गदिमांचे किस्से | General Articles
 •  
 • Box-C-36
 • 'पुल'कित गदिमा
 • Pulakit Gadima
 • श्री.सुमित्र श्रीधर माडगूळकर | Sumitr Madgulkar


 •   
  पु.ल.देशपांडे व गदिमा पुण्यातल्या डेक्कन जिमखान्याच्या टेनिस कोर्टाजवळच्या रस्त्यावरुन प्रभातफेरीला निघाले होते,रात्रभर एका चित्रपटाचे चित्रीकरण आटपून मंडळी चालायला निघाली होती,तितक्यात रस्त्यात महानगरपालिकेचे दिवे बंद झाले आणि काय गंमत गदिमांना गीत सुचले

  "विझले रत्नदीप नगरात,आता जागे व्हा यदुनाथ".

  एक मोठा प्रश्न आज सुटला गदिमा-पु.ल आजच्या

  काळात का होत नाहीत? तर याचे उत्तर सोपे आहे,अहो आता पुणे महानगरपालिकेचे दिवे सकाळी १०-११ पर्यंत बंदच होत नाहीत तर लोकांच्या प्रतिभा जागृत होणार कश्या!.

  गदिमा व पु.लं चा स्नेह खूप जुना,ज्याकाळात आपल्यात लेखनाचे गुण आहेत हे पु.लं ना उमगलेही नव्हते तेव्हापासूनचा,तेव्हा पुल गायक होण्याच्या मागे लागले होते,महाराष्ट्रभर फिरुन ते भावगीत गायनाचे कार्यक्रम करत असत,कोल्हापूरच्या सोळंकूरकर मास्तरांचा संगीत मेळा त्याकाळात खूप प्रसिध्द होता,मेळ्यात त्याकाळात गाणार्‍या गुणवान मुलांची नावे होती सुधीर फडके,राम गबाले,आप्पासाहेब भोगावकर!.मुंबईत संगीत क्षेत्रात धडपडणारे पण कोल्हापूरला या मुलांसमोर भेट देताना ज्यांची 'मुंबईचे नामवंत भावगीत गायक' अशी ओळख करुन दिली जात असे ते पु.ल.देशपांडे या मेळ्याला नामवंत पाहुणे म्हणून भेट देत असत!.गदिमांची अनेक गीते त्यांना तिथे मिळत असत व त्यांना चाली लावुन ते कार्यक्रम करत असत.यातूनच पुढे दोघांची भेट झाली व दोघात स्नेह निर्माण झाला.

  १९४८ सालचा 'वंदे मातरम' चित्रपट,गदिमांनी आग्रहकरुन पु.ल व सुनिता बाईंना या चित्रपटात भूमिका करायला लावली होती,सुनिताबाई माहेरी गेल्या होत्या तर गदिमांनी त्यांना पत्र लिहून त्यांचा होकार मिळवला,"वेद मंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम" हे गदिमांचे गाजलेले गीत याच चित्रपटातले."गुळाचा गणपती" हा चित्रपट 'सबकुछ पुल' अश्या नावाने जरी ओळखला जात असला तरी यात गीते होती अर्थातच गदिमांची, "इंद्रायणी काठी देवाची आळंदी,लागली समाधी ज्ञानेशाची" हा अभंग याच चित्रपटातला,हा गाणार्‍या पं.भिमसेन जोशींना सुध्दा माहित नव्हते की हे गीत गदिमांचे आहे,अगदी एच.एम.व्ही कंपनीच्या रेकॉर्डवर त्या काळात एक पारंपारीक अभंग अशा नावाने तो प्रसिध्द झाला होता,शेवटी गदिमांना सांगावे लागले की अहो हे माझे चित्रपट गीत आहे!.

  पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदीराच्या उदघाटन प्रसंगी एक गीत हवे होते,पु.लं नी पंचवटी गाठली व गदिमांनी गीत दिले

  "जसा जन्मतो तेज घेऊन तारा!
  जसा मोर घेऊन येतो पिसारा!
  तसा येई घेऊन कंठात गाणे!
  असा बालगंधर्व आता न होणे!"

  पु.लं नी याला संगीत दिले व उदघाटन कार्यक्रमात ते बकुळ पंडित यांच्या आवाजात सादर झाले.

  'नाच रे मोरा' हे गदिमा-पु.ल जोडीचे गाजलेले गीत,एकदा मस्ती करता करता पुलंनी गदिमांना सांगीतले माडगूळकर 'नाच गं घूमा कशी मी नाचू' च्या धर्तीवर बालगीत हवे आहे,गदिमा उत्तरले घे लिहून 'नाच रे मोरा, आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच'.

  या जोडीने अनेक सुंदर सुंदर गीते आपल्याला दिली,नुसती वानगी दाखल नावे घ्यायची झाली तर 'इवल्या इवल्याशा टिकल्या टिकल्यांचे','नाच रे मोरा नाच','इंद्रायणी काठी देवाची आळंदी','श्रीहरी विदुराघरि पाहुणा','इथेच टाका तंबू','ही कुणी छेडिली तार','जा मुलि शकुंतले सासरी','कबीराचे विणतो शेले','कुणी म्हणेल वेडा तुला','सख्यांनो करु देत शृंगार','माझं ठरल्यालं लगीन मोडलं ग','दूर कुठे राउळात','केतकीच्या बनात उतरत्या उन्हात' अशी अनेक गीते आहेत.

  "त्या तिथे, पलिकडे,तिकडे,माझिया प्रियेचे झोपडे" ही कविता प्रथम गदिमांच्या तोंडून ऐकल्यावर पु.ल म्हणाले होते, "महाकवी,तुम्ही लकी !",तुमच्या प्रियेच्या झोपड्याकडे वळताना त्या वळणावर आंब्याचे वाकडं झाड होतं. आम्ही वाढलो मुंबईत,त्या वातावरणात वळणावर असते जळाऊ लाकडांची वखार ! .

  गदिमा व पु.ल अनेक साहित्यिक कार्यक्रमांना बाहेरगावी एकत्रही जात असत,कधीकधी रात्री भोजन पुर्व रसपानाचा कार्यक्रमही होत असे प्रथम पु.ल नको नको म्हणायचे त्यावर गदिमा मित्राला म्हणायचे

  'आबासाहेब,यांना डोंगरे बालामृत द्या हो!'

  चेष्टा-मस्करी करीत रसपानाला रंग चढे,गदिमा यात दर्दी होते,पु.ल पुरे,छोटा पेग,छोटा पेग करायचे.ते म्हणायचे "अण्णा,रसपान असे बेताने नि बेमालूम करावे की मासा जसा पाण्यात पाणी पितो.रसपान हे सुध्दा अत्तराप्रमाणे असावे"

  लगेच गदिमा म्हणायचे "लावा रे लावा,अत्तराचा फाया याच्या मनगटावर लावा!"

  एकदा दोघांची एका गृहस्थांची ओळख करुन दिली गेली "हे ग.दि.माडगूळकर हे महाकवी आहेत.गीतरामायण यांनीच लिहिले आहे आणि पु.ल.देशपांडे महाराष्ट्राचे महान विनोदी लेखक आहेत".समोरच्या महाशयांचा साहित्याशी अगदी बादनारायण संबंधही नव्हता ते अगदी निष्पाप आणि निरागस पणे उत्तरले

  "व्हय! पर हे करत्यात काय?".

  त्यावर या दोघांची जी हास्यरेस सुरु झाली ती लवकर थांबेचना,गदिमा म्हणाले "आमची अजून महाराष्ट्रात अशी कुणी जिरवली नव्हती!"

  पु.ल चष्मा काढून हसत होते.त्यावर गदिमा म्हणाले

  "पुरश्या,चष्मा घाल.चष्मा काढल्यावर तू चोरासारखा दिसतोस! तू नाटक लिहितोस ना? असा 'Anticlimax' कधी लिहिला आहेस?,असा कनवाळू माणूस आम्ही कुठे बघितला नाही.आपल्या पोटापाण्याची कोण रे चौकशी करतंय!".

  पु.ल यांचे बंगाली भाषेवर खूप प्रेम होते,त्यावर गदिमांनी ए.क.कवडा या टोपण नावाने बिंगचित्र लिहीले होते...

  "पाया पडती राजकारणी,करणी ऐसी थोर
  मराठीतला तू बिनदाढीचा रवींद्र टैगोर"

  ७-८ डिसेंबर १९७७ पु.ल रवींद्रनाथांची दोन गीते घेऊन पंचवटीत आले,"माडगूळकर बाबा आमटे यांच्या आनंदवनात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे,त्यासाठी या गीतांच्या तर्जुम्यावर गीतरचना हवी आहे",गदिमा खूप आजारी होते,तरीपण मित्राच्या प्रेमाखातर त्यांनी लगेच दोन गीते लिहून दिली

  "येइ रे प्राणा,सर्वात्मका!
  उंच

  उडव या मरुभूमीची गगनी विजयपताका!"

  व दुसरे होते

  "कोवळ्या रोपट्या,आज तू पाहुणा
  भूषवी अंगणा येउनिया"

  १४ डिसेंबर १९७७ गदिमा आपल्याला सोडून गेले व पुल,बाबा आमटे यांच्यासाठी लिहीलेली ही गीते गदिमांची शेवटची गीते ठरली.असे हे दोन जिवलग मित्र त्यांच्याबद्दल किती लिहू आणि किती नाही असे होऊन जाते,गीतरामायणातील "त्रिवार जयजयकार रामा" गीतातल्या ओळी जणू गदिमांनी पु.लं साठीच लिहून ठेवल्या आहेत...

  "पुलकित पृथ्वी,पुलकित वायु" तसे हे होते 'पुल'कित गदिमा....


गदिमा गौरव | Special Quotes
 • प्रा.रा.ग.जाधव
  माडगूळकरांनी सात आठशे वर्षांची विविध रुपरसांची परंपरा आधुनिक संस्कारांनी पुन्हा सजीव केली आहे.चैत्रबन म्हणजे या पुराण्या काव्यपरंपरेचे एक कलाप्रदर्शनच आहे.
संबंधीत लेख | Related Articles
गीतरामायण अॅप | GeetRamayan App
 • "गीतरामायण" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे!.
  आजच डाऊनलोड करा

  GeetRamayan application now available on android phones,now enjoy geetramayan songs in audio and text on your mobile,for more details click on following link Download Link
 • Box-RB-1