आनंद साधकांनो यारे मिळून सारे
मुक्तांगणात या रे ।।
वय, वंश, धर्म, भाषा
यांना न ठाव काही
क्रीडांगणी कलांच्या
हा भेदभाव नाही
मनमोकळेपणे घ्या
इथले पिऊन वारे ।।१।।
गा, नर्तनात रंगा
नाट्ये नवीन खेळा
स्वाध्याय नित्य
साधा
अभ्यास ना निराळा
कोणी गुरू न चेला
सहकार नांदवा रे ।।२।।
व्हा चित्रकार कोणी
स्वप्ने चितारण्यासी
व्हा शिल्पकार कोणी
आकार द्या जिण्यासी
अनुकूल क्षेत्र येथे
या अंगणी फुला रे ।।३।।
आनंद साधकांनो यारे मिळून सारे
मुक्तांगणास या रे ।।
गदिमा गौरव | Special Quotes
कविवर्य बा.भ.बोरकर:
आदिकवी वाल्मीकीने आपल्या स्वतंत्र सौंदर्यदृष्टीने विधात्याच्या सूक्ष्म आणि स्थूल सृष्टीतून नेमके सौंदर्य टिपून काढून त्यातून आपली रामकथा रचली.त्याचप्रमाणे कविश्री माडगूळकरांनी वाल्मीकीच्या काव्यसृष्टीतले वेचीव सौंदर्य आपल्या स्चयंभू प्रतिभेने बिनचूकपणे निवडले आहे.गीतरामायणातली काही गीते रामायणासारखीच चिरंजीव होऊन राहतील आणि त्याचबरोबरच माडगूळकरांचे -माझ्या बंधुतुल्य मित्राचे-नाव देखील.