Lala Jivhala Shabdach Khote
श्रीधर माडगूळकर | Shridhar Madgulkar
१९७० साल,पुण्यात गणेशखिड रोडवरच्या कस्तुरबा मंगल कार्यालयात जणू साक्षात् दुसरे मराठी साहित्य संमेनचच भरले होते. प्रसंगच तसा होता. गदिमांची द्वितीय कन्या कल्पलताचा विवाह ‘हंस’, ‘मोहिनी’,‘नवल’ या मासिकाचे देखणे, सुविद्य संपादक आनंद अंतरकरांशी साजरा होत होता. हा ऋणानुबंध गदिमांचे परमस्नेही सुप्रसिद्ध साहित्यिक पु. भा.भावे यांच्या मध्यस्थीने ठरला होता. त्यामुळे अगदी पु.
ल. देशपांड्यांपासून द.मा. मिरासदारापर्यंत झाडून सारे साहित्यिक या मंगलप्रसंगासाठी खास
आवर्जून उपस्थित होते. मराठी चित्रपटसृष्टीचे तर हे घरचेच कार्य होते.मान्यवर दिग्दर्शकांपासून क्लॅपर बॉयपर्यंत सारेच जण या आनंद-सोहळ्यात मिरवत होते.
लग्न-समारंभ उत्तम पार पडला. मिष्टान्न भोजनास उशीर असल्यामुळे गदिमा आणि त्यांचे मित्रमंडळ एका बाजूला पत्ते खेळण्यात गुंग झाले होते. एवढ्यात गदिमांचे लक्ष त्यांच्याजवळ नुकत्याच येऊन बसलेल्या सुप्रसिद्ध दिग्दर्शक राम गबाल्यांकडे गेले.
त्यांच्या अस्वस्थ हालचाली पाहून त्यांनी विचारले,
‘‘काय रे राम, तुला बरे बिरे नाही काय ?’’
‘‘तसे नाही अण्णा पण...
‘‘पण काय ?’’
‘‘अण्णा, रागवू नका. पण तुच्याकडे एक फार महत्त्वाचे काम आहे.’’
‘‘काय ?’’
‘‘गुरुदत्त फिल्मच्या सिनेमासाठी एक गाणं लिहून हवं आहे.
संध्याकाळीच रेकॉर्डिंग केलं पाहिजे. स्टुडिओ पण बुक केलाय.’’
‘‘अत्ता ? इथं ? अरे राम, माझ्या मुलीचा लग्नसोहळा चाललाय.
थोड्या वेळात जेवणाच्या पंगती सुरू होतील.’’
‘‘अण्णा, तुम्ही मनावर घेतलं तर दोन मिनिटात माझं काम होईल.’’
राम गबाले मोठ्या अजिजीने म्हणाले.
‘‘बरं, गाण्याची सिच्युएशन तरी सांगशील का ?’’
‘‘या जगात कुणी कुणाचे नाही याची जाणीव करून देणारा चित्रपटाचा दुःखद प्रसंग राम गबाल्यांनी सांगताच गदिमांनी राम गबाल्यांनीच बरोबर आणलेले कागदाचे पॅड मांडीवर घेतले आणि मुलीच्या लग्न-प्रसंगाच्या आनंद-सोहळ्यात नातेवाईक, मित्रमंडळींच्या आनंदी मेळाव्यात पांढर्याशुभ्र कागदावर,-
‘‘लळा जिव्हाळा शब्दच खोटे
मासा माशा खाई
कुणी कुणाचे नाही, राजा
कुणी कुणाचे नाही.’’
‘जिव्हाळा’ चित्रपटातील हे कलीयुगाचे ब्रह्मवाक्य एक मंतरलेली लेखणी लिहून गेली...