श्रीधर माडगूळकर | Shridhar Madgulkar
माझ्या कळतेपणापासून गेली जवळ जवळ पन्नास वर्षे माडगूळला जाण्याची कल्पना निघाली की सर्व प्रथम कोणत्या मार्गाने जायचे याची चर्चा घरात जवळ जवळ जाण्याच्या आदल्या दिवसापर्यंत चालायची. काहींचे मत पडायचे की कोरेगाव मार्गाने आटपाडीपर्यंत जावे, तर काहींचे कर्हा-वीटा मार्गाने! कुठलाही मोठा घाट नसलेल्या सोलापूर रोडने इंदापूर आणि तिथून अकलूज सांगोला
मार्गे थेट माडगूळलाच जावे, तर काहींचे म्हणणे फलटण-म्हसवड मार्ग जवळचा असल्याने त्याच मार्गाने जावे असे असायचे. मला स्वत:ला मात्र कुर्डुवाडीवरून बार्शीलाईट रेल्वेने सांगोला आणि तेथून मोटारने माडगूळला जाणेच खूप आवडायचे.
सुरवातीच्या काळात मी दर दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत पुण्यात कॉलेजमध्ये शिकत असलेल्या लिलाआत्या आणि बंडूकाका (डॉ.अंबादास माडगूळकर) बरोबर माडगूळला जायचो. कुर्डुवाडीला ट्रेन बदलून बार्शीलाईटमध्ये बसले की प्रवासाला खूप मजा यायची. त्यावेळेस रेल्वेला सेकंड क्लास आणि थर्ड क्लास यामध्ये 'इंटरक्लास' म्हणून एक डबा असायचा. त्या डब्यातही सध्याच्या फर्स्टक्लासप्रमाणे बाकावर कुशनच्या गाद्या, वर पंखे अशा सोयी असायच्या तर काही डब्यांना एका बाजूला चक्क गॅलरी असायची. नॅरोगेजवरून धावणारी ही बार्शलाईट गाडी इतक्या धीम्या गतीने चालायची की अनेकजण वाटेत पंढरपूरला चालत्या गाडीतून उतरून पांडुरंगाचे दर्शन घेऊन पुन्हा गाडी पकडायचे अशी आख्यायिकाही सांगितली जायची. ही गाडी दुसर्या दिवशी सकाळी दहाच्या सुमारास सांगोल्याला पोहोचायची. तिथल्या स्टॅन्डजवळील छोट्याशा हॉटेलात आम्ही चहा घ्यायचो. तिथे काचेच्या बरण्यातील छोट्या गुळाच्या ढेपेच्या आकाराचे बेसनाचे लाडू हारीने एकावर-एक रचून ठेवलेले असायचे. शेजारच्या परातीत शंकरपाळ्यांचा ढीग असायचा. आम्ही मात्र का कोणास ठाऊक पण तिथे दरवेळेस बशीभरून पेढे मागवायचो. सांगोल्यातून आटपाडी रस्त्यावर माडगूळ जेमतेम 15-20 किलोमीटरवरच आहे. पण तेवढाही प्रवास त्या काळी फार कष्टाचा वाटायचा. अगदी लहानपणी एस.टी.सुरू होण्यापूर्वी ह्या प्रवासासाठी खाजगी सर्व्हीस मोटारी असायच्या. त्यात ड्रायव्हर शेजारची सीट बसायला मिळणे हे खूप मानाचे मानले जायचे. गदिमांचा मुलगा असल्यामुळे मला बहुतेकवेळा तो मान मिळायचा. दिवाळीच्या सुट्टीत गेलो की वाटेत 'वाटंबरे' गावच्या माण नदीला हमखास खूप पाणी आलेले असायचे. त्यावेळी तिथे पूलही नव्हता. मग सर्व्हीस मोटार (नंतरच्या काळात एस.टी.ही) नदीच्या एका काठाला थांबायची. त्या नदीच्या कमरेभर पाण्य
ातून आम्ही जीव मुठीत धरून पलीकडच्या काठावर जायचो. अगदी लहान होतो तेव्हा कोणीतरी खांद्यावर बसवूनच मला पलीकडे घेऊन जायचे. त्यावेळेस त्या अपरिचित माणसाच्या खांद्यावरून गढूळ पाण्याने भरलेली नदी पार करताना खूप भीती वाटायची. हा सगळा अडचणीचा प्रवास करून रस्त्यावर चिंध्यापीर, गाव ओढ्याचा डोह इत्यादी माडगूळ जवळ आल्याच्या खुणा दिसू लागल्या की माझे मन आनंदाने भरून जायचे.
माडगूळचा आमचा वाडा गावाच्या मधोमध उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. वाड्यापुढे भलेमोठे अंगण आणि वाड्याच्या मुख्य दरवाजाच्या आत उजव्या बाजूला जवळ जवळ तीस फूट बाय दहा फुटाचा सोपा आहे. फार पूर्वी घरची जनावरे तिथे बांधायचे. सोपा संपला की डावीकडे पायऱ्या चढल्या की मुख्य बैठकीची खोली आहे. माझ्या लहानपणी दररोज संध्याकाळी उशीरापर्यंत या बैठकीच्या खोलीत समोरच्या सोप्यावर आणि थेट पुढच्या अंगणापर्यंत गावकऱ्यांची बैठक भरायची. त्यात गावच्या भांडण तंटणांचा निवाडा माझा अण्णांच्या पाठोपाठचा भालूकाका (भालचंद्र माडगूळकर) करत असे. त्याला गावात प्रचंड मान होता. आणि तालुकाभर त्याच्या नावाचा खूप दबदबा होता. मला तिथे बसून ते सारे बघायला फार आवडे. पुढे माझ्या छोट्याशा राजकीय कारकीर्दीत उपयोगी पडलेले राजकीय डावपेचांचे अनेक धडे मी या काकांच्या बैठक शाळेतच गिरवले असावेत. ह्या माझ्या भालूकाकाचे माझ्यावर अतीशय प्रेम होते. न बोलता अनेक गोष्टी माझ्यासाठी तो करीत असे. माझ्या आयुष्यातला एक प्रसंग मी कधीही विसरू शकणार नाही. नेमक्या मॅट्रीकच्या वर्षातच परीक्षेआधी मी टायफॉईडने खूप आजारी होतो. दोनदा तो भयंकर आजार उलटलाही. अशातच हट्टाने मी परीक्षेला बसलो आणि परीक्षा झाल्यावर भर उन्हाळ्यात सर्वजण विरोध करत असतानासुद्धा विश्रांतीसाठी माडगूळलाच गेलो.
मी माडगूळला गेलो तेव्हा भालूकाका कामानिमित्त सांगलीस गेला होता. पहिल्याच रात्री मी आजी व काकूचे न ऐकता सगळ्या मित्रांसकट चुलतभावंडांना घेऊन आमच्या गावाजवळील 'पाव' या गावाच्या शेतात 'बामनाच्या पत्र्या' समोर अंंगणातच झोपायला गेलो. नुकताच तापातून उठून मी असा उघड्यावर रानात झोपायला गेल्यामुळे घरात चिंतेचे वातावरण पसरले होते. रात्री उशीरा सांगलीहून परत आल्यावर भालूकाकाच्या कानावर ही गोष्ट गेली. रात्री 9 चा सुमार असावा. तेवढ्या रात्री त्याने घरून स्वत: लोखंडी कॉट, गादी व जाड ब्लँकेट गड्याकरवी माझ्यासाठी रानात पाठवून दिले. अशी लोभस नाती आजकाल फार दुर्मिळ होत चालली आहेत.
बैठकीच्या उजव्या बाजूला एक अधारी खोली होती. तिला बाळंतिणीची खोली म्हणत. या खोलीला नेहमी कुलूप असे. त्यामुळे त्या खोलीत काय असावे याचे लहानपणी मला खूप कुतुहल होते. बैठकीच्या खोलीच्या आत माजघर होते. माझ्या आजीचा दरबार या माजघरातच भरत असे. साऱ्या माडगूळ गावाची ती 'काकी' होती.भल्या पहाटे उठून ती दारातल्या म्हशीची धार स्वत: काढत असे. म्हशीचे गरमागरम धारोष्ण दूध पिण्यासाठी मी थंडी असली तरी लवकर उठत असे. माझ्या आजोबांचा एक पितळी गडू (पेला) होता. त्यावर त्यांचं 'दिगंबर बळवंत कुळकर्णी' हे नावही घातलेलं होतं. त्याच गडूतून दूध पिण्यासाठी माझी आणि माझ्या समवयीन चुलतभाऊ प्रकाश यात खूप स्पर्धा असे. कधी कधी थेट मारामारीपर्यंत प्रकरण जाई. मी त्याच्याहून वयाने एक महिन्याने मोठा व थोडासा दांडगट असल्यामुळे बहुतेक वेळा तो गडू मीच हस्तगत करत असे. मात्र नंतर भांडणाला कारण नको म्हणून भालूकाकाने तसाच एक नवीन गडू सांगलीहून आमच्यासाठी आणला
होता.
माजघराच्या उजव्या बाजूला स्वयंपाकघर
होते. घरचे देवघरही तेथेच होते. त्या स्वयंपाकघरात एक भलीथोरली लाकडी पेटी होती. त्यात आजी दूध दुभतं ठेवित असे. माजघरातच एक घुसळखांब होता. त्या खांबाला विशिष्ट तऱ्हेने रवी बांधून आजी भल्या मोठ्या चरबीत ताक गुसळत अससे. त्याचे ताजे ताजे लोणी ती आम्हाला मोठ्या प्रेमाने चाखायला देत असे. आजही त्या माजघरात गेल्यावर माझ्या आजीचे प्रसन्न अस्तित्व मला जाणवतं आणि अण्णांच्या ऊन पाऊस चित्रपटातील गाण्याच्या पुढील ओळी आपोआप माझ्या ओठी येतात.
माजघरातील उजेड मिणमिण
वृद्ध काकणे करिती किणकिण
किणकिण जणू ये कुरवाळू
दूर देशीचे प्रौढ लेकरू
माजघराच्या मागे चारही बाजूने वंदिस्त असे मागचे अंगण होते. त्याच्या कोपऱ्यात तुळशीवृंदावन तर दुसऱ्या बाजूला पाण्याचा खूप खोल अंधारी आड होता. आडाला लागून फरसबंदी बांधणीचं न्हाणीघर. न्हाणीघराच्या उजव्या हाताला मोठी चुलवण होती. त्यावर भल्यामोठ्या हंड्यात सतत अंघोळीसाठी पाणी तापवत ठेवलेलं असे. याच चुलणावर कधी कधी माझे वरून तिरसट वाटणारे पण अतिशय प्रेमळ चुलत आजोबा 'तात्या' (ज्यांच्यावर गदिमांनी 'वेडा पारिजात' ही अप्रतिम कथा लिहिली आहे) मक्याची कणसे भाजून देत.
या तुळशीवृंदावनासमोर लहानपणी आमच्याकडून माझा धाकटा बंडूकाका दररोज संध्याकाळी जवळ-जवळ शंभर संस्कृत श्र्लोक म्हणवून घेत असे. रामरक्षा, मनाचे श्र्लोक एवढेच काय तर भगवद्गीतेचे पठणही तो आमच्याकडून करवून घेई.
या तुळशीवृंदावनाच्याच शेजारीच रात्री केवळ एका लांबलचक सतरंजीवर आम्ही सख्खी चुलत अशी जवळ जवळ दहा बारा भावंडे गप्पा गोष्टी करत एकमेकांना भुताखेतांच्या गोष्टी सांगत उघड्यावर आकाशातील चांदण्या मोजत झोपत असू. सतरंजीखालून अंगणातील ओबड धोबड दगड पाठीला बोचत पण भावंडांच्या संगतीत आम्हाला त्याचे त्यावेळीस काहीच वाटत नसे.
उन्हाळा असो की थंडी मी व माझे चुलतभाऊ प्रकाश, दिलीप, अविनाश आणि गावातील दहा बारा समवयीन मित्रांसह आमच्या गावापासून दीड दोन किलोमीटर असलेल्या इंजिनच्या मळ्यात पोहायला जात असू. पोहणे संपल्यावर बाजरीची भाकरी, घट्ट सायीचे दही आणि हिरव्या मिरच्यांचा ठेचा याची न्याहारी करित असू. बरोबर शेतातून उपटलेला ओला कांदा, गाजर, रताळी पण तोंडी लावायला असत.इ संध्याकाळी दिवस मावळायच्या सुमारास आम्ही गावच्या प्रत्येक मोक्याच्या ठिकाणी जाऊन 'दडवरे ।ऽऽऽऽ' अशी हाळी दिली की गल्ली बोळातून आमची मित्रमंडळी घरातून बाहेर येत असत. वीस पंचवीस जण जमले की मग आम्ही गावातल्या ओढ्यावर जाऊन वाळूवर लोंपाड (खो खो चा एक प्रकार) हुतुतू , कुस्त्या असे खेळ खेळत असू . कधी कधी चोर शिपाई खेळताना अंधारात काट्या कुट्यातून माडगूळपासून तीन किलोमीटर असलेल्या य.पा.वाडीपर्यंत आम्ही अनवाणी पळत जात असू .
पुढे जरा मोठा झाल्यावर मी 'माडगूळ' गावाला पहिल्यांदा ा*केट या खेळाची ओळख करून दिली. तिथल्या ओढ्याकाठच्या पडिक करतावर आम्ही 'ब्रेबॉर्न' स्डेडियमवर खेळल्याच्या थाटात खेळत असू. एकदा आम्ही मुले क्रिकेट खेळत असताना गावचे सरपंच इत्यादी कराभारी मंडळी गमतीने आमच्या खेळात सामील झाली. मात्र चेंडू बॅटने अडवण्यापेक्षा पायाचाच उपयोग त्यांनी जास्त केल्यामुळे पुढचे दोन दिवस गावची अख्खी ग्रामपंचायत लंगडत चालत होती. कधी कधी आम्ही जवळ जवळ सहा किलोमीटर दूर असलेल्या 'आटपाडी' या तालुक्याच्या गावी चालत जाऊन तिथल्या संघाशी मॅच खेळत असू . लंचसाठी प्रत्येकाने आपापल्या भाकरी बांधून घेतलेल्या असायच्या. त्या लंचची आणि मॅचची गोडी अजूनही माझ्या मनात रेंगाळत आहे.
रात्री कधी आमच्या वाड्यासमोर तर कधी आमच्या प्राथमिक शाळेच्या पटांगणावर आम्ही 20-25 जण गप्पा गोष्टी करत झोपत असू . या सर्व प्रेमळ सहकाऱ्यांच्या संगतीत सुट्टीचे दिवस कधी संपले तेही कळत नसे. मग नको नकोसा वाटणारा परतीचा दिवस अखेर उजाडत असे. घरातले सगळे नातेवाईक आणि हे सारे 20-25 मित्र एस.टी.स्टँडवर आम्हाला सोडायला येत असत. ओलावलेल्या डोळ्यांसमोरून त्यांची हात हलवून प्रेमाने निरोप देणारी प्रतिमा हळू हळू नाहीशी होत असे. माझी चातकासारखी वाट पाहणारी चुलत भावंडे, माझ्यावर न बोलता मनस्वी प्रेम करणारे भालुकाका, श्यामकाका, हेमाकाकू, कालिंदीकाकूच्या हातची अवीट गोडीची माणदेशी पक्वान्ने, वेड्यासारखी प्रेम करणारी मित्रमंडळी, बोरी बाभळीने वेढलेला माणदेशी निसर्ग.. काळी माती.. हिरवीगार पिके... दारात हंबरणारी पुतळी गाय ... करत मैदान ..गावचा ओढा या साऱ्यांनी भारलेले आणि मस्तकावरून प्रेमाने कुरवाळणाऱ्या आजीच्या थरथरणाऱ्या हाताची सय देणारे 'माडगूळी डेज' आजही माझ्या मनात रेंगाळत आहेत.