"पळून गेलेल्या काळाच्या कानात माझ्या गीतांची भिकबाळी डोलते आहे" .......गदिमा
महाराष्ट्राच्या लोकजीवनात सुगंधासारखा शिरलेला एक प्रतिभासंपन्न साहित्यिक/कलाकार,मराठी माणूस ज्यांना 'गदिमा' या लाडक्या नावाने ओळखतो,जवळच्या मित्रांचे 'अण्णा' तर आम्हा नातवंडांचे 'पपा आजोबा' अर्थातच गीतरामायणकार महाकवी ग.दि.माडगूळकर....
लहानपणापासूनच माडगूळकर या नावाच्या मंत्राक्षता मला लाभल्या व आपण
कोणीतरी वेगळे आहोत,आपले आजोबा कोणीतरी मोठे होते हे लोकांच्या प्रतिक्रियेतून व मोठेपणी त्यांच्या साहित्याच्या अभ्यासातून कळत गेले.लहानपणापासून माझ्या आयुष्यात एक प्रसंग वारंवार घडतो आहे,समोरच्याला माझे नाव सांगितल्यावर आधी पहिला प्रश्न येतो "ग.दि.माडगूळकर तुमचे कोण?" व मी "ते माझे आजोबा!" असे सांगितल्यावर समोरच्या माणसाच्या चेहर्यावरचे बदलणारे भाव,त्याला वाटणारा आनंद,त्याने काढलेले "अरे वा","अरे बापरे","आमचे भाग्य की तुमची भेट झाली" असे उदगार व त्यानंतर आम्हाला मिळणारी विशेष: वागणूक याचा अनुभव आजही पदोपदी घेतो आहे.मग ती कोणी मोठा व्यक्ती असो वा मराठी साहित्यावर प्रेम करणारा सामान्य माणूस.
पपा आजोबा (गदिमा) गेले तेव्हा मी २.५ वर्षाचा होतो,त्यामुळे त्यांच्या काही धूसर आठवणी आहेत.ते मला प्रेमाने 'सोन्या' अशी हाक मारायचे.ते पंचवटीच्या व्हरांडयात त्यांच्या निळ्या रंगाच्या कोचावर लिहायला बसायचे,येथेच त्यांनी गीतरामायणासकट अनेक सुप्रसिध्द चित्रपटांच्या कथा,गीते लिहिली आहेत.त्यांचा स्वभाव शिघ्रकोपी व त्यांच्या कर्तुत्वामुळे सर्वांनाच त्यांची आदरयुक्त भीती वाटायची.मी लहान असताना त्यांच्याजवळ जायचो व त्यांच्या बोटाला धरुन त्यांना त्यांच्या नीळ्या कोचावरुन ऊठवायचो व म्हणायचो "पपा आजोबा तू समोर बैस",आणि न चिडता ते मुकाटपणे अजाण नातवंडाचा तो हट्टही पुरवायचे,ते म्हणायचे "माझ्या सिंहासनावरुन मला उठवणारा हा एकमेव !,माझा आजा बाबा बामणच जन्माला आला आहे!.हाच माझे नाव पुढे चालवेल!".
मी अनेकदा पपा आजोबा व ताई आजी (गदिमांच्या पत्नी विदयाताई) यांच्या सोबत त्यांच्या पांघरुणात शिरुन लपाछपीचा खेळ खेळत असे,पपा आजोबा मला संध्याकाळी फिरायला घेऊन जायचे,माझ्या आवडत्या जेम्स च्या गोळ्या घेऊन दयायचे.त्यांनी माझ्यावर अनेक कविता सुध्दा केल्या होत्या
आलगट्टी गालगट्टी सोन्याशी गट्टी फू
तुला मी खेळायला घेणार नाही, जेमच्या गोल्या देनार नाही
जवळ आलास तरी घेईन गालगुच्चा,अंगावर सोडीन भू
सोन्याशी गट्टी फू.....
एकदाच ते माझ्यावर खूप रागवले.पंचवटी च्या मागच्या अंगणात तुळशीकट्या जवळ मी माझ्या लाल रंगाच्या मोटारीत बसून खेळत होतो,छोटी पायडलची मोटार होती पण पायानेच ढकलत मी खेळत होतो.जवळच माझी पणजी आजी म्हणजे गदिंमांच्या मातोश्री बनुताई उभ्या होत्या.खेळता खेळता मी गाडी जोरात ढकलायचो व पणजी आजी च्या जवळ जाऊन एकदम थांबायचो,असा माझा खेळ सुरु झाला.पणजी आजी, मी जोरात जवळ गेलो की घाबरुन "नको रे बाबा!" असे म्हणायची ते ऐकून मला आणखीनच गम्मत वाटून चेव चढायचा व हे मी वारंवार करु लागलो,पपा आजोबांनी ते बघितले व एकदोनदा समजावून सांगितले की "सोन्या अस करु नकोस",पण माझी गंमत चालूच होती,शेवटी व्हायचे तेच झाले,पपा आजोबांची एक सणसणीत माझ्या कानाखाली बसली आणि २-२.५ वर्षाचा मी कळवळलो,रडून रडून लाल लाल झालो.पुढे थोडयावेळाने त्यांचा राग शांत झाला व आपण लाडक्या सोन्याला मारले याचे त्यांना खूप वाईट वाटले.त्या दिवशी ते दुपारी जेवले पण नाहीत तसेच आपल्या खोलीत जाऊन पडले.संध्याकाळी मला ऊचलून घेतल,पटापटा पाप्या घेतल्या व म्हणाले "चल रे सोन्या आपण जेमच्या गोळ्या खायला जाऊ" म्हणून फिरायला घेऊन गेले.आपल्या आईविषयी गदिमांना किती प्रेम होतो हे त्यांच्या साहित्यातून प्रकट झालेच आहे,आपल्या मुलांना नाही पण नातवंडांना सगळे गुन्हे माफ करणारे पपा आजोबा त्या एका प्रसंगात मात्र माझ्यावर खूप रागावले होते.
गदिमांबद्ल लिहायचे म्हंटले तर अनेक अंक सुध्दा पुरणार नाहीत असे अष्टपैलू व्यक्तीमत्व, "ज्योतीने तेजाची आरती" या उक्ती नुसार वरवर त्यांच्या कार्याचा फक्त आढावा घ्यायचा झाला तर...
गदिमांचा जन्म शेटफळे या त्यांच्या आजोळी झाला तर बालपण अत्यंत गरीब व प्रतिकूल परिस्थिती मध्ये माडगूळे या गावात गेले.वयाच्या १६-१७ वर्षीं त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला आणि बघता बघता माडगूळकर या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत अनभिषक्त सम्राटपद निर्माण केले.मराठी चित्रपटात कथाकार, पटकथाकार, संवादलेखक, गीतकार, अभिनेता,निर्माता तर मराठी साहित्यात कवी,कथालेखक,कादंबरीकार,नाटककार,संपादक अशा सर्व क्षेत्रात वावर केला,गीतरामायणाने तर त्यांना आधुनिक वाल्मीकी व महाकवी पद बहाल केले.
मराठी चित्रपटांसाठी त्यांनी १५७ पटकथा तर २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली.त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये रामजोशी,वंदे मातरम,पुढचे पाऊल,गुळाचा गणपती,लाखाची गोष्ट,पेडगावचे शहाणे,ऊनपाऊस,सुवासिनी,जगाच्या पाठीवर,प्रपंच, मुंबईचा जावई,देवबाप्पा सारख्या उत्तमोत्तम चित्रपटांचा समावेश होता,गदिमा-सुधीर फडके-राजा परांजपे या त्रयीने तर मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ निर्माण केला.
पुलंनी म्हंटले आहे "महाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर तर माडगूळकरांचे अनंत उपकार आहेत.इतर काहीही देण्या-या माणसापेक्षा समाजाला गाणे देणा-या माणसाचे उपकार फार मोठे असतात. 'Song has longest life' अशी एक म्हण आहे.एक गाणे माणसांच्या पिढ्यान् पिढ्या बांधून ठेवते एवढेच कशाला .माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवून टाकण्याचे गाण्याइतके दुसर्या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंत:करण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली,तमाशाच्या फडात , देवळात ,शाळेत,तरुणांच्या मेळाव्यात,माजघरात,देवघरात,शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत... त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे ?."
गदिमांच्या नुसत्या गीतांचा आढावा घ्यायचा झाला तर ...
'गोरी गोरी पान','एका तळ्यात होती बदके पिले सुरेख','मामाच्या गावाला जाऊया' सारखी पार लहान मुलांच्या तोंडी असणार्या गींतापासून ते अगदी गणपतीत हक्काचे स्थान मिळवून असलेल्या
'नाच रे मोरा' या सारख्या अनेक बालगीतांचा समावेश होतो,चित्रपट गीते म्हटली तर 'एक धागा सुखाचा','जग हे बंदीशाळा','या चिमण्यांनो परत फिरा रे','राजहंस सांगतो','घन घन माला नभी दाटल्या','बुगडी माझी सांडली ग','फड सांभाळ तुर्याला आला','इंद्रायणी काठी देवाची आळंदी','विठ्ठला तू वेडा कुंभार' यासारखी हजारो गीते गदिमांनी लिहिली.'माझा होशील का?' सारखे गाणे तर अगदी दक्षिण भारता पर्यंत गाजले की सुप्रसिध्द अभिनेत्री वैजयंती माला यांचे ते आवडते गीत झाले होते!.
हिंदी चित्रपटसृष्टीतही २५ पटकथा लिहून गदिमांनी आपला ठसा उमटवला,व्ही.शांताराम यांचा दो आंखे बारह हाथ,नवरंग,गूंज ऊठी शहनाई,तूफान और दिया हे चित्रपट गदिमांचेच!.अगदी गुरुदत्त च्या 'प्यासा' ची मूळ कथा
असो,राजेश खन्ना चा 'अवतार' असो वा अलिकडचा अमिताभ बच्चन चा 'ब्लॅक',मूळ संकल्पना गदिमांच्याच लेखणीतून ऊतरलेली होती.हिंदीतल्या अनेक चित्रपटांना गदिमांच्या कथेचा आधार घ्यावा लागला होता-आहे,सुप्रसिध्द पटकथाकार व गीतकार 'गुलजार' गदिमां बद्दल बोलताना एकदा म्हणाले होते की 'मला ग.दि.माडगूळकर म्हणण्या पेक्षा गदिमा हेच नाव जास्त आवडत कारण गदिमा म्हटंल की ते मला "मॉं की गोदी मे" सारख वाटत!.
मराठी साहित्यात ३० पेक्षा जास्त पुस्तके त्यांच्या नावावर आहेत जोगिया,पुरिया सारखे काव्य संग्रह असोत वा चैत्रबन,वैशाखी सारखे गीतसंग्रह,लपलेला ओघ,मंतरलेले दिवस,तीळ आणि तांदुळ,वाटेवरल्या सावल्या सारखे लघुकथा संग्रह,आत्मचरित्रपर लेखसंग्रह गदिमांच्या लेखणीतून उतरले आहेत.
गदिमांनी स्चातंत्रलढयातही भाग घेतला होता,खूप मोठया कुटुंबाची जवाबदारी,त्यात अठराविश्वे दारिद्र यामुळे गदिमांनी स्वातंत्र लढयात प्रत्यक्ष उडी न घेता शाहिरी कवने,पोवाडे लिहून जनजागृती केली,शाहिर निकमां सारख्यांनी त्याकाळात गदिमांची कवने गाऊन स्वातंत्र्य लढ्यात रान ऊठवले होते.
गदिमांनी राजकारणासारख्या कोरड्या क्षेत्रातही मुक्त वावर केला,ते साहित्यिकांचे प्रतिनिधि म्हणून जवळजवळ १२ वर्षे विधान परिषदेचे नामनियुक्त सदस्य (आमदार) होते.ते जेव्हा विधान परिषदेत भाषण करणार असायचे तेव्हा ते ऐकण्यासाठी विधान सभेतील अनेक आमदार खास त्याचे भाषण ऐकण्यासाठी विधान परिषदेत येऊन बसत असत.गदिमांनी स्वातंत्र चळवळीत भाग घेतला होता त्यामुळे त्यांची नाळ त्या वेळच्या कॉंग्रेस पक्षाशी जोडलेली होती तरीपण त्यांच्या मित्र-परिवाराच्या गोतावळ्यात सर्व जणांचा समावेश होता अगदी स्व.यशवंतरावजी चव्हाण असोत,शरदरावजी पवार असोत किंव्वा बाळासाहेब ठाकरे असोत सर्वांनाच ते आपले वाटायचे,मनोहर जोशीं,लोकमतचे दर्डा कुटुंबीय,सुशीलकुमार शिंदे,राम नाईक सर्वच त्यांच्या परिवाराचेच सदस्य होते.
लोकमतच्या एका समारंभात खा.विजय दर्डा यांची एकदा भेट झाली मी त्यांना नमस्कार केला व म्हणालो "मी गदिमांचा नातू",त्यावर ते माझ्या पाठीवर हात ठेवून म्हणाले "अरे वा,मी तुला गदिमांची एक आठवण सांगतो,बहुतेक साहित्य संमेलनाचा काळ असावा त्या वर्षी यवतमाळला साहित्य संमेलन भरले होते व गदिमा त्याचे अध्यक्ष होते. एकदा रिक्षातून ते आमच्या कडे आले,वाटेत लागणारे खड्डे आणि त्यात रिक्षातून बसून चांगलेच वैतागले होते,घामाघूम झाले होते.त्या रिक्षाप्रवासावर वर त्यांनी एक कविताही तिथल्या तिथे करुन आम्हाला म्हणून दाखवली!,त्या दिवशी त्यांची मैफलच आमच्या घरी जमली,गदिमा हे मैफिलीचे बादशहाच होते,त्यांनी अनेक उत्तम उत्तम कविता,गाणी ऐकवली,माझ्या मनात आजही त्या आठवणी जाग्या आहेत".मोठ्या व्यक्ती असोत वा सामान्य रसिक असो गदिमांच्या आठवणींचा हा ठेवा आजही अनेक रसिकांनी आपल्या मनात जपून ठेवला आहे.
गदिमांना महाकवी व आधुनिक वाल्मीकी ही पदवी ज्याच्या मुळे प्राप्त झाली ते महाकाव्य गीतरामायण,गीत रामायण हा एकाच कवीने वर्षभर रचलेला, एकाच संगीतकाराने संगीतबद्ध केलेला, वर्षभर अखंडितपणे चाललेला आकाशवाणीच्या इतिहासातील एकमेव, अभूतपूर्व असा संगीत कार्यक्रम ठरला १ एप्रिल १९५५ ते १९ एप्रिल १९५६ पर्यंत तो पुणे आकाशवाणीने प्रसारित केला. साधारण १९५३ साली पुणे आकाशवाणी हे केद्र सुरु झाले.श्री सीताकांत लाड नावाचे गदिमांचे मित्र कार्यक्रम नियोजक म्हणून पुण्याला आले होते नभोवाणीसाठी काहीतरी सातत्याने लिहावे, असा त्यांनी गदिमांना खूप आग्रह केला आणि एका महाकाव्याचा जन्म झाला.रामायणात वाल्मीकींनी २८००० श्लोकांत रामकथा लिहिली आहे.गदिमांनी तीच रामकथा एकूण ५६ गीतांत शब्दबध्द केली आहे.गीतरामायणाचे आजपर्यंत हिंदी, गुजराथी, कन्नड, बंगाली, आसामी भाषा, तेलगु, मल्याळी, संस्कृत, कोकणी अशा विविध भारतीय भाषांमध्ये भाषांतर झालेले आहे.गदिमांनी श्रीकृष्ण चरित्रावर लिहिलेले गीतगोपालही गीतरामयणाच्या तोडीस तोड आहे.
१४ डिसेंबर १९७७ म्हणजे मृत्यूच्या पराभवाचा दिवस,कारण त्याच्या हाती लागला तो केवळ गदिमांचा नश्वर देह,इतकी मोठी अंत्ययात्रा पुण्याने फार क्वचित बघितली असेल,स्त्री-पुरुष,वृध्द,राजकारणी,कलावंत,अगदी दप्तर-पुस्तके घेतलेल्या लहान मुलांपासून सर्वजण त्यात सामील झाले होते,अनेक घरात त्या दिवशी चुली पेटल्या नाहीत कारण गदिमा हे त्यांना त्यांच्या घरातलेच एक वाटत होते.गदिमांना केवळ ५८ वर्षाचे आयुष्य लाभले तरी ते आजही त्यांच्या असंख्य गाण्यांतून,साहित्यातून,चित्रपटातून,गीतरामायणातून मराठी रसिकांच्या ह्रदयात विराजमान आहेत,मराठी माणसाच्या ह्रदयात जेथे पवित्र व सुंदर गोष्टी वास करतात तेथे गदिमांचे स्थान आहे.
साधारण १९९८ सालची गोष्ट,मी नुकतेच शिक्षण संपवून संगणक क्षेत्रात प्रवेश केला होता,मराठी भाषेसाठी इंटरनेटवर काहीतरी करावे असे मनात आले,या आधीच १-२ वर्ष माझे वडील श्रीधर माडगूळकर व आमचे कौटुंबीक मित्र संगणक तज्ञ श्री.निनाद प्रधान यांनी मराठी भाषेतले पहिले साप्ताहिक "जाळं" या नावाने सुरु केले होते,आपल्याला काय करता येईल हा विचार करता करता सहज वाटले जर आपण गदिमांचे साहित्य व चित्रपट गीते इंटरनेटवर नेली तर!,आणि जन्म झाला मराठी साहित्यातील एखाद्या लेखकाला वाहिलेल्या पहिल्यावहिल्या वेबसाईटचा गदिमा.कॉम च्या रुपाने!.गदिमांचे विखुरलेले साहित्य मोती,गाणी,छायाचित्रे जसे उपलब्ध होतील तसे गदिमा.कॉमच्या माध्यमातून मराठी रसिकांपर्यंत पोहोचवत गेलो, साईट करता करता गदिमांच्या साहित्याचा अभ्यास करत गेलो व त्यांच्या अचाट प्रतिभेने भारावून गेलो,
यावर सुर्वण कळस चढला जेव्हा आकाशवाणीवरुन प्रसारित झालेले मूळ गीतरामायण गदिमा साईट वरुन देश-परदेशातील मराठी रसिक ऐकू शकले.
पपा आजोबांना जाऊन आज ३६ वर्षे झाली,आजही त्यांचे अस्तित्व 'पंचवटीत' आम्हाला जाणवते प्रत्येक सुख-दुखा:च्या क्षणी त्यांचा हात आमच्या पाठीशी असतो असा आमच्या विश्वास आहे,फरक इतकाच की पपा अजोबांचा निळा कोच आता कायमचा रिकामा झाला आहे.त्यांना निळ्या कोचावरुन "पपा आजोबा तू समोर बैस" असे म्हणत उठवणारा मी आज त्यांच्या कोचावर दोन फुले ठेवतो व या महाकवीच्या प्रतिभेपुढे नतमस्तक होतो,भारलेल्या मला कशाचेच भान राहात नाही, "माझिया रक्तात थोडा गदिमांचा अंश आहे!" याचा अभिमान वाटत राहतो व त्यांचेच शब्द मनात दरवळत जातात...
चंद्र भारल्या जीवाला,नाही कशाचीच चाड
मला कशाला मोजता,मी तो भारलेले झाड
गदिमा गौरव | Special Quotes
प्रा.रा.ग.जाधव
माडगूळकरांनी सात आठशे वर्षांची विविध रुपरसांची परंपरा आधुनिक संस्कारांनी पुन्हा सजीव केली आहे.चैत्रबन म्हणजे या पुराण्या काव्यपरंपरेचे एक कलाप्रदर्शनच आहे.