गदिमा नवनित
  • दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट
    एक लाट तोडी दोघां, पुन्हा नाही गांठ
मराठी युनिकोड फॉन्ट
एका महाकवीचा समर्थ वारसा चालविणारे ग.दि.मा प्रतिष्ठान
  • सुमारे दीड हजारांच्यावर चित्रपटगीते,दीडशे मराठी व पंचवीस हिंदी चित्रपटकथा,दोन कादंबर्‍या,अनेक कथा,कविता,लेख,संगीतिका,गीतरामायण आणि गीतगोपाल सारखी दोन महाकाव्ये,दोन नाटके,अनेक चित्रपटातून अभिजात अभिनय आणि महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर सर्वदूर केलेली उदबोधक व्याख्याने यातून मराठी माणसांच्या जीवनात सुगंधासारख्या शिरलेल्या ग.दि.माडगूळकर या महाकवीचे १४ डिसेंबर १९७७ रोजी अकाली वयाच्या अवघ्या ५८व्या वर्षी दु:खद निधन झाले आणि सारा सांस्कृतीक महाराष्ट्र हादरुन गेला.

    गदिमांच्या अकाली जाण्याने मराठी सारस्वताची अनेक दालने पोरकी झाली.तसेच साहित्य आणि चित्रपटक्षेत्रातीलच नव्हे तर सर्वसामान्य मराठी माणूसही व्यथित झाला.गदिमांचे त्यांच्या कार्यकर्तुत्वाला यथोचित स्मारक आपल्या भागात उभे रहावे यासाठी महाराष्ट्रातील अनेक भागातून मागण्या येऊ लागल्या.या सार्‍या परिस्थितीचा विचार करुन गदिमांचे व्याही व जेष्ठ उद्योजक बाबुरावजी पारखे यांच्या अध्यक्षतेखाली खोपोली येथे गदिमांचे चाहते,स्नेही आणि आप्तेष्ट यांची बैठक होऊन त्यात गदिमांच्या नावाने प्रतिष्ठान स्थापन करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला.

    ग.दि.मा प्रतिष्ठान स्थापन करण्याचे मुख्य उद्दीष्ट पुढील प्रमाणे ठरविण्यात आले होते.

    १. गदिमांचा स्मृतीदीप अखंड तेवत ठेवणे.
    २. गदिमांच्या जन्मभूमी व कर्मभूमीवर त्यांचे यथोचित स्मारक उभारणे.
    ३. मराठी चित्रपट,साहित्य,कला,इत्यादी श्रेत्रात अविस्मरणीय कामगिरी करणार्‍्यांचा गदिमांच्या नावाने उचीत गौरव करणे.
    ४. प्रतिभावान नवोदित कलाकारांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सन्मानित करणे.
    ५. गदिमांचे अप्रकाशित साहित्य प्रकाशित करणे व अशा प्रकाशनाला मदत करणे.
    ६. गदिमांचे चित्रपट व साहित्याचे जतन करणे व त्याचा प्रसार करणे.
    ७. गदिमा संस्कार करुन मराठी भाषा व संस्कृतीचा विकास करणे.

    वरिल उद्दीष्टपूर्ती साठी १७ एप्रिल १९७८ रोजी जेष्ठ उद्योजक बाबुरावजी पारखे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे गदिमा प्रतिष्ठानची सार्वजनिक न्यास म्हणुन रीतसर नोंदणी करण्यत आली.
    सुरुवातीच्या सुमारे १० वर्षे बाबुरावजी पारखे आणि त्यानंतर विसुभाऊ आरेकर यांच्या कुशल नेतृत्वाखाली ग.दि.मा प्रतिष्ठानने नेत्रदिपक वाटचाल सुरु केली.

    आजवर श्री.ना.पेंडसे,ना.घ.देशपांडे,पु.ल. देशपांडे,व्यंकटेश माडगूळकर,बा.भ.बोरकर,मंगेश पाडगावकर,शिवाजी सावंत,इत्यादी साहित्य श्रेत्रातील तर सुधीर फडके,आशा भोसले,माणिक वर्मा,गजाननराव वाटवे इत्यादी गायन श्रेत्रातील व सुलोचनादीदी,जयश्री गडकर,रमेश देव,इत्यादी चित्रपट श्रेत्रातील दिग्गजांना गदिमा पुरस्कार तर श्रीधर फडके,सुधीर मोघे,सुधीर गाडगीळ इत्यादी त्या त्या श्रेत्रातील उदयोन्मुख नवोदितांना चैत्रबन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

    १९९५ पासून गदिमांच्या पत्नी कै.विद्याताई माडगूळकर यांच्या नावे सुरु करण्यात आलेल्या गृहिणी-सखी-सचीव पुरस्काराने सुनीता देशपांडे,साधना आमटे,मंगला नारळीकर,सुमती गुप्ते,सीमा देव यांचा गौरव करण्यात आला.या शिवाय गेल्या काही वर्षात एस.एस.सी.बोर्डात मराठी विषयात संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्या येणार्‍या विद्यार्थाचा गौरव करण्यात येतो.गेली ३६ वर्षे हा उपक्रम अखंडपणे चालू असून मराठी साहित्य व चित्रपट क्षेत्रात गदिमा सन्मान अतिशय प्रतिष्ठेचा मानला जातो.

    गदिमा प्रकाशनाने काढलेल्या पूरिया,वैशाखी तर विश्व मोहिनी प्रकाशनाने काढलेल्या वाटेवरल्या सावल्या या नितांत सुंदर पुस्तकांना प्रतिष्ठानने भरगोस मदत केली.गदिमा.कॉम व गीतरामायण.कॉम या बेबसाईट साठी गदिमा प्रतिष्ठानने मदत केली आहे,२००५ साली पुण्याच्या रमणबाग प्रशालेच्या पटांगणावर पार पडलेल्या गीतरामायण सुवर्ण महोत्सवाचा दिमाखदार सोहळा हा गदिमा प्रतिष्ठानच्या शिरपेचातील मानाचा तुरा ठरला आहे.गदिमा प्रतिष्ठानने सातत्याने साजरा केलेल्या १४ डिसेंबर गदिमा स्मृतीदिन सोहळ्याला तर रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आला आहे. कधी कधी इतकी कार्यक्रमाला गर्दी झाली आहे की टिळक स्मारकची स्लॅब कोसळतेकी काय अशी भीती व्यवस्थापनातर्फे व्यक्त करण्यात आली तर काही कार्यक्रम प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे प्रेक्षकगृहाबाहेर स्क्रीन लावून दाखविण्यात आले आहेत.

    साहित्यप्रेमी व गदिमाप्रेमी रसिक प्रेक्षक यांच्यामुळेच गदिमा प्रतिष्ठानचे कार्य सुरळीतपणे चालू आहे. तसेच प्रसारमाध्यमांनीही सुरुवातीपासूनच गदिमा प्रतिष्ठानला योग्य ती प्रसिद्धी दिली आहे.
    यापुढे गदिमांचे माडगूळ व पुणे येथील स्मारक व त्यांच्या साहित्याला डिजीटली जतन करणे हे प्रतिष्ठानचे मुख्य उद्दीष्ठ राहिल.
  • Box-C-23


गदिमा गौरव | Special Quotes
  • पं.महादेवशास्त्री जोशी
    गीतरामायण म्हणजे आदर्शाचा उत्तुंग पुतळा म्हटला, तर गीतगोपाल म्हणजे त्याच्या भोवतीच बहरलेले कुंजवन म्हणता येईल.तिथे प्रणाम करायचा,इथे विहार!गीतरामायणाची वाणी ही भारलेली आहे.तर गीतगोपालाची वाणी झंकारलेली आहे.गीतरामायण हा मराठी शारदेच्या मखरात बसतांना घालायचा मुकुट तर गीतगोपाल हा तिचा हळदीकुंकुवाला जातांना गळ्यात रुळवायचा रत्नहार म्हणणे संयुक्तिक ठरेल..