो तुला माझा खेळ ताई नको गं रागाऊ
चिमणीच्या दातांनी माझ्यातला देतो खाऊ
पापे देतो गालाचे मी पेढ्याहूनी गोड ते
ताई रडू नको बाई, रडू मला दाटते !
गदिमा गौरव | Special Quotes
पु.ल.देशपांडे:
महाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर तर माडगूळकरांचे अनंत उपकार आहेत.इतर काहीही देण्यार्या माणसापेक्षा समाजाला गाणे देणार्या माणसाचे उपकार फार मोठे असतात.'Song has the longest life' अशी एक म्हण आहे.एक गाणे माणसांच्या पिढ्यानुपिढ्या बांधून ठेवते. एवढेच कशाला?.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे?.मराठी नाट्यसृष्टीत जी कामगिरी कै.देवलांनी केली,त्याच तोलामोलाचे कार्य माडगूळकर यांनी मराठी चित्रसृष्टीत केले आहे...म्हणूनच आम्ही सर्व माडगूळकर कलावंशाचे वारसदार ('Madgulkar Boys') आहोत,हे सांगायला मला अभिमान वाटतो.