गदिमा नवनित
  • कुंभारा सारखा गुरु नाही रे जगात
    वर घालितो धपाटा,आत आधाराचा हात.
मराठी युनिकोड फॉन्ट
गदिमांची बालगीते/बालकविता | Balgeete/Children Songs
  •  
  • Box-C-27
  • महाराष्ट्र-गीत
  • Maharashtra Geet
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •  

    शिवनिष्ठा येथ असे सतत जागती
    अग्रेसर प्रांत महाराष्ट्र भारती!

    भीमकाय सह्यगिरी पाठीशी उभा
    बलशाली आकांक्षा भेदिती नभा
    सरितांसह प्रगती इथे नित्य वाहती

    पैठणचे प्रेम अमित देश कोकणा
    पंढरीस ये विदर्भ देवदर्शना
    अजरामर ऐक्यभाव येथ दृढमती

    इतिहासा ज्ञात असे शौर्य येथले
    यज्ञाग्नि सर्वप्रथम येथ चेतले
    देशास्तव प्रथम दिल्या इथुनि आहुती

    परदास्ये होते जधि राष्ट्र घेरले
    संतांनी सद्विचार येथ पेरले
    ज्ञानाचे अमर दीप अजुन तेवती

    समतेचा बोध करी क्षेत्र पंढरी
    वेरुळची एकएक अतुल ओवरी
    अजुन अजिठ्यात उभी चित्र-संस्कृती

    शिवराजा, टिळक, भीम, गोखले, फुले
    अभ्यासित आदर्शा वाढती मुले
    साहित्यिक नवविचार येथ सांगती

    वाढतसे ज्ञान इथे खडक फोडुनी
    साकळल्या रूढींचे बंध तोडुनी
    विद्यार्थ्या येथ नसे वाण कोणती

    देवदत्त जो निसर्ग, आम्हा पुरे
    उद्योगे उद्याने उभवू गोपुरे
    सहकारा धुरिण इथे पूर्ण जाणती

    सुस्थिरल्या पंचायती, भागपरिषदा
    वाढविती श्रमिक कृषिक खपुन संपदा
    भवितव्य कोटी हात कसुन कोरिती

    पूर्णत्वा जाती इथे गृहित योजना
    सार्थकता लाभतसे नव-नियोजना
    प्रांत न हा, प्रगतीची सधन आकृती

    चक्रांकित तीन-रंगी राष्ट्रिय ध्वजा
    देवदूत मानी तिला येथची प्रजा
    वाढविते आप्तभाव हा सभोवती.


गदिमा गौरव | Special Quotes
  • ग.दि.माडगूळकर(यवतमाळ,साहित्य संमेलनातील भाषणातून)
    गीत गायले जाते एवढया अपराधासाठी त्याच्या अंगावरची कवित्वाची भूषणे काढून कशासाठी घ्यायची? काव्यहीन गीते लिहिली जातात,तशी काव्यहीन कविताही पुष्कळ असते.पण छंदात रचलेली एखादी कविता कोणी तालस्वरावर गायली तर तिच्यातील कवित्व नाहीसे झाले असे कसे? माझ्यासारख्या एकाद्या कविला काव्य स्फुरते तेच छंदासह....
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems