ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar
कोवळ्या रोपट्या, आज तू पाहुणा
भूषवी अंगणा, येऊनिया ।
माणसाचा स्नेह, स्वीकारी संगती
मानाचा अतिथी आमुचा तू ।
श्यामसुंदराच्या, देहुड्या ढंगात
येई या घरात, आनंदाने ।
आनंदाचा नाद, मंजुळ संगीत
शाखापल्लवात, घेऊन ये।
कोवळ्या
पानात, तुझिया नवीन
सूर्याचे किरण, नाचू देत।
वनाचा वल्लभ, नाचताहे वारा
देई उपहारा, गीताचा त्या।
वर्षतो श्रावण, आशीर्वाद त्याचा
मुकुट माथीचा, होवो तुज।
इंद्रपुरीतून, धारा वर्षताती
पडू दे त्या माथी, पानांवर।