Bin Bhintinchi Ughadi Shala
ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar
बिन भिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरू
झाडे, वेली, पशु, पाखरे यांशी गोष्टी करू
बघू बंगला या मुंग्यांचा, सूर ऐकुया या भुंग्यांचा
फुलाफुलांचे रंग दाखवील फिरते फुलपाखरू
सुग्रण बांधी उलटा वाडा, पाण्यावरती चाले घोडा
मासोळीसम बिन पायांचे बेडकिचे लेकरू
कसा जोंधळा रानी रुजतो, उंदीरमामा कोठे निजतो
खबदाडातील खजिना त्याचा फस्त खाऊनी करू
भल्या सकाळी उन्हात न्हाऊ, कड्या दुपारी पर्ह्यात पोहू
मिळेल तेथून घेउन विद्या अखंड साठा करु