गदिमा नवनित
  • आईलाही विसरुन जाती या देशातील पिले अडाणी,चल सोडून हा देश पक्षिणी!
मराठी युनिकोड फॉन्ट
गदिमांचे किस्से | General Articles
  •  
  • Box-C-36
  • सकल जनात बरवे केले...
  • Sakal Janat Barve Kele...
  • सौ.शितल माडगूळकर | Shital Madgulkar


  •   
    लहानपणी मी पाटीवर श्री गजानन प्रसन्न ही अक्षरं गिरवत होते. मोठेपणी तेच दोन्ही शब्द माझ्या जीवनात एवढी प्रसन्नता व काव्य घेऊन येतील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं.

    मी बी.ए. झाले आणि आमच्या घरी माझ्या लग्नासाठी स्थळांचा जोरात विचार सुरू झाला. ग. दि. माडगूळकरांचा मोठा मुलगा लग्नाचा आहे असं माझ्या लीलूआत्याकडून आम्हाला कळलं. मला आधीच साहित्याची खूप आवड होती. थोड्याफार कविताही करू लागले होते. गदिमांची तर मी भक्तच होते. लहानपणी आजोळी कर्जतला "पेडगावचे शहाणे' या चित्रपटातील "आपल्याला सवड असेल तर ऑफिसात जाण्यापूर्वी एक कप चहा घेईन म्हणतो,' ही गदिमांची नक्कल ऐकत आणि प्रभाआत्याकडून चांदण्या रात्री आमच्या कर्जतच्या घराच्या उतरत्या पत्र्यावर गीतरामायणाची गाणी ऐकतच मी लहानाची मोठी झाले होते. गदिमांच्या मुलाबद्दलही थोडंफार ऐकलं होतं. मुंबईच्या रुईया व रुपारेल कॉलेजमध्ये असताना "जिप्सी' मासिकाच्या तरुण-तरुणींना केलेल्या साहित्य पाठवण्याच्या आवाहनानुसार मी माझी एक कविताही "जिप्सी'ला पाठवली होती. या "जिप्सी' मासिकाने तरुणविश्‍वात एक वेगळंच स्थान निर्माण केलं होतं. या मासिकाचं संपादन समर्थपणे श्रीधर माडगूळकर करत होते. खरं तर अतिशय प्रसिद्ध व कर्तृत्ववान व्यक्तींची मुलं तितकी कर्तृत्ववान नसतात, असं माझं मत होतं; परंतु या मुलाने आपल्या वडिलांकडून पैशाची काहीही मदत न घेता स्वकर्तृत्वावर प्रिंटिंग व पॅकेजिंग युनिट चालू केल्याचं माझ्या कानावर आलं.

    मनात विचार केला, की लग्न या ठिकाणी जमलं तर चांगलंच, नाही जमलं तरी गदिमांसारख्या एका उत्तुंग व्यक्तिमत्त्वाला जवळून पाहण्याची संधी तरी मिळेल.

    शेवटी एकदाचा तो दिवस उजाडला. 17 जानेवारी 1974! मुंबईच्या लिंकिंग रोडवरच्या गॅझिबो हॉटेलमध्ये माझी व श्रीधर यांची भेट ठरली. एकमेकांना बघताक्षणीच बहुधा आम्ही एकमेकांना पसंत केलं असावं. नंतर एकमेकांशी बोलल्यावर "हाच आपला जीवनसाथी' हे मनःपूर्वक जाणवलं. पण खरी परीक्षा तर पुढेच होती. गदिमांना सून पसंत पडायला हवी.

    21 जानेवारी 1974 रोजी सकाळी माझे आई-वडील, मी व आत्याचे यजमान प्रसिद्ध आर्टिस्ट भाई कुलकर्णी मुंबईहून पुण्याला आलो. "पंचवटी' बंगल्यासमोर आल्यावर एक सुंदर स्वप्न माझ्यापुढे साकार होत होतं. एक छानसा बैठा दगडी बंगला जणू माझी वाटच पाहत होता. बंगल्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या उंच अशोकाच्या वृक्षांनी मला हळूच लवून ओळख दिली. बंगल्याच्या उजव्या हाताच्या दगडी भिंतीवर सोडलेल्या नाजूक वेलीच्या शेंदरी फुलांनी समोरच्या पोर्चवरील लालचुटुक बोगनवेलीने, तसेच बंगल्यालगतच्या रॉकरीतल्या पिवळ्या व पांढऱ्या वेलगुलाबांनी माझ्या मनाशी काही वेगळंच नातं जोडलं. बंगल्यासमोर वेगवेगळ्या रंगीबेरंगी फुलझाडांच्या कुंड्यांनी शोभिवंत झालेलं अंगण होतं. बंगल्याच्या पुढच्या भागात मोठा व्हरांडा... ज्या कोचाबद्दल खूप ऐकलं होतं तो प्रशस्त निळा कोच. आम्ही सगळे भीतभीतच बेल वाजवून दारातच उभे राहिलो. एवढ्या मोठ्या कविराजांना भेटायचं होतं. डोळ्यांत साठवायचं होतं. एक-दोन मिनिटांतच गदिमा बाहेर आले. ""या!'' असं भारदस्त, धीरगंभीर आवाजात आमचं स्वागत झालं. पांढरंशुभ्र खादीचं धोतर नि वरती भट्टी केलेला स्वच्छ पांढराशुभ्र नेहरू शर्ट! त्यांना पाहिल्याबरोबर आपोआपच माझे हात जुळले आणि मी पटकन त्यांच्या पायाशी वाकले. ""जय देवा!'' एवढंच ते म्हणाले. आम्ही सर्व मधल्या हॉलमध्ये बसलो. तो कोचच एवढा मोठा होता, की मी त्यात दोन मावीन, असं मला वाटलं आणि या बालिश विचाराने माझं मलाच हसू आलं. माझ्या समोरच्या कोचावरच गदिमा विराजमान झाले होते. "त्यांचे ते तेजस्वी, बुद्धिमान बारीक डोळे मला निरखत असावेत, काही आडाखे बांधत असावेत,' हा विचार मनात येऊन मला त्या थंडीतही दरदरून घाम सुटला.

    गदिमांनी माझ्याकडे बघून मला विचारलं, ""काही वाचतेस की नाही? अलीकडे कुठलं पुस्तक वाचलंस?''

    मी उत्तरले, """सांगत्ये ऐका' हे हंसा वाडकरांचं आत्मचरित्र!'' हे माझं उत्तर ऐकल्यावर का कुणास ठाऊक, गदिमांनी आपल्या पत्नी विद्याताई यांच्याकडे हसून पाहिलं. विद्याताईंचं शांत, शीतल, प्रसन्न व्यक्तिमत्त्व पाहून मला तर गदिमांच्या "गृहसाम्राज्य' या कवितेतल्या ओळी जशाच्या तशा आठवल्या...

    तुझी माझी फुलबाग
    समाधानाचे उद्यान
    माझा स्वभाव ग्रीष्माचा
    तुझा श्रीमंत श्रावण

    आणि याच सासूबाई मला लाभाव्यात असं मनोमन वाटलं.

    चहा-पोहे झाले. घरातील सगळ्या मंडळींचीही ओळख झाली. ते एक हसतंखेळतं घर होतं... अगदी मला हवं होतं तसं. थोड्या वेळाने काही अवांतर विषयांवर गप्पा झाल्यावर माझे वडील गदिमांना म्हणाले, ""आम्ही आता निघतो. आपला निर्णय नंतर आम्हाला कळवाल ना?'' गदिमांनी माझ्या मोठ्या वन्सं वर्षाताईंकडे आणि सासूबाईंकडे बघितलं. त्यांची मूक संमती दिसताच काही आढेवेढे न घेता ते म्हणाले, ""मुलगी आम्हाला पसंत आहे.'' एवढ्या मोठ्या कविराजांची सून होणार म्हणून मला खूप आनंद झाला, अभिमानही वाटला; परंतु तदनुषंगाने येणाऱ्या जबाबदारीची जाणीव होऊन मन अस्वस्थही झालं. अगदी अक्षरशः चौकोनी कुटुंबातली मी सर्वच दृष्टीने "मोठ्या' घरची "मोठी सून' होणार होते. पपांनी मला जवळ बसवून घेतलं व पाठीवरून हात फिरवून म्हणाले, ""मुली, आता फार मोठी जबाबदारी तुला पार पाडायची आहे.'' माझे डोळे या मायेच्या वर्षावामुळे उगीचच भरून आले. मी एवढंच म्हणाले, ""मी ती जबाबदारी पार पाडण्याचा माझ्याकडून प्रयत्न करीन.'' आपल्या वागणुकीने घरातल्या सगळ्यांची मनं जिंकायची, असं मी सुरवातीलाच ठरवून टाकलं.

    आमचं लग्न ठरल्यानंतर ते होईपर्यंत जवळजवळ मध्ये पाच महिन्यांचा तरी कालावधी लोटला. या कालावधीत मुंबईच्या पपांच्या फ्लॅटवर मी, माझी लीलूआत्या व तिचे यजमान भाई यांच्याबरोबर पपांना भेटायला जात असे. त्यांच्याबरोबरच्या साहित्यिक चर्चेमध्ये मीही हिरिरीने भाग घेत असे. एकदा नेहमीप्रमाणे

    लग्नआधी ह्यांचा मला पुण्याहून फोन आला. फारसं काही माझ्याशी न बोलता हे म्हणाले, ""मी तुला थोड्या वेळाने परत फोन करतो'' आणि लगेचच त्यांनी फोन बंद केला. नंतर ह्यांचा परत फोन आल्यावर मी त्याचं कारण विचारल्यावर हे म्हणाले, ""अगं, मी तुझ्याशी बोलणार, तेवढ्यात पपा आले.'' मी म्हटलं, ""मग काय झालं? माझ्याशी बोलायला काय हरकत होती? आम्ही तर पपांशी किती गप्पा मारतो!'' त्यावर हसून मला म्हणाले, ""तुला "पंचवटी'त आल्यावर काय ते कळेल.'' आणि खरंच लग्नाआधी तास न्‌ तास पपांशी साहित्यावर चर्चा करणारी मी "पंचवटी'त आल्यावर जास्तच मर्यादेने व आदरयुक्त भीतीने त्यांच्याशी वागू लागले. कधीतरी मी ह्यांना म्हणे, ""अहो, माझ्याऐवजी माझी एखादी बहीण तुमच्याकडे दिली असती तर जास्त बरं झालं असतं. निदान पपांशी पूर्वीसारखं मोकळेपणाने बोलता तरी आलं असतं.''

    पपांना त्यांची मुलं, भावंडं, तसेच त्यांच्या चित्रपट व्यवसायातील सहकारीही भिऊन वागत असत. त्याचाच परिणाम नकळत माझ्यावरही झाला असावा.

    लग्न ठरलं तेव्हा माझं वय केवळ 21 वर्षांचं. माझ्या धाकट्या दिरांना एक मुलगी सांगून आली. पपांनी मुंबईच्या फ्लॅटवर मला बोलावून घेतलं. म्हणाले, ""तूच ठरव काय ते.'' परंतु मी तिला नापसंत केल्यावर त्यांनी विचारलं, ""काय गं? आवडली नाही का तुला?'' मी म्हटलं, ""मुलगी नाकीडोळी नीटस होती, परंतु आपल्यासारख्या व्यक्तीला पाहिल्यावरसुद्धा जिचे हात जुळत नाहीत ती आपली सून कशी होईल?'' पपा समाधानाने हसले. ते स्वतः वयाचा मान ठेवीतच, पण इतरांनीही तो ठेवावा, असा त्यांचा आग्रह असे.

    16 मे 1974 रोजी मुंबईत आमचं लग्न रेल्वे संप, भारत बंद इत्यादी अडचणी येऊनही सुखरूप पार पडलं. लग्नानंतर दोन-तीन महिन्यांनी श्रावण महिना आला. ताई त्यांच्या माहेरी कोल्हापूरला गेल्या होत्या. त्या श्रावणात जे जे करायच्या ते ते मी करत होते. मार्गदर्शन करायला माझ्या आजेसासूबाई होत्याच.

    माझी धांदल बघून पपा म्हणत, ""काय, सासूबाईची आठवण येते की नाही?''
    ""हो, खरंच फार येते. त्या सगळं कसं सांभाळतात कुणास ठाऊक!'' मी म्हणायची. पपा हसायचे.

    घरी कोणी पाहुणेमंडळी आल्यावर जेवण व्यवस्थित आहे की नाही याकडे त्यांचा कटाक्ष असे. श्रावणातल्या एके दिवशी माझे वडील जेवायला यायचे होते. मी पुरणपोळीचा घाट घातला. त्या दिवशी नेमक्‍या पोळ्यांच्या बाई गैरहजर! मला फारच टेन्शन आलं; पण प्राप्त परिस्थितीत व्यवस्थित निभावून न्यायचं असं ठरवून मी बटाट्याची भाजी व वडलांना आवडते म्हणून अळूची पातळ भाजी, काकडीची कोशिंबीर असा व्यवस्थित स्वयंपाक केला. घरात 10-12 माणसं होती. कणीक भिजवून पुरणपोळ्याही केल्या. मी केलेल्या पुरणपोळ्या सगळ्यांनी आवडीने खाल्ल्या, म्हणून मी सुटकेचा निःश्‍वास टाकला. तेवढ्यात पपा म्हणाले, ""भात वाढा थोडासा.'' मी डायनिंग रूममधून स्वयंपाकघरात गेले. पाहते तो काय, कुकर चक्क रिकामा! कामाच्या गडबडीत मी चक्क भात लावायलाच विसरून गेले होते. आता पानात काय वाढू? माझा वेंधळेपणा बघून पपा, घरातले सर्व, माझे वडील या सगळ्यांना काय वाटेल? एवढं करूनही सगळे अर्धपोटीच पानावरून उठतील, या जाणिवेने मला रडू आवरेना. मी रडवेल्या आवाजात खाली मान घालून पपांना म्हटलं, ""पपा, माझ्याकडून भात लावायचाच राहिला.'' पपांचा संतापीपणा ज्ञात असलेले सगळे श्‍वास रोखून बसले. पण आश्‍चर्य म्हणजे पपांनी न चिडता मला समजून घेतलं. शांतपणे म्हणाले, ""अगं, भात नकोच होता. पोट भरलंय माझं. आज पुरणपोळी जरा जास्त खाल्ली. अळूची पातळ भाजी झकास जमली, म्हणून थोडा भात खावा वाटला.'' सगळे पानावरून अर्धपोटी उठल्याच्या जाणिवेने मला रडू आवरेना.

    नंतर मात्र पपांनी माझ्या धाकट्या नणदेला खोलीत बोलावून घेतलं व म्हणाले, ""ताई नाही तोवर वहिनीला जरा घरात मदत करत जा. तिची एकटीची तारांबळ होते.''

    मी "माडगूळ' गावाविषयी खूप ऐकलं होतं, वाचलं होतं. खरं तर मोठ्या सुनेला पपांना स्वतः माडगूळ दाखवायचं होतं, पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनालाही न्यायचं होतं. पण तब्येतीच्या कुरबुरीमुळे ते राहिलंच. मी माडगूळला जायची अत्यंत इच्छा प्रदर्शित केल्यावर त्यांनी समाधानाने मला परवानगी दिली. मी त्या छोट्याशा, पण प्रेमळ गावाच्या, बामणाच्या पत्र्याच्या, इंजिनच्या मळ्याच्या आणि प्रेमळ आप्तेष्टांच्या तर प्रेमातच पडले. आम्ही माडगूळहून परत आल्यावर पहाटे 5-5।। लाच पपा उठून बसले होते. मला माडगूळला मिळालेलं सर्वांचं प्रेम ऐकून त्यांचं मन आनंदाने भरून आलं होतं.

    पपांना माडगूळबद्दल फार प्रेम होतं. त्यांनी एकदा मला जवळ बोलावलं व पॅडवरचं स्वतः काढलेलं चित्र मला दाखवून विचारलं, ""हे काय आहे?''

    मी सांगितलं, ""हे माडगूळचं चित्र आहे. आपल्या पावातल्या "बामना'च्या पत्र्याचं.'' त्याबरोबर पपा खूष झाले. त्यांना माडगूळची आठवण आली, की ते कागदावर माडगूळच्या पावातल्या बामणाच्या पत्र्याचं चित्र काढीत. ते पुण्यात असले तरी त्यांचं मन त्याआधीच त्या खेड्यातल्या कौलारू घरापर्यंत पोचलेलं असे.

    पपांचं लाडकं "माडगूळ' गाव मला प्रत्यक्ष पाहायला मिळालं, एवढंच नव्हे, तर पपांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या बामणाच्या पत्र्यात मला राहता आलं. काही वर्षांपूर्वी ई टीव्हीने "माडगुळ्याचे गदिमा' कार्यक्रम केला तेव्हा कार्यक्रमाच्या शेवटी "वेदमंत्राहून आम्हा, वंद्य वंदे मातरम्‌' हे गाणं गायलं गेले तेव्हा तेथे जमलेल्या जवळजवळ 35 हजार लोकांनी उभं राहून पपांना, त्यांच्या त्या गीताला व देशाला मानवंदना दिली. त्या सुवर्णक्षणाचा साक्षीदार होण्याची संधी मला गदिमांमुळेच मिळाली.

    आजही "पंचवटी'वरून जाताना अनेक लोक देवळातल्या देवाला नमस्कार करावा तसा "पंचवटी'ला करतात.असंख्य लोक अजूनही गदिमांची "पंचवटी' पाहायला येतात. जिथे गीतरामायणासारखं महाकाव्य लिहिलं गेलं त्या "आधुनिक वाल्मीकी' अशा गदिमांच्या "पंचवटी'त त्यांची स्नुषा म्हणून राहण्याचं महद्‌भाग्य मला मिळतं आहे.

    पपांनी आमच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला आम्हाला दिलेला आशीर्वाद अजूनही मनावर कोरला गेलाय.

    "शतशरदांचे शांत चांदणे तुमच्या माथी झरो
    कल्पान्तावर सुवंश तुमचा भूमीवर विहरो.'

    माझा मुलगा सुमित्र याने केलेली गदिमा.कॉम ही पपांची वेबसाइट, माझ्या पतीने लिहिलेलं गदिमांच्या "मंतरलेल्या आठवणीं'चं पुस्तक, सुंदर कविता करणारी व मराठी स्पेशल विषय घेऊन ज्युनिअर बी.ए.ला पहिली आलेली माझी मुलगी लीनता यांचं काम बघून माझे सायीचे डोळे निवले आहेत.

    पपा आत्मचरित्र लिहिणार होते. त्याचं नाव त्यांनी ठरवलं होतं, "सकल जनात बरवे केले मजला श्रीरामे' मला त्यांच्या या ओळी माझ्या बाबतीत सार्थ वाटतात. खरोखरी एवढ्या "मोठ्या' गदिमांची सून करून देवाने मला सकल जनात बरवे केलेले आहे. याहून भाग्य ते कोणते?


गदिमा गौरव | Special Quotes
  • लेखक पु.भा.भावे:
    वास्तवतेतील गूढत्व व साधुत्व पाहावयासही माणसापाशी एक दृष्टी असावी लागते.माडगूळकरांचे पाशी ही दुर्मिळ दृष्टी आहे.ते नुसते आकाशाकडे पाहत नाहींत तर आकाशतत्त्वाकडे पाहतात.ह्या तात्त्विक दृष्टीनेच त्यांना आशयसंपन्न कथाचित्रे काढण्याचे सामर्थ्य दिले-अगदी दिवाकर कृष्णांपासून चालत आलेली चांगल्या कथांची परंपरा आज श्री.माडगूळकर चालवीत आहेत.
संबंधीत लेख | Related Articles