गदिमा नवनित
 • प्रजा रंजवीतों सौख्यें तोच एक राजा
  हेंच तत्व मजसी सांगे राजधर्म माझा
  प्रजा हीच कोटी रूपें मला ईश्वराचीं
मराठी युनिकोड फॉन्ट
 • महिमा गदिमांच्यातील रामाचा..माणूसकीचा...
 • Mahima Gadimanchyatil Ramacha..Manooskicha...
 • श्री.सुमित्र श्रीधर माडगूळकर | Sumitr Madgulkar


 •   
  आजही गदिमांच्या 'पंचवटी' जवळच्या 'यवन दर्ग्या' बाहेर रामाची-गीतरामायणाची पोस्टर मोठ्या आनंदाने लावली जातात,पुण्यातील मुस्लिम संघटना एकत्र येऊन पुण्याच्या कलेक्टर ला निवेदन देतात की गदिमांचे स्मारक लवकर व्हावे,बाबरी मशिद प्रकरणानंतर निर्माण झालेली कटुता येथे कुठेच दिसत नाही,मराठी भाषेचे जाणकार असलेल्या मुस्लिम बांधवांना असलेले गदिमांबद्दलचे प्रेम आपण समजू शकतो पण ज्याला गदिमांच्या साहित्याबद्दल कदाचित माहितीपण नसावी अश्या मुस्लिम बांधवांना गदिमांबद्दल इतके प्रेम - आदर का असावा की त्यांनी चक्क रामाची पोस्टर लावावित,असे काय घडले होते?.

  २००५ साल गीतरामायण सुवर्णमहोत्सवी वर्ष होते,'गदिमा प्रतिष्ठान' व 'सकाळ' माध्यम समुहाने पुण्यात गीतरामायण सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन केले होते,१४ एप्रिल २००५ पुण्याच्या रमणबागेत गीतरामायण सुवर्णमहोत्सवाचा उदघाटन समारोह होणार होता,श्रीधर माडगूळकरांच्या विनंतीवरुन शरदरावजी पवार माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयीनां स्व:ता जाऊन भेटले होते व त्यांनी अध्यक्ष म्हणून यायचे कबुल केले होते,पवारांनी वाजपेयींसाठी खास 'चार्टड प्लेन' ची व्यवस्था केली होती,दिल्ली वरुन शरदरावजी पवार,अटलजी व सोबत प्रमोदजी महाजन एकत्रच येणार होते.सर्व पुण्यात या कार्यक्रमाची मोठी पोस्टर लावण्यात आली होती.

  गदिमांच्या पंचवटी जवळच्या दर्ग्याजवळ सुध्दा रामाची मोठी पोस्टर मुस्लिम बांधवांनी स्व:ता लावली होती,बाबरी मशिद प्रकरणानंतर असे घडणे अशक्यच होते आणि ती पण भाजपाचे जेष्ठ नेते व माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि गीतरामायणाची पोस्टर!...पण हे घडले होते याला कारण होते केवळ 'गदिमा प्रेम' कारण आपल्या जाणत्या वडिलधार्‍या मंडळींकडून हे यवन मित्र नेहमीच ऐकत होते कथा गदिमांच्या माणूसकीची....

  १९६५ पुण्यात जातीय दंगल पेटली होती,"हल्या" नावाच्या एका माथेफिरु माणसाने मंडई गणपतीची विटंबना केली होती व त्याचे परिणाम पुणे भोगत होते,सगळीकडे जाळपोळ,मारामारी,खुनाखुनी सुरु होती.एरवी एकमेकांना ओळखणारे आज ओळख विसरले होते,आज फक्त आग दिसत होती ती माणसांच्या डोळ्यात व हातात...

  पुणे मुंबई रस्तावर 'पंचवटी' बंगल्यात गदिमा अस्वस्थतेने येरझारा घालत होते,दंगलीने त्यांचे कवीमन अस्वस्थ झाले होते.इतक्यात एक माणूस बंगल्याचे
  दार उघडून पळत पळतच आत आला...

  गदिमांनी विचारले "काय झाले रे?",तो धापा टाकतच म्हणाला "अण्णा लवकर चला,आपल्या 'सैयद'ला मशिदी जवळच्या खोलीत कोंडून ठेवले आहे खूप लोक जमले आहेत,काहीही होऊ शकते,तुम्हीच त्यांना सांगा..."

  गदिमांना एकदम 'सैयद' आठवला,पंचवटी जवळच्या दर्ग्याचा केयर टेकर,तेथेच दर्ग्याजवळ छोट्या खोलीत सैयद कुटुंब रहात होते,गदिमांच्या मुलीला सायकलवरुन सोडणारा तर कधीकधी व्यंकटेश माडगूळकरांबरोबर चक्क शिकारीला जाणारा सैयद,क्षणाचाही विलंब न करता गदिमा धावत धावत पंचवटीपासून ५०-१०० मी अंतरावर असणार्‍या दर्ग्याजवळ पोहोचले.

  ५०-१०० संतप्त माणसांचा समूह तेथे जमला होता,त्यांनी सैयदला बाहेरुन कडी लावली होती.जळते कागदी-कापडी बोळे खिडकीतून आत फेकले जात होते.आतून सैयदचा आक्रोश-आरडा ओरडा ऐकू येत होता.प्रत्यक्ष मृत्यु समोर उभा होता.

  गदिमांना पाहून त्यांच्यातलाच एक माणूस ओरडला,
  "अण्णा आज तुम्ही आम्हाला काही सांगू नका,आम्ही तुमचे काहीही ऐकणार नाही"

  गदिमा पहात होते,मशिदीच्या जाळीने पेट घेतला होता,सैयदचा आक्रोश वाढतच होता,गदिमा क्षर्णाधात माणसांच्या घोळक्यात घुसले व कोणाचीही पर्वा न करता सैयदच्या दाराची कडी काढली,धाडकन आवाज झाला दार जोरात आपटले व पेटत्या शर्टानिशी सैयद जिवाच्या आकांताने पळत बाहेर आला व जवळच्या वाकडेवाडीच्या दिशेने पळत सुटला.

  नाजूक कवीमनाच्या गदिमांचे हे अफाट धाडस पाहून संतप्त जमाव क्षणभर स्तब्ध झाला.त्यांना जाणिव झाली की आपल्या हातून केवढे मोठे पाप घडणार होते,आज गदिमा नसते तर काय झाले असते.समुहाला चेहरा नसतो ना असतात भावना,आपल्या यवन सहकार्‍याला आज गदिमांनी वाचवले होते ते स्व:ताचे प्राण धोक्यात घालून...एका चित्रपटाला शोभावी अशी कथा आज प्रत्यक्षात घडली होती...

  गदिमांच्या या अफाट साहसाची व प्रेमाची आठवण यवनमित्र ठेऊन होते आणि म्हणूनच २००५ साली त्याच मशिदी-दर्ग्या जवळ रामाची पोस्टर लावण्यात हेच मित्र पुढे होते.ना त्यांना दिसत होता 'राम' ना 'अटलजी'...त्यांच्या समोर होता तो फक्त गदिमांच्यातला सच्चा माणुस..

  १४ एप्रिल २००५ पुण्याच्या रमणबागेत गीतरामायण सुवर्णमहोत्सवाचा उदघाटन समारोह मोठ्या दिमाखात पार पडला,कधि नव्हे ते एप्रिल असून अचानक प्रचंड पाऊस पडत होता व हजारो पुणेकर रसिक त्या पावसात,चिखलात चक्क खुर्चा उलटया डोक्यावर धरुन भिजत उदघाटन सोहळा अनूभवत होते,माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी,शरदरावजी पवार,प्रमोद महाजन,मुख्यमंत्री विलासराव देशमूख,बाबासाहेब पुरंदरे,विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर,बालाजी तांबे,बिंदूमाधव जोशी,श्रीधर फडके,माडगूळकर कुटुंबिय सर्वांच्या उपस्थितीत हा ४-५ दिवसांचा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.

  गदिमांनी आपले प्राण धोक्यात घालून एका यवन मित्राचे प्राण वाचविले होते,माणूस जातो पण राहतात ते फक्त त्याचे गुण व त्याच्या आठवणी...अनेक माणसे आपल्या कर्तुत्वाने मोठी होतात पण आपल्या मातीशी,माणूसकीशी नाते जपणारे असे शतकात एकच 'गदिमा' होतात...


गदिमा गौरव | Special Quotes
 • बा.भ.बोरकर
  वस्तुत: माडगूळकरांचे गीतरामायण प्रभूरामचंद्र सिंहासनस्थ झाल्यावर सुरनरांच्या जयजयकारांत संपते. पण माडगूळकरांची प्रतिभा ते तिथे संपवित नाहीत...छंद आणि स्वर विराम पावले तरी तिचे तेज सरणारे दु:ख आपल्या अंतरात रेंगाळतच रहाते.यथाकाळ या रामायणाने पुन्हा नवा अवतार घ्यावा म्हणूनच तर त्यांच्या हातुन हे घडले नसेल?एवढे मात्र खास की तोपर्यंत आणि त्यानंतर देखील यातील काही गीते गीतरामायणासारखी चिरंजीव होऊन राहतील आणि त्या बरोबरच माडगूळकरांचे-माझ्या बंधुतुल्य मित्राचे नाव देखील!.
संबंधीत लेख | Related Articles