नदीच्या पल्याड
पिपळाचे झाड
तिथे भरे बाळा,
पाखराची शाळा
शहाणा पोपट
शिकवितो पाठ
बोलाया शिकती
सानुले पोपट
त्यांच्यातील एक
राघूचा पोरटा
कंटाळून गेला
नेहमीच्या पाठा
नको झाली त्याला
आपुलीच भाषा
नवे शिकण्याची
उपजली आशा
पाखरांची शाळा
तिथेच सोडून
पोपटाचे पोर
गेले ते उडून
कोण्या एका जागी
माणसाची मुले
गिरवीत होती
धडे रे आपुले
मुलांची शाळा ती
पाहून सुंदर
खिडकीत बसे
पोपटाचे पोर
सकाळी दुपारी
तेथेच बसून
काही तरी नवे
घेई ते शिकून
बसता बसता
दिस मास गेले
माणसाची बोली
पाखरू शिकले
पाखरांची भाषा
सोडली तयाने
वेगळ्या बोलीने
पालटले जिणे
शिणेच्या पिलाशी
सोडून बोलणे
सोडले तयाने
पूर्वीचे वागणे
नको झाले त्याला
घर, आई-बाप
जातीतून दूर
झाले ते अपाप
बसून एकटे
दूरच्या ठिकाणी
स्वत:शी ते बोले
माणसाची वाणी
वाणी ती पडली
माणसाच्या कानी
कोणी एके त्याला
ठेवले धरूनी
धरोन ठेविले
पिजंर्यात त्याला
डाळिबाचा चारा
खाऊ त्या घातला
तेवढ्यात खावे
तेवढ्यात प्यावे
तेवढ्या जागेत
उडावे खेळावे
गुलामीची आच
कळो आली त्यास
पोपटाचे पोर
जाहले उदास
चोचीतून आली
बाहेर निराशा
त्याची त्या
स्फुरली
पाखरांची भाषा
गदिमा गौरव | Special Quotes
बा.भ.बोरकर
वस्तुत: माडगूळकरांचे गीतरामायण प्रभूरामचंद्र सिंहासनस्थ झाल्यावर सुरनरांच्या जयजयकारांत संपते. पण माडगूळकरांची प्रतिभा ते तिथे संपवित नाहीत...छंद आणि स्वर विराम पावले तरी तिचे तेज सरणारे दु:ख आपल्या अंतरात रेंगाळतच रहाते.यथाकाळ या रामायणाने पुन्हा नवा अवतार घ्यावा म्हणूनच तर त्यांच्या हातुन हे घडले नसेल?एवढे मात्र खास की तोपर्यंत आणि त्यानंतर देखील
यातील काही गीते गीतरामायणासारखी चिरंजीव होऊन राहतील आणि त्या बरोबरच माडगूळकरांचे-माझ्या बंधुतुल्य मित्राचे नाव देखील!.