ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar
शिक्षिका :
एक होउनी गेला पूर्वी राजाचा लेक
नांव जयाचे अजुन घेती दुनियेतील लोक
तो राजाचा लेक होऊनी घोड्यावर स्वार
दर्याकपारी हिडुनी घेई लोक समाचार
वाड्या खेडी वस्त्यांमाजी जाई तो थेट
गरीब भाबड्या प्रजाजनांची घेत प्रीत भेट
त्याच्या भवती जमती काळे कुणब्याचे बाळ
राजपुत्र त्या मुलांत खेळे मर्दानी खेळ
लाठी काठी बर्ची भाला लेजीम तलवार
केव्हा केव्हा जुन्या कहाण्या, ग्रंथातील सार
तो नाकेला कृष्ण सांवळा उमदा शिवराज
बालवयातच मराठदेशी झाला महाराज
प्रेम प्रीतीने आप्त जोडुनी करी एकजूट
एके दिवशी शिवालयी तो करी उंच मूठ
बाल शिवाजी :
शपथ शिवाची तुम्हा घालतो
मनी असे ते उघड बोलतो
उगीच म्हणती मजसी राजा
मुलुख पराधिन तुमचा माझा
अंमल परका इथे चालतो
मनी असे ते उघड बोलतो
कोण चालवी येथे सत्ता?
लढती मराठे कोणाकरता ?
कोण येथला न्याय तोलतो?
मनी असे ते उघड बोलतो
सत्ता भोगी आदिलशाही,
निजामशाही, मोंगलशाही
तुकड्यासाठी जन्म घालतो
मनी असे ते उघड बोलतो
एक सरदार :
काय करू ते बोल !
राजा ! काय करू ते बोल !
बाल शिवाजी :
ऊठ मराठ्या ऊठ !
ऊठ मराठ्या निशाण भगवे उंच आभाळी तोल
देश आपुला अपुली भूमी
आपण आपुले होऊ स्वामी
परसत्तेच्या पायी मरता काय जिण्याला मोल!
याच घडीला घ्यारे शपथा
जीवन देऊ देशाकरिता
दर्याकड्यातून घुमवू तुमच्या आतड्यांतले बोल
बाल शिवाजी व बाल सरदार :
शपथ शिवाची, सदाशिवाची
शंभू महादेवाची
या देशातून हुसकू परका
उंच उभारू वरि जरिपटका
स्वर्गस्थांच्या जावो कानी
हीच प्रतिज्ञा नव्या पिढीची
कुरवंडी या करूं जिवाची
शपथ शिवाची, सदाशिवाची, शंभू महादेवाची !
हरहर महादेव ! जय भवानी !!