गदिमांचे एक सुंदर गीत,आपल्या प्रत्येकात एक कुरुप पिल्लू दडलेले आहे,आपण डावलले जातो आहोत,आपल्यातल्या टॅलेंटला वाव मिळत नाहीये,कोणीही सोमे गोमे येतात आणि आपल्या पुढे जातात,आपली कदर कोणी करत नाहीये..ही भावना कधी न आपल्या आयुष्यात कुरुप बदकाच्या पिल्लाच्या रुपाने आपल्या भावतरंगातून मान नक्कीच वर काढते व गदिमांनी हे गाणे फक्त आपल्यासाठीच लिहून ठेवले आहे व आपल्यातला राजहंस एक न एक दिवस जगापुढे येईल याची आशा आपल्या मनाला उभारी देत राहते.
आपल्यातला राजहंस गदिमांनी ओळखला होता,गदिमांचा जन्म अठराविश्व दारिद्र्य असलेल्या एका गरीब कुलकर्णी परिवारात झाला,आटपाडी जवळचे माडगूळे हे गदिमांचे गाव,वडिल औंध संस्थानात कारकून होते,गदिमांचे आजोबा मोठे कर्तुत्ववान,ते मरताना गदिमांच्या आईला सांगून गेले 'बाळ,यापुढे काळ कठीण आहे,तुझा नवरा साधू-संत आहे,आज मिर्ची आणली तर चार दिवसांनी मीठ आणेल...तुलाच यापुढे खंबिर व्हायला हवे...' झालेही तसेच,अठराविश्व दारिद्र्य गदिमांची वाटच पहात होते,न देवाने रुप दिले होते न आर्थिक सुबत्ता,दहावीत गणिताने घात केला व पुढे शिकावे इतका पैसा व बळ ही त्यांच्या जवळ नव्हते पण एक दिवस घडलेल्या प्रसंगाने त्यांच्यातला राजहंस जागा झाला.
गदिमांच्या वडलांची 'कुडंल' या गावी बदली झाली होती,गावात पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष्य,गावाजवळच्या ओढ्यामधून पाणी भरुन आणायला लागायचे,गदिमांनी कुमार वयात प्रवेश केला होता,अर्धवट वय ज्यावेळी,मनात एक धगधग असते,अन्याय-गरीबी,जग सगळ्यां विषयी एक विचित्र पेटती भावना मनात उत्पन्न होत असते,याच वयात एक दिवस गदिमा असेच गावातल्या पोरांबरोबर हुंदडत चालले होते,समोरुन ओढयावरुन कळशीत पाणीभरुन त्यांचे वडिल घराकडे चालले होते,त्यांना दम्याच्या त्रास होता,धापा टाकतच ते चालले होते....
गदिमांनी ते बघितले व त्यांचा राग मस्तकात गेला,तावातावाने ते वडिलांजवळ गेले व कळशी त्यांचा हातातून ओढून घेतली,तसेच तडक घरी गेले,कळशी ठेवली,व घरातले प्रत्येक भांड न भांड त्यांनी ओढ्यावरुन पाणी आणून भरायला सुरवात केली,अगदी वाटी-पेल्यांपर्यंत सर्व भरुन झाले,गदिमांची आई हे सर्व बघत होती ती हसुन म्हणाली 'अरे अण्णा,आता देवाची पळी तेव्हडी भरायची राहिली रे,तुझे वडील पाणी भरत होते तर पुरत नव्हते,आज तु पाणी आणलेस तर घरात पाणी ठेवायला जागा राहीली नाही....' आईच्या बोलण्यातली सुचकता गदिमांनी अचूक ओळखली,आपले वडिल आता थकले आहेत,संसाराचा भार त्यांना एकट्याला पेलवत नाहीये आपल्यालाही आता काहीतरी करायला हवे याची जाणीव त्यांना झाली व वयाच्या केवळ १७-१८ व्यावर्षी ते घर सोडून पुढच्या वाटचालीसाठी कोल्हापूरला चित्रपटसृष्टीत आले.
पुढे काही दिवसांनी गदिमांच्या वडिलांची कुंडल गावावरुन बदली झाली,त्याकाळात बैलगाड्यांवरुन सामान नेत असत,कुलकर्णी कुटुंब आवरा-आवरी करुन निघाले पण गावातल्या लोकांनी गाड्या अडवून धरल्या,गावात देणी खूप झाली होती,व ती फेडल्याशीवाय जायचे नाही असे सावकार लोक सांगत होते,मोठी पंचाईत झाली,गदिमांच्या आईने छोट्या व्यंकटेश (गदिमांचे धाकटे बंधू व्यंकटेश माडगूळकर) ला सांगीतले 'अण्णा ला पत्र पाठवून बोलावून घे',त्यांनी गदिमांना पत्र लिहीले,छोटा व्यंकटेश दररोज संध्याकाळी एसटीच्या वाटेवर डोळे लाऊन आपल्या भावाची वाट पहायचा,त्याला खात्री होती आपला आण्णा येईल व आपल्याला संकटातून सोडवेल,३-४ दिवस झाले व एके संध्यांकाळी आपल्या लाडक्या अण्णाची सावळी आकृती दुरुन येताना दिसली.गदिमा आले व
त्यांनी गावातली सर्व देणी एकहाती देऊन टाकली व गदिमांच्या कुटुंबाच्या गाड्या कुंडल गावातून बाहेर पडल्या.
काही दिवसांपूर्वी तावातावाने वडीलांच्या हातून कळशी घेणार्या गदिमांच्यातल्या कुरुप पिल्लाचा आज राजहंस झाला होता,याच राजहंसाने पुढे मराठी साहित्यात व मराठी चित्रपटसृष्टीत एक स्वता:चे अनभिषक्त सम्राटपद निर्माण केले,'एका तळ्यात होती बदके पिले सुरेख,होते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक..... ' प्रत्येकाला आपले वाटणारे गदिमांचे हे सुंदर गीत,मुळ 'सुखाचे सोबती' या चित्रपटासाठी गदिमांनी लिहिले होते,पण चित्रपट काही कारणाने रखडला व श्रीनिवास खळे यांनी 'गोरी गोरी पान' व 'एका तळ्यात होती' दोन बालगीतांना चाली लावल्या व त्याकाळच्या एच.एम.व्ही या कंपनी कडे गेले,सुरवातीला त्यांनी या गाण्याची टर ऊडवली की 'हे काय गाणे आहे,बदके काय पिल्ले काय....' पण गदिमा व खळे ठाम होते,गदिमांचा दबदबा नुकताच वाढायला लागला होता,चित्रपटाच्या आधी ही रेकॉर्ड निघाली व हे गाणे प्रचंड गाजले ...आशा भोसलेंचा मधुर आवाज व श्रीनिवास खळे यांचे सुंदर
संगीत या गाण्याने खूप लोकप्रियता मिळवीली,पुढे 'सुखाचे सोबती' चित्रपटातही हे गाणे प्रसिध्द झाले,त्याला वसंत पवार यांचे संगीत होते तर मधुबाला झवेरी यांनी ते गायले होते.
मूळ इंग्रजी 'The Ugly Duckling' या संकल्पनेवर आधारीत आजही तितकेचे ताजे तवाने असलेले हे गदिमांचे सुंदर गीत,प्रत्येकाने ऐकावे व आपल्यातला राजहंस जागा करावा इतके सुंदर गीत,गदिमा वेब साईटच्या बालगीते या विभागात आपण या गाण्याच्या दोन्ही आवृत्या ऐकू शकता.
एका तळ्यात होती बदके पिले सुरेख
होते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक
कोणी न तयास घेई खेळावयास संगे
सर्वांहुनी निराळे ते वेगळे तरंगे
दावूनि बोट त्याला म्हणती हसून लोक
आहे कुरूप वेडे पिल्लू तयांत एक
पिल्लास दु:ख भारी, भोळे रडे स्वतःशी
भावंड ना विचारी, सांगेल ते कुणाशी
जे ते तयास टोची दावी उगाच धाक
होते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक
एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले
भय वेड पार त्याचे वार्यासवे पळाले
पाण्यात पाहताना चोरूनिया क्षणैक
त्याचेच त्या कळले तो राजहंस एक.
गदिमा गौरव | Special Quotes
कविवर्य कुसुमाग्रज (गदिमा गेले तेव्हा)
महाराष्ट्र सरस्वतीचा लाडका पुत्र काळाने हिरावुन नेला.माडगूळकरांच्या निधनाने मराठी साहित्यातील उत्तम संस्कार मावळला.आणि एक सुंदर संगीत हरपले.विविध रसांवर विलक्षण प्रभुत्व करणारा त्यांच्या सारखा कवी अलीकडच्या काळांत झाला नाही.गीतरामायणाने माडगूळकर चिरंजीव झाले पण मराठीतील विविध रसांचे आणि कवितेतील अपूर्व चैतन्य गेले.