सांगती खोटे त्या गौळणी
आई ग, मी न चोरीले लोणी
मला न चोरी शब्द ठाउका
आळच घेती वृथा गोपिका
ऐकवती तरी कशी तुला ही निदेची बोलणी?
मी हा इवला, पोर चिमुकला
सुचेल चोरी कैसी मजला ?
काय जाणु मी कुठे कुणाची लोण्याची बोगणी?
घट लोण्याचे शिक्यावरती
ते येतील का माझ्या हाती?
मुख वत्सांचे काय पोचते, दाराच्या तोरणी?
का नंदाच्या कुळात जगती
मीच उपजलो पुन: मारुती?
उपजताच जो उडे अंबरी धरण्या वासरमणी?
मी नच जातो सोडुनिया घर
इथेच असतो सार्या दिसभर
दादासंगे खेळ खेळतो सोप्यावर, अंगणी
कुशीत निजतो तुझ्याच राती
जागविसी मज तूच प्रभाती
नवनीताचे नाव न घेतो स्वप्नातील भाषणी
सहज बिलगता लाडे लाडे
तुझ्या उरी मज सुधा सापडे
माझ्यासाठी ओसंडती घट, केल्याविन मागणी
कोणा घरी मी का मग जाऊ ?
कशास चोरून लोणी खाऊ?
साठविती का कुणी सुधा त्या मातीच्या रांजणी?
गदिमा गौरव | Special Quotes
प्रा.रा.ग.जाधव
माडगूळकरांनी सात आठशे वर्षांची विविध रुपरसांची परंपरा आधुनिक संस्कारांनी पुन्हा सजीव केली आहे.चैत्रबन म्हणजे या पुराण्या काव्यपरंपरेचे एक कलाप्रदर्शनच आहे.