‘‘झाडावरती घडे लटकले
घड्यात होते पाणी
त्या पाण्याच्या वड्या थापुनी
कुरकुर खाते कोणी
आता सांगा खिरापत... !
माझी सांगा खिरापत.... !’’
‘‘खोबरं !’’
बरोबर !
‘‘अफगणातील इजार भारी
त्याच्या हाती मोती
त्या मोत्यांना उन्हात पिकवून
पोरे बाळे
खाती
आता सांगा खिरापत
माझी सांगा खिरापत’’
‘‘मनुका..... !’’
‘‘कोकणातला पिवळा बाळू
फार लागला माजू
पकडून आणा भट्टीवरती
काळीज त्याचे भाजू’’
‘‘काजू.... !’’
‘‘तालमीतला पोर मारतो
पीठावरती थापा
सुरकुतलेली बोटे त्यांचा
गोड लागतो पापा
आता सांगा खिरापत
माझी सांगा खिरापत’’
‘‘खारका..... !’’
‘‘आधी होती काळी पिवळी
नंतर झालीस गोरी ग
देवळातुनी का ग फिरती
वेणुगावच्या पोरी ग
आता सांगा खिरापत
माझी सांगा खिरापत’’
‘‘हरलो....’’
‘‘खडीसाखर !’’
‘‘चट्टा मट्टा
बाळं भट्टा
आता मागील त्याला रट्टा
पंजा चाटीत निजेल गुपचुप
तो वाघाचा पठ्ठा’’
आता झाली खिरापत..... !
गदिमा गौरव | Special Quotes
पु.ल.देशपांडे:
महाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर तर माडगूळकरांचे अनंत उपकार आहेत.इतर काहीही देण्यार्या माणसापेक्षा समाजाला गाणे देणार्या माणसाचे उपकार फार मोठे असतात.'Song has the longest life' अशी एक म्हण आहे.एक गाणे माणसांच्या पिढ्यानुपिढ्या बांधून ठेवते. एवढेच कशाला?.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे?.मराठी नाट्यसृष्टीत जी कामगिरी कै.देवलांनी केली,त्याच तोलामोलाचे कार्य माडगूळकर यांनी मराठी चित्रसृष्टीत केले आहे...म्हणूनच आम्ही सर्व माडगूळकर कलावंशाचे वारसदार ('Madgulkar Boys') आहोत,हे सांगायला मला अभिमान वाटतो.