भारतास का मानवमात्रा
स्फुरणदायी ती दांडीयात्रा
सत्याग्रही नववीर निघाले
अन्यायाचे मूळ हराया
मीठास होता महाग भारत
तुज मुंगीचे कळे मनोगत
तुझ्या हृदयिचा उठला ईश्वर
दास्यमुक्तहा देश कराया
मीठ त्या क्षणी ठरले अमृत
निद्रित जनता झाली जागृत
नमली सत्ता, सरले शोषण
काय नाव या द्यावे विजया
लोकसेवका, लोकनायका
लोकशक्तिच्या धन्य मांत्रिका
देशोन्नतीचे सत्पथ सारे
भिडती येऊन तुझ्याच पाया
गदिमा गौरव | Special Quotes
कविवर्य बा.भ.बोरकर:
आदिकवी वाल्मीकीने आपल्या स्वतंत्र सौंदर्यदृष्टीने विधात्याच्या सूक्ष्म आणि स्थूल सृष्टीतून नेमके सौंदर्य टिपून काढून त्यातून आपली रामकथा रचली.त्याचप्रमाणे कविश्री माडगूळकरांनी वाल्मीकीच्या काव्यसृष्टीतले वेचीव सौंदर्य आपल्या स्चयंभू प्रतिभेने बिनचूकपणे निवडले आहे.गीतरामायणातली काही गीते रामायणासारखीच चिरंजीव होऊन राहतील आणि त्याचबरोबरच माडगूळकरांचे -माझ्या बंधुतुल्य मित्राचे-नाव देखील.