कैद्यांना आपल्या कुटुंबासह राहता येते असे बहुतेक जगात दोनच तुरुंग आहेत.त्यापैकी एक आहे मॉरिशसला तर दुसरा आहे आटपाडी या सांगली जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात "स्वतंत्रपूर" ला!.
गदिमांचे 'औंधाचा राजा' हे व्यक्तिचित्रण तुम्ही कदाचित १० वी च्या पाठ्यपुस्तकात किंव्हा 'मंतरलेले दिवस' या पुस्तकात वाचले असेल,'औंधाचा राजा' अर्थातच औंध संस्थानचे
राजे 'श्रीमंत भवानराव पंडित पंतप्रतिनिधि' एक 'जाणता राजा' होता,गुन्हा करणारा हा जन्मताच गुन्हेगार नसतो,एखाद्या अनाहूत क्षणी त्याच्या संयमाचा बांध सुटतो आणि एखादा भयंकर गुन्हा त्याच्या हातून घडतो,हा क्षण सोडला तर आपण आणि त्याच्यात काय फरक असतो?,हेच औंधाच्या राजाने जाणले व आपले मित्र गांधीवादी विचारवंत पोलंडचे मॉरिस फ्रिडमन ऊर्फ भारतानंद यांच्या संकल्पनेतून १९३९ साली जगातल्या या आगळ्या-वेगळ्या प्रयोगाची सुरवात झाली,आटपाडी पासून ५ कि.मी च्या आसपास असलेल्या "स्वतंत्रपूर" या कैद्यांच्या वसाहतीने.
जन्मठेप झालेला कैदी म्हणजे साखळदंड व बेड्या असे आपण हिंदी चित्रपटात नेहमी पाहतो,पण स्वतंत्रपूर येथे जन्मठेप भोगणार्या कैद्यांच्या हातात ना साखळदंड असतात ना बेड्या ना लोखंडी दरवाजा ना मनावर ओझे टाकणार्या उंचच्या उंच काटेरी भिंती!.घरच्या लोकांबरोबर राहण्याची मुभा,हा तुरुंग नाही तर बंदिवानांची वसाहत आहे.३० हेक्टर परिसरात पसरलेली ही वसाहत,इथे राहणारे गुन्हेगार इथेच असणार्या जमिनीवर शेती पिकवतात, प्रत्येकाला काही जमिन दिली जाते,यात त्यांनी अन्नधान्ये-भाजीपाला पिकवायचा व बाजारात तो विकून येणार्या उत्पन्नातून आपला व आपल्या सोबत आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवायचा.वसाहतीत कैद्यांना एकटे न ठेवता त्यांची बायका-पोरेही सोबत ठेवण्याची मुभा असते.कैदी स्व:ता बाजारात जातात,लोकात मिसळतात,सण-उत्सव साजरे करतात.कैद्यांना सामान्य वागणूक व मुक्त जीवन मिळाल्यामुळे त्यांचे ह्रदयपरिवर्तन होण्याची शक्यता असते ही या प्रयोगामागची भावना.औंध संस्थानच्या काळात कैद्यांना मोकळे सोडत नव्हते पण जर कैदी पळाला तर त्याला परत पकडत नसत.
एकदा काही कैदी पहाटेच्या सुमारास पळून गेले,कुठलेही गज,भिंती त्यांना अडवू शकत नव्हत्या पण त्यावेळी तीथे जेलर असलेले 'अब्दुल अजिज अब्दुल खलील काझी (मास्तर)' यांचे प्रेम,आदर,संस्कार,त्यांचा आदरयुक्त दरारा यांनी ते काम केले व पळालेले सगळे कैदी परत आले,त्यांनी मास्तरांचे पाय धरले "आम्ही चुकलो,आपणास सोडून आम्ही पळून जाऊ शकत नाही".असा हा औंधाच्या राजा चा अलौकिक प्रयोग!.
गदिमांचे माडगूळ गाव आटपाडी-स्वतंत्रपूर पासून खूप जवळ,गदिमांचे वडिल औंध संस्थानात कारकून होते,गदिमांचे काही शिक्षण पण औंधला झाले,गदिमांना या 'जाणत्या राजा' विषयी खूप आदर होता,ते राजाची नक्कल पण खूप सुंदर करत म्हणून गदिमांना त्या काळात 'औंधकर' या नावाने ओळखत असत.
शांताराम वणकुद्रे उर्फ व्ही.शांताराम मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या कर्तुत्वाने दरारा निर्माण करणारे एक आदरणिय व्यक्तिमत्व,प्रभात ते राजकमल कलामंदीर असा मोठा प्रवास,गदिमांना 'शाहिर रामजोशी' चित्रपटातून पहिल्यांदा संधी देणारे.शांतारामांच्या मनात एक क्लासिक हिंदी चित्रपट करण्याचे होते,मराठी चित्रपटातून गदिमांचे खूप नाव झाले होते,पूर्वीचा ऋणानुबंध होता,राजकमल कलामंदिर साठी एखादा चित्रपट लिहिण्यासाठी त्यांनी गदिमांना पाचारण केले,गदिमांनी 'स्वतंत्रपूर' ची माहिती त्यांच्या कानावर घातली,त्यांना तो विषय खूप आवडला व यावरच चित्रपट करावा असे ठरले,चित्रपटाच्या तयारीसाठी गदिमांनी माडगूळच्या 'बामणाच्या पत्र्यात' आपला मुक्काम हलवला,त्यांनी स्वतंत्रपूर चा इतिहास,परिसर,कैदी यांचा अभ्यास केला व चित्रपटाचे कथानक तयार केले.
"तरुण उमेदीचा 'जेल वॉर्डन' आदिनाथ हा एक वेगळा प्रयोग करण्याचे ठरवतो,पॅरोलवर असलेल्या ६ अतिशय धोकादायक कैद्यांना ज्यांनी खून केले आहेत असे भडकू माथ्याचे कैदी तो निवडतो,वरिष्ठांचा विरोध असून सुध्दा त्यांना पटवून देतो व स्व:ताच्या जवाबदारीवर त्यांना एका शेतवजा वसाहतीत घेऊन जातो,तीथे त्यांच्या कडून मेहनत करुन शेते पिकवून घेतो,वर उल्लेख केलेला कैदी पळून जाण्याचा व परत येण्याचा प्रसंग सुध्दा चित्रपटात घडतो,कैदी हळूहळू सुधारायला लागतात,त्यांनी पिकवलेली भाजी खूप उत्कृष्ठ दर्जाची होऊ लागते,बाजारात भाजी विकायला कैदी स्व:ता जातात,त्यांची सुंदर भाजी हातोहात विकली जाते,मात्र त्याने बाजारातले प्रस्थापित व्यापारी दुखावले जातात,कैद्यांना दारु पाजून भूलवायचा प्रयत्न करतात,आपल्या गुंडांमार्फत कैद्यांवर हल्ला करतात.सुरवातीला हाणामारी करणारे हे कैदी जेलरच्या संस्कारा मुळे गांधींजींच्या अहिंसा मार्गाने त्याचा विरोध करतात,जेलर त्यांना बाजारपेठेची माहिती करुन देतो,स्व:ताच्या हक्कांसाठी लढायला शिकवतो.
शेवटच्या प्रसंगात बाजारपेठेतले व्यापारी शेकडो बैल शेत उध्वस्त करण्यासाठी त्यांच्या शेतात सोडतात,त्यावेळी केवळ जेलर तिथे असतो,कैदी बाजारात गेले असतात,जेलर बैलांशी एकटा झुंज देतो,शेते वाचवायचा प्रयत्न करतो,खूप जखमी होतो,कैदी परत येतात पण जेलरचे प्राण गेलेले असतात,त्याचे बलिदान व्यर्थ जात नाही,कैदी तिथेच राहून या दुष्टप्रवृत्तींशी झुंजायचे ठरवतात व जन्माला येते एक स्वतंत्रपूर..."
१९५७ साली प्रदर्शीत झालेला "दो आँखें बारह हाथ" (Do Aankhen Barah Haath) हा चित्रपट,गदिमांचे अतिसुंदर कथानक,पटकथा,गदिमांचेच हिंदी संवाद,केवळ दोन डोळ्यांच्या जरबेने कैद्यांना जखडून ठेवणारा व्ही.शांताराम यांनी साकारलेला जेलर व त्यांचे अचंबित करणारे दिग्दर्शन,"ऐ मालिक तेरे बंदे हम" सारखी भरत व्यासांची गाणी,वसंत देसाईंचे संगीत,शांताराम-संध्या व सर्व कैद्यांच्या भूमिका करणार्या कलाकारांचा मनाला भिडणारा अभिनय,शेवटच्या बैलांच्या झूंजीच्या प्रसंगात तर व्ही.शांताराम मरता मरता वाचले होते,त्यांच्या डोळ्याला जखम झाली होती व दृष्टी थोडक्यात जाताजाता वाचली.
या चित्रपटात काय नव्हते?.नुसता भारतातच नाही तर जगभर हा चित्रपट खूप गाजला या चित्रपटाला भारतात व परदेशात National Film Awards - Best Feature Film, Best Feature Film in Hindi, Berlin International Film Festival - Silver Bear Extraordinary Prize of the Jury, OCIC Award,Golden Berlin Bear (Nominated), Golden Globe Awards,Samuel Goldwyn Awards सारखे अनेक पुरस्कार लाभले.
गदिमा हिंदी चित्रपटसृष्टीत खूप कमी रमले पण "दो आँखें बारह हाथ",
"नवरंग", "तूफान और दिया","गुंज उठी शहनाई" सारखे अजरामर चित्रपट त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीलाही दिले!.
धन्य तो 'औंधाचा राजा' आणि धन्य ते गदिमा,व्ही.शांतारामांसारखे कलावंत!,त्यांना मानाचा मुजरा!.
विशेष आभार : श्री.विजय भास्कर लाळे,aundh.info
गदिमा गौरव | Special Quotes
पु.भा.भावे
'मंतरलेल दिवस' वाचून झाले,मस्ती अजून आहे.यातल्या व्यक्ती,स्थळं,उगीचच पुनः पुन्हा डोळ्यांसमोर येतात.अस्वस्थ करतात.चांगलं काही वाचल्यानंतर हे असंच होतं.तीच त्यांच्या सामर्थ्याची पावती.शब्दाशब्दात सातारी मातीचा कस आहे.दुसरे काही बिघडले तरी माडगूळकरांचे आत्मकथनपर लिहिणे कधीही बिघडत नाही !.