गदिमा नवनित
  • चंदनी चितेत जळला चंदन,
    सुगंधे भरुन मर्त्यलोक!.
मराठी युनिकोड फॉन्ट
  • गदिमा-पुलंचा अमोल ठेवा!
  • Gadima Pulancha Amol Theva
  • प्राजक्ता सुमित्र माडगूळकर | Prajkata Sumitra Madgulkar


  •   
    उद्यानात लेकीला घेऊन गेले तर खुद्द गदिमा आणि पुलंचा सहवास लाभलेले एक आजोबा भेटले. आजच्या युगात नातीसुद्धा दुर्मिळ होत असताना वडिलांच्या इच्छेचा मान ठेवणारे किती भेटतील?

    सायंकाळी नेहमीप्रमाणे मी आणि माझी दहा महिन्यांची लेक 'पलोमा' कमला नेहरू उद्यानात गेलो होतो. लहानग्यांचे बागडणे आम्ही दोघी न्याहाळीत होतो. पलोमाला

    पहिल्यांदा घसरगुंडीवर बसवले आणि तिला पण घसरगुंडी खेळायला फार आवडली. जवळजवळ पाऊण तास मी तिला खेळवत होते. घरी जाण्याआधी पाच मिनिटे बसावे असा विचार केला. मुले खेळत होती तिथे एकही बाक रिकामा नव्हता म्हणून मी गार्डन एरियात पाहिले, तर दाराजवळच एक बाक रिकामा होता. मी त्यावर जाऊन बसले. पलोमा येणार्‍या जाणार्‍याकडे कुतूहलाने पाहत होती. तेवढ्यात एक आजोबा आले आणि पलोमाने त्यांना पाहताक्षणी 'आबा' अशी गोड हाक मारली. ते सद्‌गृहस्थ क्षणभर थांबले. त्यांच्या चेहर्‍यावर छानशी हास्याची लकेर उमटली आणि ते आमच्या दिशेने आले.

    ते आजोबा मला म्हणाले, 'मुली, इथे फार डास असतात तर तू गार्डन एरियामध्ये कुठेही बस.' त्यांच्या या आपुलकीच्या वाक्‍याने माझ्या मनाला बरे वाटले. मी त्यांना सांगितले, की मी घरीच निघालेय.

    तोपर्यंत पलोमा आणि ते आजोबा खेळण्यात दंग झाले होते. ते पलोमाला 'पिलोबा' म्हणत होते. ते मला म्हणाले, 'मी डॉ. माधव ओतुरकर.' त्यांनी माझी चौकशी केली. मी 'गदिमांची नातसून' असे सांगितल्यावर ते आनंदित होऊन मला म्हणाले, 'आता तुझ्याशीही गप्पा मारायलाच हव्यात,' असे म्हणून ते माझ्या बाकावर येऊन बसले. ते म्हणाले, 'तुला 'गदिमां'ची आठवण सांगतो.

    'बंगालच्या दुष्काळानंतर मी बंगालच्या दुष्काळग्रस्तांना मदतीसाठी निधी गोळा करत होतो. मी बर्‍याच बड्या-बड्या लोकांकडे गेलो; परंतु लोक आठ आणे, एक रुपया द्यायलाही का-कू करत होते. मी एकदा गदिमांकडे 'प्रभात रोडवरच्या पवार बंगल्यात' गेलो. मी निधी गोळा करण्यामागची माझी भूमिका गदिमांना सांगताच गदिमांनी 'चांगले काम करतोयस!' अशी माझ्या कामाची पावती देऊन त्या काळात पंचवीस रुपये काढून दिले. मी गदिमांची उदारता पाहून भारावून गेलो आणि त्यांना नमस्कार करून बाहेर पडलो. ही माझी पहिली भेट गदिमांसोबतची!'

    ''एकदा असंच माझ्या एका जवळच्या मित्राला लंडनला 'गदिमा नवनीत' मला पाठवायचे होते. मी 'गदिमा नवनीत' विकत घेऊन गदिमांच्या सहीसाठी त्यांच्या 'पंचवटी' बंगल्यावर न कळविताच गेलो. अण्णांची सही घेतली. अचानक जाऊनही गदिमांची भेट झाली, सहीपण मिळाली. गदिमांच्या सुविद्य पत्नी विद्याताई यांचे आदरातिथ्य अनुभवायला मिळाले. मी खुशीतच बाहेर पडलो. तेथून बाहेर पडल्यावर एका कार्यक्रमाला गेलो. तिथे पु. ल. देशपांडे आले होते. मी 'गदिमा नवनीत'वर पु.लं.ची सही घेतली. अशा दोन दिग्गज व्यक्तींच्या सह्या असलेले पुस्तक मी लंडनला मित्राला पाठवले. मित्राने ते पुस्तक इतकी वर्षे जपून ठेवले. मित्राच्या निधनानंतर त्याच्या इच्छेनुसार (मित्राने आपल्या 'विल' मध्ये लिहून ठेवले होते की के पुस्तक माझ्या पश्चात भारतात माझा मित्र डॉ. माधव ओतुरकर याच्याकडे पाठवावे) हा 'अमूल्य ठेवा' माझ्याकडे परत आला!''

    तुला एक गंमत सांगतो, असं म्हणून त्यांच्या वडिलांची आठवण सांगायला सुरवात केली. ''काही दिवसांपूर्वी इटलीचा एक इतिहासकार 'हेरिको फसाना' माझ्या वडिलांना शोधत माझ्याकडे आला. माझे वडील इतिहासकार होते. त्यांचे नाव राजाराम ओतुरकर. त्या इटालियन इतिहासकाराला माझ्या वडिलांचा संदर्भ 'इंटरनॅशनल बुक स्टॉल'चे श्री. दीक्षित यांनी दिला होता. पण बहुधा त्यांच्याकडे माझ्या वडिलांचा फोन नंबर नव्हता. तर त्या इटालियन इतिहासकाराने पुण्याच्या दूरध्वनी निर्देशिकेतून राजाराम ओतुरकर शोधले. ते सापडले नाही म्हणून पुण्यातील सर्व आर. ओतुरकरांना फोन करून पाहिले.

    माझे नाव एम. आर. ओतुरकर म्हणून त्याने मला फोन केला आणि मी राजाराम ओतूरकर यांचाच मुलगा म्हटल्यावर त्याने माझ्या घरी यायची परवानगी मागितली. इटलीच्या त्या इतिहासकाराला अभ्यासासाठी काही पुस्तके हवी होती. वडिलांच्या संग्रहातील दोन हजार पुस्तकांतून त्या इतिहासकाराने त्याला हवी असलेली काही पुस्तके बाजूला काढली आणि मला म्हणाला, 'या पुस्तकांचा मोबदला म्हणून मी तुमच्या फॅमिलीला पूर्ण युरोप टूर स्पॉन्सर करतो.' त्यावर मी म्हणालो, ''माझे वडील गेल्यावर मला त्यांच्या हस्ताक्षरातील एक कागदाचा तुकडा सापडलाय व त्यात त्यांनी लिहिलंय 'माझी पुस्तके विकू नकोस!' मला या पुस्तकांचा मोबदला नको. युरोप टूर नम्रपणे नाकारून पुस्तके त्याच्या हवाली केली.''

    डॉ. माधव ओतुरकर हे व्यवसायाने डॉक्‍टर आहेत. त्यांनी गेली त्रेपन्न वर्षे वैद्यकीय सेवा केवळ व्यवसाय म्हणून न बघता सामाजिक बांधिलकीही जपली. बंगालचा दुष्काळ असो वा आजच्या व्यवहारी जगात गरजूंसाठी चोवीस तास वैद्यकीय सेवा नाममात्र शुल्कात उपलब्ध करून दिली.

    आजच्या या संगणक, इंटरनेटच्या युगात जिथे पुस्तकप्रेमच काय, एकत्र कुटुंबपद्धती, आई-वडिलांविषयीचे प्रेम, आदर सगळेच दुर्लभ होत चालले आहे, अशा काळात वडिलांच्या पश्‍चात वडिलांनी केवळ चिटोर्‍यावर व्यक्त केलेल्या इच्छेचा मान ठेवणारा असा पुस्तकप्रेमी दुरापास्त!

    या प्रसंगानंतर ओतुरकर अजोबांशी बर्‍याचदा भेटी झाल्या,खुप विषयांवर चर्चा झाल्या,एकदा ओतुरकर आजोबा व आजी पंचवटी वर आले होते,बोलण्याच्या ओघात ते मला म्हणाले की 'जसे प्रत्येक बापाला वाटते की आपली लेक चांगल्या घरी पडावी तसेच प्रत्येक पुस्तक प्रेमींना वाटते की आपल्या पश्चात पुस्तकांची नीट जपणूक व्हावी,म्हणून हे 'गदिमा नवनीत' आम्ही तुला भेट दयायला आलो आहोत.आता माझ्या मनाला समाधान आणि आनंद राहिल कि माझे पुस्तक योग्य व्यक्तिच्या हातात पडले आहे'.

    आज ओतुरकर आजोबा आपल्यात नाहीत पण आजोबांनी दिलेला 'अमोल ठेवा' मी

    अभिमानाने जपून ठेवला आहे ....


गदिमा गौरव | Special Quotes
  • कविवर्य बा.भ.बोरकर:
    आदिकवी वाल्मीकीने आपल्या स्वतंत्र सौंदर्यदृष्टीने विधात्याच्या सूक्ष्म आणि स्थूल सृष्टीतून नेमके सौंदर्य टिपून काढून त्यातून आपली रामकथा रचली.त्याचप्रमाणे कविश्री माडगूळकरांनी वाल्मीकीच्या काव्यसृष्टीतले वेचीव सौंदर्य आपल्या स्चयंभू प्रतिभेने बिनचूकपणे निवडले आहे.गीतरामायणातली काही गीते रामायणासारखीच चिरंजीव होऊन राहतील आणि त्याचबरोबरच माडगूळकरांचे -माझ्या बंधुतुल्य मित्राचे-नाव देखील.
संबंधीत लेख | Related Articles