गदिमा नवनित
  • जोंवरि हें जग, जोंवरि भाषण
    तोंवरि नूतन नित रामायण
मराठी युनिकोड फॉन्ट
  • गदिमांची मंगलाष्टके!
  • Gadimanchi Mangalashtake
  • अनिल नेवाळकर | Anil Nevalkar



  • गदिमांचे स्नेही भाऊसाहेब नेवाळकर यांचे सुपुत्र व 'महाराष्ट्र मिनरल्स कॉर्पोरेशनचे' श्री.अनिल नेवाळकर यांच्या लग्नासाठी गदिमांनी खास लिहिलेली ही मंगलाष्टके,आज ४५ वर्षानंतरसुद्धा तितकीच ताजी-तवानी व अगदी तुमच्या भावी लग्नात वापरु शकता इतकी अप्रतिम...त्याची आठवण सांगत आहेत श्री.अनिल नेवाळकर.......
    ---------------------------------------------------------------------

    लग्नाचा मोसम आला की प्रत्येक वेळी आमचे कोणते ना कोणते नातेवाईक मला किंवा माझ्या पत्नीला फोन करुन, “तुमच्या लग्नात म्हटलेली मंगलाष्टके आहेत का?” असे विचारतात.

    आता ४५ वर्षांनंतरसुध्दा ते आठवणीत राहण्याची कारणे अर्थात सोपी आहेत एक तर, तेव्हा म्हणणाऱ्या व्यक्तींने ती अत्यंत निराळ्या पद्धतीने म्हणजे आर्त आणि प्रत्येक शब्द कळेल, अशा स्वच्छ आवाजात म्हटली (त्यांचे नांव आता आठवत नाही व त्यांचे गायन रेकॉर्ड झाले नाही याची चुटपुट अजून आहे.) दुसरे, 500 – 600 लोकांनी पहिल्या ओळीनंतर शेवटपर्यंत ती टाचणी पडली तरी आवाज होईल अशा शांततेत ऐकली.(इतक्या “सावधानतेने” मंगलाष्टके ऐकलेली मी तरी, परत कधीच अनुभवली नाहीत.) आणि तिसरे अगदीच सोपे. कारण ती ज्यांना महाराष्ट्राचे वाल्मिकी म्हणतात, त्या अण्णा, अर्थात खुद्द ग. दि. माडगूळकर ऊर्फ गदिमा यांनी रचली होती.

    सुदैवाने ही छापलेली असल्याने मी प्रत देतो; तरी पण माझी एक भीती नेहमीच खरी ठरते. उत्साहाच्या भरात वा जवळच्या नातेवाईकांच्या आग्रहाखातर, वधुवर व सर्व आप्तांची नावे गोवल्याशिवाय मंगलाष्टके पुरीच होत नाहीत. या कल्पनेने, नातेवाईक स्वरचित वेगळ्या मंगलाष्टकांसहित म्हणतात. ते ठीक; पण मग मधून मधून अण्णांची कडवी “गाण्याचा” प्रयत्न करतात. त्यामुळे अण्णांवर मोठा अन्याय होतो कारण ना ते मंगलाष्टक लक्षपूर्वक ऐकले जाते, ना त्याचा एकसंघ असा अपेक्षित परिणाम होतो. हा अन्याय, मूळ मंगलाष्क प्रसिध्द करून, दूर करण्याचे माझ्या मनात अनेकदा येत असे.पण या ना त्या कारणाने ते राहून जाते असे.

    पंचेचाळीस वर्षांपूर्वी (1969) मध्ये आमच्या लग्नाची तारीख ठरली; व माझ्या वडिलांची (ती. भाऊंची) अनेक मित्रमंडळी मदत करण्यासाठी सिद्ध झाली. तेव्हां लग्न हा ‘Event’ समजून त्याची Management करारावर देण्याची पद्धत नव्हती. त्याकाळी सर्व नातेवाईक – मित्रमंडळी एकत्र येऊन प्रत्येकाला जमेल ते, (व सुचेल ते) काम स्वतःहून करत. अण्णांना, बातमी सांगितल्याबरोबर त्यांनी ‘मंगलाष्टके मी लिहिणार’ असा सज्जड दम भरला. नंतर मात्र स्वभावानुसार आज – उद्याचे वायदे सुरू झाले.

    आणि लग्नाची तारीख जवळ आली तरी अवाक्षराचा पत्ता नव्हता. मध्ये भेटी झाल्या तरी मंगलाष्टकाचे नाव नाही.

    तारीख जशी अगदी आठवड्यावर आली, तसे माझे वडील म्हणाले,
    “स्वामींच्या मनात लिहायचे आहे की नाही, कळत नाही. तरी एकदा फोन करून आठवण करून पाहतो.”

    त्या काळात अण्णा मुंबईला आले की माटुंग्याच्या गुडविलमध्ये इन्श्युरन्स इमारतीत राहत असत. भाऊंनी फोनवर त्यांना विचारले, “काय महाराज! मुलाचे लग्न करायचे की नाही, की मंगलाष्टकाशिवाय लग्न लावायचे” त्यावर अण्णा म्हणाले, “हं. बरं, बरं. करतो”; त्यांनी फोन ठेवला; आणि 5 मिनिटांनी फोन आला, “भाऊ, तुमच्या कुलस्वामिनीचे नाव काय?” भाऊंनी नाव सांगितले. त्यावर 15 मिनिटांनी पुन्हा फोन आला, “मंगलाष्टक तयार झालं आहे ते घेऊन जायला कोणाला तरी पाठव आणि ‘मौज’च्या छापखान्यात तडक पाठवायचं, अनिलला दाखवायचं नाही आणि खाली माझं नाव फक्त ‘अण्णा’ लिहायचं.

    त्या दिवशी संध्याकाळी नेहमीप्रमाणे अण्णा व वामनरावांची जोडी दारात उभी. (एका पानाचा तोबरा भरलेले पुण्याचे वजनदार अण्णा; आणि दोन पानांचा तोबरा भरलेले; नागपूरचे उंच धिप्पाड वामनराव चोरघडे, आमच्याकडे बहुधा जोडीनेच यायचे.) माझ्या पाठीत जोरात गुद्दा हाणून अण्णा म्हणाले, “लेका, तुझं मंगलाष्टक तयार झालं आहे. पण तू आता वाचू नकोस. त्यामध्ये शेवटी चावटपणा केला आहे तो तुला तिथंच कळेल.”

    अण्णांची मंगलाष्टक छापून जमलेल्यांना वाटण्यात आली. आम्ही वधु - वर माला घेऊन लग्नाला उभे राहिलो. वर म्हटल्याप्रमाणे जमलेले प्रत्येक कुठलाही शब्द ऐकायचा राहू नये म्हणून लक्षपूर्वक ऐकत होते

    अण्णांचे शब्द लोक एकाग्रतेने ऐकू लागले. अण्णांच्या शब्दांत काय नव्हते? परंपरेचे भान, प्रसंगाचे मांगल्य, येणाऱ्या जबाबदारीची जाणीव, मोठ्यांच्या आकांक्षा आणि एका नव्या पिढीचा उदय होताना पाहून वाटणारी कृतार्थतेची भावना. प्रत्येक कडव्यानंतर ‘कुर्यात सदा मंगलम्’ या शब्दांना काय वजन आहे ते कळत होते.प्रत्येक वेळी जेव्हा हे शब्द उच्चारले जात, तेव्हा ते मंत्रोच्चारासारख वाटत व हे करणे ही आपली जबाबदारी असे वाटते.

    गदिमांची ही मंगलाष्टके खास तुमच्यासाठी.....

    तेजःपुंज दिसे प्रवालगिरिसा, रक्तांबरा नेसला
    देवांचा अधिदेव तो गपणती या मंडपी बैसला
    पूजा मान्‍य करी, प्रसन्‍न वदनें स्‍वीकारली वंदना
    आता एकच मागणे गजमुखा ‘कुर्यात् सदा मंगलम्’

    अंबा अष्‍टभुजा त्रिलोकजननी देवी कुलस्‍वामिनी
    आली लग्‍नघरी निवास करण्‍या आवाहना ऐकुनी
    आता तीच उभी मुठीत मिटल्‍या घेऊनिया अक्षता
    माते, हो वरदायिनी वधुवरा, ‘कुर्यात् सदा मंगलम्’

    अग्‍नी, ब्राम्‍हण, आप्‍त, मित्र, अवघ्‍या आवाहिता देवता
    आनंदे नवदंपतीस बघती, अन् वर्षती अक्षता
    आशीर्वाद म्‍हणून तांदुळ धरा हे आपुल्‍या मस्‍तकी
    मागा हेच पुनःपुनः वरवधू, ‘कुर्यात् सदा मंगलम्’

    घेई जन्‍म नवा शिवास वरण्‍या दाक्षायणी ना वृथा
    तर्कातीत तरीहि सार्थ पहिल्‍या मातापित्‍यांची कथा
    प्रीतीभाव असा चिरंजिवपणें जन्‍मांतरी नांदतो
    श्रद्धा हीच तुम्‍हांस सौख्‍यद ठरो, ‘कुर्यात् सदा मंगलम्’

    प्रीतीवाचून ना प्रपंच फुलतो हे सत्‍य ध्‍यानी धरा
    आदर्शाप्रत पोचवा घरकुला, नीती सदा आदरा
    सांभाळा कुलकीर्ति – धन जे मात्‍यापित्‍यांनी दिले
    त्‍यांचे श्रेय सुखप्रद तुम्‍हां, ‘कुर्यात सदा मंगलम्’

    वडिलपण मुलांनो, आमुचे धन्‍य व्‍हावे
    चढत चढत तुम्‍ही जीवनी उंच जावे
    मनसि वसत आहे, तोच आतून बोले
    सकळ शुभद झाले, सौरभा सूर आले

    आता बाळपणा सरे,उभयता ठाका उभे जीवनी
    स्‍वामी मान पतीस तू परिणिते, होई खरी स्‍वामिनी
    लाभू द्या धनसंपदा, यश, तुम्‍हां दीर्घायु सौख्‍यप्रद
    वाढू द्या यशवंत वंश तुमचा,कुर्यात् सदा मंगलम्

    जवळ जवळ मीलनाचा मुहूर्त
    उभय तरुण जीवा वाटती शब्‍द व्‍यर्थ
    झटपट पट आत विप्र हो दूर सारा
    अधीर बहुत झाली, पंख येतील हारा

    ..... अण्‍णा माडगूळकर



गदिमा गौरव | Special Quotes
  • पु.ल.देशपांडे:
    महाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर तर माडगूळकरांचे अनंत उपकार आहेत.इतर काहीही देण्यार्‍या माणसापेक्षा समाजाला गाणे देणार्‍या माणसाचे उपकार फार मोठे असतात.'Song has the longest life' अशी एक म्हण आहे.एक गाणे माणसांच्या पिढ्यानुपिढ्या बांधून ठेवते. एवढेच कशाला?.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे?.मराठी नाट्यसृष्टीत जी कामगिरी कै.देवलांनी केली,त्याच तोलामोलाचे कार्य माडगूळकर यांनी मराठी चित्रसृष्टीत केले आहे...म्हणूनच आम्ही सर्व माडगूळकर कलावंशाचे वारसदार ('Madgulkar Boys') आहोत,हे सांगायला मला अभिमान वाटतो.
संबंधीत लेख | Related Articles