पद्मश्री कै.गजानन दिगंबर माडगूळकर यांना गदिमा या लाडक्या नावाने मराठी रसिक ओळखतो.दोन हजारांहून अधिक चित्रपट गीते आणि दीडशेहून अधिक पटकथा इतकी प्रचंड साहित्य संपदा कमावणमर्या गदिमांना गीत रामायण लेखनाने आधुनिक वाल्मीकी हा सार्थ सन्मान मिळवून दिला. गीतरामायणाला धर्म ग्रंथाचे स्वरुप प्राप्त झाले.समाजात रुढ असलेल्या चैतन्यांचे त्यांनी अनन्यभावे स्तवन केले,या स्तवनांचा तितक्याच भक्तिभावाने सादर केलेला अविष्कार म्हणजेच चैतन्य गौरव !.
महाकवी ग.दि.माडगूळकर विरचित गणपति अथर्वशीर्षाचे मराठी गीतांतर संगीत : प्रभाकर जोग गायक : आनंद माडगूळकर,वैजयंती लिमये
Box-C-9
चैतन्य गौरव - अथर्वशीर्षाचे मराठी गीतांतर
Chaitanya Gaurav - Atharvashirsha In Marathi
गीतकार: ग.दि.माडगूळकरLyricist: Ga.Di.Madgulkar
संगीतकार: प्रभाकर जोगMusic Composer: Prabhakar Jog
गायक: आनंद माडगूळकर,वैजयंती लिमयेSinger: Anand Madgulkar,Vaijayanti Limaye
रांजणगांवी गणपती | यशद झाला पित्याप्रती
त्रिपुराची करी समाप्ती | शिव ज्याच्या प्रभावें
महाराष्ट्रीं अष्टविनायक | त्यांचे पायीं नतमस्तक
होउनिया ग्रंथलेखक | देशभाषा बलतो
तूं तो ओंकार साकार | अखिल विश्वाचा आधार
मूल तत्त्व निराकार | तोहि तूंची गणेशा
तूंच या विश्वाचा निर्माता | तूंच कर्ता चालविता
तूंच अंती लयकर्ता | त्रिगुणांची मूर्त तू
निर्गुण अथवा सगुण | तया मुळीचे ब्रम्हपण
ते हि साक्षात श्रीगजानन | निःसंदेह बोलतो
दृश्य जगतीचे चेतन | आत्मरुप कानडें गहन
तें हि प्रत्यक्ष श्री गजानन | अनंत आणि निरंतर
माझे बोलणे व्यावहारिक | जे आधीचेच सत्य तात्त्विक
त्याचे प्रवचन प्रामाणिक | तुज पुढती मांडितो
अभय असो मज वक्त्यासी | अभय असो गा श्रोत्यासी
अभय असो गा दात्यासी | परोपकारी सज्जनां
जे जे या त्रिजगती | ब्रम्हविद्या संपादिती
तयांच्या राहोनी मागे पुढती | रक्षी देवा गणेशा
वाम अथवा दक्षिणदिशी | अंतराळी वा भूप्रदेशी
जेथून उगम संकटांशी | तेथे उभा ऐस तू
वेदशास्त्रादि वाङ्मय | तोहि तुझाचि रुपप्रत्यय
शब्दातीत वा अव्यय | ते ही तुझीच गुणव्याप्ती
नामरुपाचा अहंभाव | धरोनी नांदे जड जीव
तयाचाहि होई संभव | तुझिया रुपीं अनंता
तूं अविनाशी चैतन्यमय | आनंदरुपी आनंदमय
साक्षात ब्रम्ह जे अद्वितीय |आदितत्व तूंचि ते
तू चि ब्रम्ह ब्रम्हज्ञान | तूंच माया आणि विज्ञान
भौतिकाचेही अधिष्ठान | तुझिया रुपे गोंवले
सृष्टि तुझिया मधुनी उपजे | तुझिया मुळेचमाया सजे
तुझिया ठायीच अंती थिजे | ऐसे वेदांत बोलतो
तूंच पृथ्वी आणि आकाश | वायु वारि वा प्रकाश
अवघ्या भूतांचा आवेश | तव चैतन्य निर्मिते
परा पश्यंती,वैखरी | मध्यमेसह वाणी चारी
त्याहि तुझिया निराकारी | आकारी गणेशा
जे सत्त्व,रज,तमांकित | तूं तयाच्या न अंकित
तिन्ही वेगळा त्रिगुणातीत | सर्व सर्वापार तू
स्थूल ,सूक्ष्म आणि कारण | तया वेगळा देहहीन
भूत,भविष्य,वर्तमान | यांच्या पैलाड ठाकसी
मानवदेही,मूलाधार | चक्र जे निराकार
तेथ तुझा अविष्कार | नित्य वास्तव्य नांदते
जनन,रक्षण,संहरण | तिन्हीचे तू अधिष्ठान
योगी करिती तुझेच ध्यान | स्वसंवेद्य आद्य तू
विष्णू करी जगरक्षण | रुद्र करतो संहरण
तया देवतांचे एकपण | तुझिया अंगी जागते
इंद्र देवांचा राज्यकर्ता | अग्नि यज्ञाचा हव्यभोक्ता
वायु वाहता ,प्राणदाता | सारी रुपे तुझीच ही
प्रकाशदाता श्री भास्कर | चंद्र औषधीचा ईश्वर
तया उभयतांचे सहस्त्रकर | तेजो वलये तुझीच ती
ब्रम्हलोक वा भूस्थल | अंतरिक्ष वा स्वर्गलोक थोर
प्रणवाक्षर की ओंकार | तोहि तूची समर्था
’ग’ वर्णाचा करुनी उच्चार | त्यांत मिसळावा अ’ कार स्वर
अर्धेदुवत अनुस्वार | तत्संगती बोलावा
मग होईल पूर्णोच्चार | मूलाधार जे प्रणवाक्षर
सवर्ण नाद जो ओंकार | रुपमांगल्य ते तुझे
प्रारंभ रुप तो ग कार | मध्यम रुप तो अ कार
अंत्यरुप अनुस्वार | बिंदु उत्तर रुप ते
या सर्वांचा एकत्रित नाद | स्वरास्वरांचा सुसंवाद
तोचि अनादि ब्रम्हनाद | ओंकार मंगल बोलीजे
हाचि तुझा नाममंत्र | हाचि प्रसिध्द सर्वत्र
हा उच्चारितां अहोरात्र | मुक्ती पायीं लोळती
या मंत्राच्या सामर्थ्याशी | द्रष्टा झाला गणकऋषी
निचृत गायत्री छंदाशी | भूषविलें मंत्राने
ॐ गं गणपतयेनमः | हाच मंत्र ,मंत्रमहिमा
याच्या शक्तीस ना सीमा | अष्टाक्षरी मोक्ष या
एकदंचाचे महात्म | मियां जाणिले निश्चित
वक्रतुंड झाला ज्ञात | त्यासी घ्यातो अहर्निसी
मज साधनाक्रियमाणा | श्री गणेश देवो प्रेरणा
ही गणेश गायत्री जाणा | वाराणसी मंत्राची
चतुर्भुज आणि एकदंत | आयुधे शोभती हस्तांत
पाशांकुश,भग्नदंत | वरद मुद्रा शोभते
मुषकांकित रक्तध्वज | करी मिरवी ज्येष्ठराज
रक्तवर्णी महा-तेज | सा-या देहीं फांकते
लंबोदर हा शूर्पकर्ण | वस्त्रे ल्याला रक्तवर्ण
देही सर्वांगासी रक्त चंदन | मंगलमूर्ती झळकते
रक्तसुमनांच्या मालिका | भक्त वाहती गणनायका
ऐसा विनटतो भक्तसखा | विश्वकर्ता विनायक
प्रकृती अथवा पुरुष | यांच्या पैलाड श्रीगणेश
उग्रमूर्ति,उग्रवेष | मंगलकर्ता भक्तांचा
मनाचिया,लोचनांपुढती | ऐसी निर्मूनिया ध्यानमूर्ती
ध्यान करित जे पूजिती | तेच योगी या जगी
तपश्चर्यांचा अधिपती | व्रातगणांचा गणपती
अवघे देव ज्या आदरिती | तो म्यां भावें वंदिला
एकरदन हा लंबोदर | शिवशक्तींचा प्रियकुमार
भक्तप्रेमी अभयंकर | नमस्कारिला दंती मी
गणेश भक्तीचा मार्ग आर्ष | देशीमाजी अथर्वशीर्ष
सर्वोपासनाचा आदर्श | अथर्वशीर्षी पूजिला
अथर्वशीर्षाचे अध्ययन | जे जे करिती भाग्यवान
देहीच ब्रह्मत्व येऊन | सायुज्य मुक्ति पावती
विघ्नांची ना होय बाधा | सुखचि लाभे सर्वदा
स्पर्शू न शकती आपदा | गाणपत्या कदापिहि
हिंसा किंवा अभक्षभक्षण | चौर्य कीं परस्त्रीगमन
ऐसी पापे जातीं जळून | गणेशभक्ता पाहतां
संध्यासमयीं दिवसाअंती | जे जे याचा पाठ करिती
तयांची पापे भस्म होतीं | दिवसांघडली अजाणतां
पाठ करिती जे प्रात काळी | दिनजन्माचे रम्यकाळी
रात्री घडली पापावळी | नाश पावे दंवासवें
पठन करिती जे त्रिवार | तया न शिवे पापविचार
प्राप्त होती पुरुषार्थ चार | धर्म अर्थ इत्यादिक
ज्यांना नसे शिष्यभाव | नास्तिकताचि मूळस्वभाव
गणेशभक्तिची ही ठेव | सांगो नोहे तयांप्रती
अनाधिका-या उपासना | देवों नये कधीं कोणा
दात्या देई हीनपणा | दान ऐसे करो नये
अथर्वशीर्षाची आवर्तने | सहस्त्रवेळा शुध्दमने
जे जे करिती भक्त शहाणे | सर्व ईप्सित पावती
अथर्वशीर्षे संमत्रक | करिता गणेश अभिषेक
हाती येतें जन्मसार्थक | वक्ता अजिंक्य होईल तो
चतुर्थीच्या मंगल दिवशी | व्रती राहोन उपवासी
जे जे करिती मंत्रजपाशीं | विद्यासंपन्न होती ते
शंका न धरावी ये विशीं | पत्यक्षबोलला अथर्वऋषी
सिध्द सांगे अनुभवाशीं |याचा प्रत्यय आगळा
अर्थवशीर्षा जे जे जपती | ब्रह्म मायासाग्र जाणिती
निर्भयत्व ते पूर्ण पावती | शरण आणिती भवभूतां
अथर्वशीर्षाचे मंत्रे करुन | जे दूर्वादलें करिती हवन
ते ते होती धनसंपन्न | कुबेर होती पृथ्वीचे
साळीच्या फुलवून लाह्या | जे जे हवनास करतील ह्या
त्यांच्या विघ्नेश धांवे साह्या | सर्वगामी होतसे बुध्दी
चोहोंकडून यश समृध्दि | श्रावण वर्षे सौख्याचा
सहस्त्रमोदंके करिती हवन | त्यांना पावे शिवनंदन
गजाननाचे वरदान | म्हणजे सर्वस्व लाभतें
अधिकारी अष्ट ब्राह्मणांस | करील जो मंत्राचा उपदेश
त्याचे देहीं फुटे प्रकाश | आदित्य चंद्रासारखा
ग्रहणकाळी नदीकाठी | जे जे रमती मंत्रपाठी
सर्व सिध्दि तयासाठी | अहमहमिका लाविती
प्रतिमेपाशी बसुनी कोणी | पाठे करितां धन्य वाणी
दोषमुक्त तो होतो प्राणी | सर्व विघ्ने विनाशती
नकळत घडले पापदोष | नष्ट होऊनी निःशेष
पापी पावतो संतोष | पापविचार नासती
किंबहुना पाठकर्ता | स्वयेची होतो पापहर्ता
आपणितो सर्वज्ञता | ऐसे महात्म पाठाचें
ग्रंथ पाठ करतां प्रत्यहीं | अशक्य ऐसें काहीच नाही
श्रीगणेशहि प्राप्त होई | गणेश विद्या धन्य ही
गजाननाचा गुणानुवाद | पुरातन हा आर्षनाद
उमासुतार्थी उपनिषद | येथ संपूर्ण जाहलें
गदिमा गौरव | Special Quotes
ग.दि.माडगूळकर(यवतमाळ,साहित्य संमेलनातील भाषणातून)
गीत गायले जाते एवढया अपराधासाठी त्याच्या अंगावरची कवित्वाची भूषणे काढून कशासाठी घ्यायची? काव्यहीन गीते लिहिली जातात,तशी काव्यहीन कविताही पुष्कळ असते.पण छंदात रचलेली एखादी कविता कोणी तालस्वरावर गायली तर तिच्यातील कवित्व नाहीसे झाले असे कसे? माझ्यासारख्या एकाद्या कविला काव्य स्फुरते
तेच छंदासह....