गदिमा नवनित
  • एकवार पंखावरुनी फिरो तुझा हात,
    शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात.
मराठी युनिकोड फॉन्ट
गदिमांची बालगीते/बालकविता | Balgeete/Children Songs
  •  
  • Box-C-27
  • रविवारी दुपारी
  • Ravivari Dupari
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •  

    एक भेटला माणूस
    तो होता चालत.
    मीही चालले बरोबर,
    त्याच्यासंगे बोलत.
    मी म्हटलं, ‘‘काका काका,
    कुठं तुम्ही निघालात ?’’
    माणूस म्हणाला, ‘‘का ग बाळ?
    मी चाललो बाजारात,
    गहू, तांदूळ खरेदी करू,
    संगे संगे परत फिरू,
    येतेस का तू बरोबर ?’’
    मी म्हटलं, ‘‘नक्को बाई.’’

    एक भेटला घोडा,
    तो होता चालत.
    मीही चालले बरोबर,
    त्याच्यासंगे बोलत.
    मी म्हटलं, ‘‘घोड्या घोड्या,
    तुझी दौड कुठवर ?’’
    घोडा म्हणाला, ‘‘का ग बाळ?
    मी जातोय माळावर.
    मी राहीन चरत चरत,
    तू हिड पाखरे धरत.
    येतेस का तू बरोबर ?’’
    मी म्हटलं, ‘‘नक्को बाई !’’

    एक भेटल्या मावशीबाई,
    त्या होत्या चालत.
    मीही चालले बरोबर,
    त्याच्यासंगे बोलत.
    मी म्हटलं, ‘‘मावशीबाई,
    कुठं निघाला उन्हातान्हात?’’
    मावशी म्हणाल्या, ‘‘का गं बाळ ?
    मी निघालेय तुळशीबनांत.
    तिथल्या देवळात टेकू,
    कथा पुराण ऐकू.
    येतेस का तू बरोबर ?’’
    मी म्हटलं, ‘‘नक्को बाई !’’

    एक भेटला पांढरा ससा,
    तो होता चालत.
    मीही निघाले बरोबर,
    त्याच्यासंगे बोलत.
    मी म्हटलं, ‘‘सशा, सशा,
    कुठे जाशी उन्हात अशा ?’’
    ससा म्हणाला, ‘‘का ग बाळ ?
    मी निघालो हिरवळीत.
    मी चरेन ऐसपैस;
    तू आपली सावलीत बैस.
    येतेस का तू बरोबर ?’’
    मी म्हटलं, ‘‘नक्को बाई !’’

    एक भेटलं कुत्र्याचं पिल्लू,
    ते होतं चालत.
    मीही निघाले बरोबर,
    त्याच्यासंगे बोलत.
    मी म्हटलं, ‘‘टुबुकराव -
    तुमचा दौरा कोठवर ?’’
    पिलू म्हणालं, ‘‘भू: भू,
    मी निघालो डोंगरावर
    येतेस का तू लोळायला?
    उतरणीवर खेळायला ?’’
    ते माझ्या मनात आलं
    मी म्हटलं - ‘‘आले, आले !’’


गदिमा गौरव | Special Quotes
  • पु.ल.देशपांडे:
    महाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर तर माडगूळकरांचे अनंत उपकार आहेत.इतर काहीही देण्यार्‍या माणसापेक्षा समाजाला गाणे देणार्‍या माणसाचे उपकार फार मोठे असतात.'Song has the longest life' अशी एक म्हण आहे.एक गाणे माणसांच्या पिढ्यानुपिढ्या बांधून ठेवते. एवढेच कशाला?.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे?.मराठी नाट्यसृष्टीत जी कामगिरी कै.देवलांनी केली,त्याच तोलामोलाचे कार्य माडगूळकर यांनी मराठी चित्रसृष्टीत केले आहे...म्हणूनच आम्ही सर्व माडगूळकर कलावंशाचे वारसदार ('Madgulkar Boys') आहोत,हे सांगायला मला अभिमान वाटतो.
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems