गदिमांची बालगीते/बालकविता | Balgeete/Children Songs
 •  
 • Box-C-27
 • कोण आवडे अधिक तुला?
 • Kon Awade Adhik Tula
 • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


 •  

  मुलगी :सांग मला रे सांग मला
  आई आणखी बाबा यांतुन
  कोण आवडे अधिक तुला ?
  मुलगा :आई दिसते गोजिरवाणी
  आई गाते सुंदर गाणी
  तर्हेतर्हेचे खाऊ येती
  बनवायाला सहज तिला
  आई आवडे अधिक मला.
  मुलगी :गोजिरवाणी दिसते आई
  परंतु भित्री भागूबाई,


  शक्तिवान किती असती बाबा
  थप्पड देती गुरख्याला
  आवडती रे वडील मला.
  घरात करते खाऊ आई
  घरातल्याला गंमत नाही
  च्युईंगम, अन् चॉकलेट तर,
  बाबा घेती रस्त्याला
  आवडती रे वडील मला.
  मुलगा :कुशीत घेता रात्री आई
  थंडी, वारा लागत नाही
  मऊ साङ्मीचे हात आईचे
  सुगंध तिचिया पाप्याला
  आई आवडे अधिक मला.
  मुलगी :निजता पण रे बाबांजवळी
  भुते-राक्षसे पळती सगळी
  मिशा चिमुकल्या करती गुदगुल्या
  त्यांच्या आपुल्या गालाला
  आवडती रे वडील मला.
  कोण आवडे अधिक तुला ?
  मुलगा :आई सुंदर कपडे शिवते
  पावडर, तिट्टी तीच लावते
  तीच सजविते सदा मुलींना
  रिबीन बांधुन वेणीला
  आई आवडे अधिक मला.
  मुलगी :त्या रिबिनीला पैसे पडती
  ते तर बाबा मिळवुन आणती
  कुणी न देई पैसा, दिडकी
  घरात बसल्या आईला
  आवडती रे वडील मला.
  मुलगा :बाई म्हणती माय पुजावी
  माणुस ना ती असते देवी
  रोज सकाळी नमन करावे
  हात लावूनी पायाला
  आई आवडे अधिक मला.
  मुलगी :बाबांचा क्रम वरती राही
  त्यांच्या पाया पडते आई
  बाबा येता भिऊनी जाई
  सावरते ती पदराला
  आवडती रे वडील मला.
  धडा शीक रे तू बैलोबा,
  आईहुनही मोठ्ठे बाबा
  म्हणून आया तयार होती बाबासंगे लग्नाला
  आवडती रे वडील मला.


गदिमा गौरव | Special Quotes
 • ग.दि.माडगूळकर(यवतमाळ,साहित्य संमेलनातील भाषणातून)
  गीत गायले जाते एवढया अपराधासाठी त्याच्या अंगावरची कवित्वाची भूषणे काढून कशासाठी घ्यायची? काव्यहीन गीते लिहिली जातात,तशी काव्यहीन कविताही पुष्कळ असते.पण छंदात रचलेली एखादी कविता कोणी तालस्वरावर गायली तर तिच्यातील कवित्व नाहीसे झाले असे कसे? माझ्यासारख्या एकाद्या कविला काव्य स्फुरते तेच छंदासह....
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems
गीतरामायण अॅप | GeetRamayan App
 • "गीतरामायण" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे!.
  आजच डाऊनलोड करा

  GeetRamayan application now available on android phones,now enjoy geetramayan songs in audio and text on your mobile,for more details click on following link Download Link
 • Box-RB-1