• ओटीत घातली मुलगी विहीणबाई
 • Otit Ghatali Mulagi Vihin Bai
 • सुमित्र माडगूळकर | Sumitra Madgulkar


 •   
  आज विद्याताई व गदिमा आनंदात होते,त्यांच्या मोठया लाडक्या लेकीला 'वर्षा'ला एक चांगले स्थळ सांगून आले होते,गदिमांच्या चाहते परिवारातले राजाभाऊ सदार्वते (पुण्यात यांचे सदार्वते राममंदिर प्रसिध्द आहे) यांनी उद्योगपती मल्हार सदाशिव (म.स) तथा बाबुरावजी पारखे यांच्या ज्येष्ठ चिरंजीव सुधाकर पारखे यांचे स्थळ सुचवीले होते.

  बाबुरावजी पारखे,मराठी माणसाला अभिमान

  वाटावा अश्या निवडक मराठी उद्योजकांत त्यांचे नाव गणले जायचे,लहान वयातच त्यांनी मातोश्री माईसाहेब पारखे यांच्या कल्पनेतून व प्रत्यक्ष कृतीतून सुरु केलेला पाकीट निर्मिती चा घरगूती व्यवसाय आज 'पेपर व पल्प कन्व्हरशन प्रा लि (PAPCO)' या महाउद्योगात परावर्तीत झाला होता,'सेंट्रल पल्प मिल' (CPM),'युरोकोट' (EUROCOTE) सारख्या नावांनी महाराष्ट्र व गुजरात मध्ये पसरलेल्या पारखे उद्योग समुहाने त्या काळात १०० कोटी च्या आसपास टर्नओव्हरचा पल्ला गाठला होता.

  बाबुरावांच्या गृहिणी-सखी-सचिव सुविद्य पत्नी वहिनीसाहेब तथा कमलाताई पारखे या तर अक्कलकोटचे श्री गजानन महाराज यांच्या भगिनी,अगदी जेवायचा आग्रह करताना सुध्दा 'या पोळीला तुमच्या ताटात यायचेच आहे बघा!',इतका प्रेमळ आग्रह करणारे व्यक्तिमत्व,सर्वार्थाने विद्या व विलास यांचे संगम असलेले स्थळ होते,पारखे उद्योग समुहाची धुरा आता तरुण पिढीच्या हातात होती,त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव सुधाकर पारखे व त्यांचे बंधू प्रकाश व अरुण आता बाबुरावांबरोबर उद्योगाची सुत्रे सांभाळत होते,सुधाकरराव पारखे ६ फूट उंच,चेहर्‍यावर सतत स्मित हास्य,सावळी कांती,कुरळे मागे वळवलेले दाट केस,शास्त्रशाखेचे पदवीधर,पॅपकोचे मॅनेजींग डायरेक्टर म्हणून कार्यरत होते,एका आदर्श उद्योजकातले सर्व गुण त्यांच्यात होते,गदिमा-विद्याताईंना हा भावी जावई आपल्या लेकी साठी पसंत पडला व पारखे कुटुंबाला मराठीत एम.ए झालेली विदयाताईंची 'सावली' व गदिमांची लाडकी लेक पंसत पडली.

  योग जुळून आला व २९ जून १९६९ रोजी लग्न थाटामाटात पार पडले.गदिमांनी लग्नासाठी खास 'ओटीत घातली मुलगी विहिणबाई' ही विहीण व सासरी जाणार्‍या आपल्या मुलीला उपदेशपर - आईवडिलांच्या भावना व्यक्त करणारे 'जा बाळे जा, सुखे सासरी' ही दोन सुंदर गीते लिहिली होती,

  गदिमांच्यातला पिता आपल्या लाडक्या मुलीला निरोप देत होता...

  "तुझा लाडका अल्लड वावर
  आता कुठुनी माझ्या घरभर
  द्राक्षरसाचा मधूर तुझा स्वर
  पडेल कानी कुठुनी दिनभरी..."

  लग्नपत्रिकेवर या गीतांचा समावेश होता,अक्कलकोटचे श्री गजानन महाराज लग्नाला उपस्थित होते,मुंगीलाही शिरता आले नसते अशी गर्दी झाली होती,इतकी की जेव्हा बॅंड वाजायला लागला तेव्हा विद्याताईंना कळले की आपल्या मुलीचे लग्न लागले!.

  सुधाकरराव व वर्षाताईंची संसारवेल वाढत होती,वेदवती व विद्याधर या दोन गोंडस नातवंडांचा पारखे-माडगूळकर परिवारात प्रवेश झाला होता.पारखे उदयोग समुह वाढत होता,१९७३ मे महिना असेल सोनगडच्या (गुजरात) 'सेंट्रल पल्प मिल' मध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या,त्या समस्यांच्या निराकरणासाठी आंध्रप्रदेशात हैद्राबादजवळ विजयवाडा येथे जाण्याचे घटत होते.त्याची बोलणी करण्यासाठी स्व:ता सुधाकरराव,त्यांचे सख्खे मेहुणे नागेशराव देशपांडे व आत्तेभाऊ आत्माराम कवठेकर, राजाभाऊ सदार्वते यांनी जायचे ठरले होते.मुंबईवरुन हैद्राबादला जाण्यासाठी चौघांना प्लाईटची टिकीटे मिळाली पण पुढे विजयवाडा पर्यंत कनेक्टींग प्लाईट चे केवळ एकच टिकीट उपलब्ध झाले,मॅनेजींग डायरेक्टर असून सुध्दा सुधाकरांनी हैद्राबादहून पुढे स्व:ता टॅक्सीने जायचा निर्णय घेतला व राजाभाऊ सदार्वते यांना त्या एकमेव तिकीटावर जायचा आग्रह केला.

  'पंचवटीत' गदिमा व विद्याताईंचे जुने स्नेही सोळांकूरकर मास्तर आले होते,अंगणात तिघांच्या गप्पा रंगल्या होत्या...सोळांकूरकर बोलत होते 'कवी,तू किती भाग्यवान आहेस! तुला बायको चांगली मिळाली.मुले एकापेक्षा एक गुणी,आज्ञाधारक आहेत.सुंदर बंगला,शेतीवाडी,आई,भावंडे,चांगले जावई,सगळी सुखे हात जोडून उभी आहेत.हेवा करावा असेच तुझे सगळे आहे...'

  पण नियतीच्या मनात भलतेचे चालू होते,जणू नियती हे बोलणे ऐकून खदाखदा हासत होती...७ मे १९७३ रात्री १२ ची वेळ असावी...पंचवटीत फोनची बेल वाजली ... प्रकाश पारखे यांचा फोन होता....'सुधाकरांच्या गाडीला विजयवाडयाकडे जाताना राजमहेंद्रीजवळ मोठा अपघात झाला आहे,सर्वांना हॉस्पिटल मध्ये दाखल केले आहे,तुम्ही दोघे इकडे आलात तर बरे होईल',पारख्यांच्या 'विद्याविलास' बंगल्यावर चिंतेचे सावट होते,नातेवाईक-मित्र जमले होते,बाबुराव पारखे राजमहेंद्रीला रवाना झाले होते सगळ्यांचे डोळे त्यांच्या फोन व वाटेकडे लागले होते.सकाळी ११-११.३० वाजता त्यांची गाडी आली,ते खांद्यावर कोट टाकून तडक माईसाहेबांकडे त्यांच्या आईकडे गेले व त्यांच्या मांडीवर डोके ठेवून म्हणाले 'माईसाहेब,आपली तीनही मुले आपल्याला सोडून गेली हो.....'

  कोण कोणाची समजुत काढणार?,नियतीने मोठा आघात माडगूळकर-पारखे परिवारावर केला होता,गदिमांचा लाडका जावई सुधाकर,त्यांचे मेहूणे व आतेभाऊ अश्या तीन निष्पाप जीवांचा बळी आज काळाने घेतला होता.श्री.गजानन महाराज शांत होते ते इतकेच म्हणाले 'ते योगभ्रष्ट आत्मे होते,इहलोकावरचे त्यांचे काम संपले होते',खरच सुधाकरांना माहीत होते आपण आता जाणार आहोत?,कदाचीत असावे कारण जाण्यापूर्वी त्यांनी नुकतीच आपल्या कुटुंबाला कोणापुढे हात पसरायला लागू नयेत म्हणून व्यवस्था करुन ठेवली होती,दोन मुलांच्या लग्नापर्यंत लागणारी सर्व आर्थिक तरतूद त्यांनी करुन ठेवली होती व ती पण केवळ वयाच्या ३३व्या वर्षी.

  पारखे उद्योग समुहाचा आधारस्थंभ आज कोसळला होता.काही दिवसांपूर्वी श्री गजानन महाराजांनी काही जवळच्या लोकांना सांगीतले होते 'काळ कठीण आहे,मोठी संकटे येतील' ....पहिल्या संकटाने पारखे उद्योग समुहाचे तीन आधारस्थंभ उध्वस्थ केले,व्यावसायिक नीच राजकारणाने पुढे कामगारांचा मोठा संप झाला व आधिच आघाताने डळमळीत झालेला पारखे उद्योह समूह अजून कोसळला,बाबूरावांनी शेवटपर्यंत प्रयत्न सोडले नाहीत पण संपातून उठून पुन्हा सावरणार्‍या पारखे समूहाला शेवटचा धक्कादिला तो निर्सगाने,संप मिटून कारखाना पुन्हा सुरु होणार तोच खोपोलीला पाताळगंगा नदीला मोठा पूर आला व सर्व यंत्रसामग्री पाण्याखाली गेली,या धक्क्यातून पारखे उद्योगसमूह

  पुन्हा सावरु शकला नाही.'कहाणी एका उद्योजकाची,उत्कर्षाची व अपकर्षाची' या आपल्या आत्मचरित्रात बाबुराव पारखे यांनी आपल्या जीवन प्रवासाचा तर 'गदिमांचे आध्यात्मिक अंतरंग' या पुस्तकात गदिमांच्या वेगळ्या आध्यात्मिक बाजूचा आढावा घेतला आहे.

  'ओटीत घातली मुलगी विहिणबाई','जा बाळे जा, सुखे सासरी' ही गदिमांची दोन सुंदर गीते,संगीतकार अरुण पौडवाल यांनी या दोन गीतांना फार सुंदर चाली लावल्या,आशा भोसले व अनुराधा पौडवाल या दोघींच्याही आवाजात पुढे ही दोन गीते खूप गाजली,पण आज ४५ वर्षानंतर सुध्दा ही गाणी स्व:ताभोवती एक कारुण्याची झालर घेऊन ऊभी आहेत.एका पित्याच्या...कवीच्या... आईच्या भावना....मनाला भिडत जातात व ज्यांना हा प्रसंग माहित आहे त्यांच्या डोळ्यातून पाणी आल्या शिवाय राहवत नाही.

  गदिमा दैववादी नव्हते पण 'गीतरामायणात' प्रभू श्रीरामाच्या तोंडात त्यांनी एक ब्रम्हवाक्य टाकले आहे आणि तेच अंतिम सत्य आहे..

  "दैवजात दु:खें भरतां दोष ना कुणाचा
  पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा....."

  विशेष आभार : सौ.वेदवती पारखे-उरणकर,श्री.विद्याधर पारखे,श्री.विनायक पारखे व समस्त पारखे परिवार,www.parkhe.org


गदिमा गौरव | Special Quotes
 • यशवंतराव चव्हाण
  गदिमांच्या काव्यप्रतिभेवर प्रसन्न होऊन..'मी जर राजा असतो तर कविवर्यांच्या हाती सोन्याचे कडं चढवलं असतं.'
संबंधीत लेख | Related Articles
गीतरामायण अॅप | GeetRamayan App
 • "गीतरामायण" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे!.
  आजच डाऊनलोड करा

  GeetRamayan application now available on android phones,now enjoy geetramayan songs in audio and text on your mobile,for more details click on following link Download Link
 • Box-RB-1