गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
Box-C-30
महेशमूर्ती तुम्ही सभाजन
MaheshMurti Tumhi Sabhajan
ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar
महेशमूर्ती तुम्ही सभाजन करा निवाडा हवा तसा
तुरेवाल्याच्या उरी उठविते मी कलगीचा पाय ठसा
मर्यादेने बोल जराशी धर श्रोत्यांची भीड जरा
बडबडीने का पडेल खाली विद्वत्तेचे चिन्ह तुरा
विद्वत्तेची उडवीन पगडी मी जातीने नार तरी
सवालास दे जबाब माझ्या मग विद्वत्ता
तुझी खरी
गाडाभरुनी ग्रंथ वाचले तुरा लाविला म्हणुनी शिरी
तू मातीची जिती बाहुली कर मुजरा अन् परत घरी
एकच पुसते सवाल त्याचे उत्तर दे मग बोल चढे
आभाळाहून काय थोरले काय धाकटे तिळापुढे
मन मनुजाचे विशाल होते आभाळाहुन कधी कधी
कधी आकसुन होते हलके लपून बसते तिळामधी
प्रश्नावरुनी कळते अक्कल आम्ही मापतो उंची ग
विद्वत्तेची शाल आम्हावर तुला मुलाची कुंची ग
सवाल कसला व्यर्थ पुसावा एक उखाणा पुरे तुला
सोडविण्याला अतिशय सोपा सुचेल उत्तर सहज तुला
घड्याएवढा जाड भोपळा वेल तयाचा बोटभरी
पाच पुरुष वर वाढे कवठी फळे तिची का मुठभरी
दोन दिसांचा देतो अवधी उत्तर शोधुन आण इथे
नाही गावले तर मग ठरले मस्तक बाई तुझे रिते
मायेने ही केली रचना तुझ्याचसाठी सर्व नरा
वृक्षवल्लरी तुझ्याचसाठी, तुझ्याचसाठी सर्व धरा
विसाव्यास जरी जाईल माणूस दमुनी-शिणुनी तरुतळी
उंच तरुला फळे चिमुकली म्हणुनी लागती धरातळी
कवठी जर असती पिकली घड्याएवढी अशी फळे
अपघाताने मेली असती रोज अचानक मनुज फळे
गदिमा गौरव | Special Quotes
कविवर्य कुसुमाग्रज (गदिमा गेले तेव्हा)
महाराष्ट्र सरस्वतीचा लाडका पुत्र काळाने हिरावुन नेला.माडगूळकरांच्या निधनाने मराठी साहित्यातील उत्तम संस्कार मावळला.आणि एक सुंदर संगीत हरपले.विविध रसांवर विलक्षण प्रभुत्व करणारा त्यांच्या सारखा कवी अलीकडच्या काळांत झाला नाही.गीतरामायणाने माडगूळकर चिरंजीव झाले पण मराठीतील विविध रसांचे आणि कवितेतील अपूर्व चैतन्य गेले.