गदिमांची बालगीते/बालकविता | Balgeete/Children Songs
 •  
 • Box-C-27
 • चिमणीची गोष्ट
 • Chimanichi Goshta
 • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


 •  

  उंच वडाच्या झाडावरती
  घरट्यामधुनी नांदत होती
  गोजिरवाणी रान पाखरं
  अनेक भाषा अनेक जाती
  त्यातच होते एक चिमुकले
  चिऊताईचे सुरेख घरकुल
  चिमणी बाळे तिची लाडकी
  उबेत बसुनी करीती किलबिल
  त्या बाळातच, अधु पंखांची
  चिऊताईंची होती मुलगी
  हिरमुसलेली सदा बिचारी
  कधी

  न कुणाशी करते सलगी
  एके दिवशी भल्या सकाळी
  सर्व पाखरं गेली उडुनी
  गेले राघू, गेल्या मैना
  जाई कबुतर, गेली चिमणी
  चिमणीमागे पिले सानुली
  सहज उभारून पंखे जाती
  घरट्यांमध्ये उरे एकली
  अधु पंखांची चिमणी मग ती


  बघता बघता शांत जाहले
  वडावरी त्या कोणी न उरले
  दुबळ्या चिमणीचे त्या डोळे
  अश्रुजलांनी दोन्ही भरले
  भावंडासम ती चिमणीही
  घेऊ पाहे एक भरारी
  कळ पंखांतून निघता दुखरी
  धडपडून ती पडे बिचारी
  तशीच बसुनी राहे मग ती
  मान काढुनी घरट्यामधुनी
  टकमक टकमक पाहत राही
  चार दिशांना उदासवाणी
  पंखांवाचून सूर्य वरी ये
  पान तरंगे पंखांवाचून
  रुई फुलांतून म्हातार्याही
  वरती उडती पंखांवाचून
  असेच आपण उंच उडावे
  म्हणे मनाशी ठामपणे ती
  मनोमनी ती उडे त्या क्षणी
  तिथेच पंखे पण थरथरती

  पुन्हा पाही खाली- वरती
  पिऊन घेई फिरता वारा
  ढगात भिडल्या होत्या घारी
  खाली होता गुलाब हसरा
  गुलाबास त्या कळ्या लहडल्या
  मिटल्या होत्या घट्ट पाकळ्या
  सकाळचे पण भिडता वारे
  हळू हळू त्या होती मोकळ्या
  त्याच पाकळ्यांपरि आपुले
  पंख फुलावे बघता बघता
  दुखल्या वाचून सुख का लाभे
  कोण थांबते दुखण्याकरिता
  उत्साहाने पुन्हा बघे ती
  घार तरळती, फुले उमलती

  हलती पाने, किरणे झुलती
  म्हातार्यांचे थवे पोहती
  पाण्यावरती लाटा हलती
  झाडांवरती गुलाब फुलती
  ‘हवेच हलणे मलाही येथून
  मीही भरारी घेईन वरती’
  नवल जाहले, नवल जाहले
  तशीच दुखरी पंखे घेऊन
  अंगबळे ती उडू लागली
  तसेच घरटे मागे ठेऊन
  दुखले थोडे पंख, परन्तुत्य
  त्या दुखण्याची तमा कुणाला
  उडू लागली दुबळी चिमणी
  फुले डोलली, सूर्य हासला


गदिमा गौरव | Special Quotes
 • प्रा.रा.ग.जाधव
  माडगूळकरांनी सात आठशे वर्षांची विविध रुपरसांची परंपरा आधुनिक संस्कारांनी पुन्हा सजीव केली आहे.चैत्रबन म्हणजे या पुराण्या काव्यपरंपरेचे एक कलाप्रदर्शनच आहे.
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems